वैभव तांबे
Agricultural Family Support Scheme: राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी/ मृत्यू, दंगल, अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सदर योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांच्या वारसदारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ देण्यात येईल.
योजनेची व्याप्ती व लाभार्थी पात्रता
कृषी गणनेनुसार निर्धारित केलेल्या सर्व वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यांपैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जणांचा समावेश असेल.
वारसदार
१) अपघातग्रस्ताची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती
२) अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी
३) अपघातग्रस्ताची आई ४) अपघातग्रस्ताचा मुलगा
५) अपघातग्रस्ताचे वडील ६) अपघातग्रस्ताची सून
७) अन्य कायदेशीर वारसदार.
योजनेमध्ये समाविष्ट बाबी
१) रस्ता/रेल्वे अपघात, २) पाण्यात बुडून मृत्यू, ३) जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, ४) विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, ५) वीज पडून मृत्यू, ६) खून, ७) उंचावरून पडून झालेला अपघात, ८) सर्पदंश व विंचुदंश, ९) नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, १०) जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी/ मृत्यू, ११) दंगल, १२) बाळंतपणातील मृत्यू, १३) अन्य कोणतेही अपघात.
योजनेमध्ये समाविष्ट नसणाऱ्या बाबी
१) नैसर्गिक मृत्यू, २) विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, ३) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, ४) गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, ५) अमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, ६) भ्रमिष्टपणा, ७) शरीरांतर्गत रक्तस्राव, ८) मोटार शर्यतीतील अपघात, ९) युद्ध, १०) सैन्यातील नोकरी, ११) जवळच्या लाभधारकाकडून झालेला खून.
महत्त्वाचे मुद्दे
सदर योजना विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी लागू राहील.
वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य यांपैकी कोणत्याही व्यक्तीला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र राहतील.
सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने / शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत देय लाभास पात्र ठरणार नाहीत.
योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
७/१२ उतारा मृत्यूचा दाखला
शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरिता शाळा सोडल्याचा दाखला / आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्राआधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे.
प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलिस पाटील माहिती अहवाल
अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे.
विमा प्रस्ताव सादर / मंजूर करण्याबाबत पद्धती
जेव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण विमा प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसांच्या आत सादर करावा.
अपघातग्रस्त शेतकऱ्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यावर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांना घटना घडल्यापासून ८ दिवसांच्या आत सादर करावा.
तालुका कृषी अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या विमा प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसीलदार यांचेकडे सादर करावा.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसांच्या आत संबंधित शेतकरी / शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यानंतर संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत अपघातग्रस्त शेतकरी / वारसदारांच्या बँक खात्यात ईसीएसद्वारे निधी अदा करण्यात येईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत वारसदारांची निवड करताना...
१) अपघातग्रस्ताची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती २) अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी ३) अपघातग्रस्ताची आई ४) अपघातग्रस्ताचा मुलगा ५) अपघातग्रस्ताचे वडील, ६) अपघातग्रस्ताची सून ७) अन्य कायदेशीर वारसदार.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना कार्यान्वयीन यंत्रणा
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत शेतकरी / शेतक-याचे वारसदार यांना तातडीने मदत मिळण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अपिलीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
तालुका स्तरीय समिती :
तहसीलदार : अध्यक्ष
गट विकास अधिकारी (पंचायत समिती) : सदस्य
वरिष्ठ पोलीस निरीक्षक : सदस्य
जिल्हा आरोग्य अधिकारी : सदस्य
साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा प्रतिनिधी : सदस्य
तालुका कृषी अधिकारी : सदस्य सचिव
तालुकास्तरीय समितीची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या
योजने संबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे व प्रतिमहा बैठक घेणे.
योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावांची छाननी करून प्राप्त प्रस्तावांना मान्यता देणे.
विमा प्रस्तावातील कागदपत्रांच्या त्रुटी पूर्ततेसाठी संबंधित यंत्रणांना सूचना देणे.
आवश्यकतेनुसार तक्रारीची पडताळणी करून जिल्हास्तरीय समितीस शिफारस करणे.
जिल्हास्तरीय जिल्हा अपिलीय समिती
जिल्हाधिकारी : अध्यक्ष तथा अपिलीय अधिकारी
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी : सदस्य
अतिरिक्त पोलीस अधीक्षक : सदस्य
जिल्हा शल्य चिकित्सक : सदस्य
जिल्हा आरोग्य अधिकारी : सदस्य
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी : सदस्य
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी : सदस्य सचिव
जिल्हा स्तरीय समितीची कार्ये
तालुका स्तरीय समितीने घेतलेला निर्णय शेतकऱ्यास / वारसदारास मान्य नसल्यास यासंदर्भात
तोडगा काढणे.
समितीची त्रै-मासिक बैठक घेऊन त्यामध्ये जिल्ह्यातील विमा प्रकरणांचा आढावा घेणे.
योजनेसंदर्भात नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याबाबत लाभार्थी अथवा शासकीय यंत्रणांमध्ये विवाद निर्माण झाल्यास त्याबाबत समाधानकारक तोडगा काढणे.
कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देणे.
- वैभव तांबे, ०२०- २६१२१०४१
(लेखक कृषी आयुक्तालयामध्ये मुख्य सांख्यिक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.