समीर गायकवाड
Village Update : त्या काळची गावाकडची सकाळ ही खऱ्या अर्थाने अमृतवेळ होती. ती नेमक्या शब्दांत चितारणे अशक्य आहे. कारण तिला अनेक पैलू होते, रंगढंग होते. नानाविध पदर होते. अंधार ओसरून उजेडाची आभा आसमंतात पसरायची आणि सकाळ होऊ लागल्याची दवंडी सृष्टी आपल्या परीने द्यायची.
रम्य सकाळी हवेत उडणारे फुलांचे परागकण, शिवारात हलकेच वाहणारं शीतल वारं अन् दिगंताला मातीत उतरणारा पूर्वाईचा लालिमा, तांबडफुटीचा पक्ष्यांचा गलका, कडब्याच्या गंजीवर बसलेल्या पाकोळ्यांचं फडफडणं, झाडांच्या ढोलीला आलेली इवल्याशा चोचीची जाग, गोठ्यातून येणारा घंटांचा आवाज, बांधाबांधांवरल्या झाडांच्या पानांची अद्भुत सळसळ, पारव्यांचं घुमणं नि भोरड्यांचा गवतावर उडालेला गलका सगळं कसं ओसंडून उचंबळून आल्यागत घडत असे.
आकाशात उडणाऱ्या घारींचं वेगानं सूर मारणं सुरू होई. वाफ्यांमधून वाहणारं पाणी आपल्याच तालात पुढे पळत राही. सकाळीच पाणी पिऊन रोपं तरतरीत होत नि वाऱ्यावर डोलू लागत. गुरं धुऊन काढण्यापासून गोठ्याची सुरुवात व्हायची. धारा काढण्यात सकाळचे सत्र समाप्त होई. जर्मनच्या मातकट पातेल्यातला लज्जतदार चहा दिवसभर उपाशी राहिलं तरी चालेल इतकी ऊर्जा द्यायचा. मुठीतलं पाणी कधी ओघळून जातं हे जसं कळत नाही तसं शिवारातली सकाळ कधी येऊन जायची ते कळत नसे.
रामपारी गावात मात्र पूर्वेला काळसर तांबडं असताना गावकुसाच्या वेशीजवळील देवळात लगबग ऐन रंगात यायची. पांढरं जुनंच, पण स्वच्छ धुतलेलं धोतर सदरे नेसलेले पोक्त टाळकरी आणि काही तरणी पोरं पकवाजाच्या आवाजावर दंग झालेली असत. टाळ- मृदंग गर्जत असत. गाभाऱ्यात उभा असणारा पांडुरंग रुक्मिणीच्या साक्षीने प्रसन्न चित्ताने हसत राही. भजनकरी टाळकऱ्याचा आवाज टिपेला जायचा.
आडावर सुरू असणारी नवविवाहित पोरीबाळींची कुजुबुज त्यात मिसळून जायची. दूर कुठेतरी मोटेवर दिली जाणारी ललकार त्या आवाजात एकरूप व्हायची. मग पाखरांना जाग येऊ लागे. घराघरातल्या दारासमोर सडे पडण्यास सुरुवात होई. चुलीमध्ये हलका आर पेटवला जाई. फुंकारीतून फुक मारताच मातीने सारवलेल्या भांड्यात पाणी चुलीवर चढवले जाई.
तोवर शेत-शिवारे, बैलगोठे टक्क जागे झालेले असत. मखमली गायींचं वासरं चाटणं सरत येई. शेतातल्या बापजाद्यांच्या समाधीवर विहिरीतले दोन तांबे थंड पाणी चढवून चाफ्याची सोनफुले चढलेली असत. तान्हुल्यांना उराशी धरून असणाऱ्या लेकुरवाळ्या आयाबाया त्यांना हळूच बाजूला करून, कंबरेल पदर खोचून पुढच्या कामास लागत.
मग गावातल्या देवळात बरीच वर्दळ वाढलेली असे. कराकरा आवाज करणाऱ्या पायताणाला पायरीपासून बऱ्याच अंतरावर ठेवून भाविक मंडळी आतल्या ओसरीवर भावमग्न होऊन आरतीची वाट बघू लागत. गुरव भक्तिभावाने आरती सुरू करे. आरती संपन्न होई. मग सगळे मिळून पांडुरंगाच्या पाया पडत. चिरमुरे-फुटाणे वाटप होई. निघताना जो-तो टाळकरी वीणेवाल्याच्या पाया पडे.
कंबरेत वाकलेले म्हातारेकोतारे मात्र थेट गाभाऱ्यात जाऊन थरथरत्या हाताने विठू-रुक्माईशी दबक्या आवाजात काहीबाही हितगुज करून बाहेर येत. त्यांचे डोळे किंचित पाणवलेले असत. स्वच्छ गणवेश घालून शाळेकडे निघालेल्या पोरांचा गलका आणि शिवाराकडे चाललेल्या गाडीवानांनी बैलांना मारलेल्या लडिवाळ हाका यांना बाजूला सारत शिळोप्याची माणसं मंदिराच्या पायऱ्यांशी बसून येणाऱ्या जाणाऱ्याचा कानोसा घेत.
सकाळच्या टायमाला गावाचा पार मात्र अगदी आळसावलेला असे, तिथली झाडं अजून पेंगत असत. गावातल्या सर्व गल्ल्या मात्र सडासंमार्जनाने उजळून गेलेल्या असत. जुन्याच पण स्वच्छ कपड्यातून घराघरांतून बाहेर पडणारी कपाळावर अष्टगंध ल्यालेली माणसं कामासाठी बाहेर पडत. गावतळ्याच्या पाण्याला जाग आलेली असे. आडावर पाणी भरायला येणाऱ्यांची गर्दी कमी होऊ लागली की गावातली सकाळ आता सरत आलीय असे मानले जायचे. मग दुपारची चाहूल अलगद लागायची.
त्या दिवसांत गावाकडं रणरणती दुपार झाली की घरोघरी फक्त वृद्ध माणसंच उरत. घरातली गडीमाणसं, धडधाकट बाया-बापड्या पोटापाण्यासाठी घराबाहेर पडत. स्वतःचं शेत-शिवार पिकपाण्यासकट असलं तरच तिथं जात, नाहीतर दुसऱ्याच्या वावरात रोजानं कामावर जात. पाण्याची ओरड सगळीकडेच वाढलेली असेल तर सरकारी कामावर जात, नाहीतर पंचक्रोशीत आसपासच्या रोजंदारीवर जात.
बळीराजाचं गावातलं घर जोत्याचं वा कुडाचं कसलंही असलं तरी उन्हांमुळे त्याच्या जीवाची काहिली व्हायची. थकलेली, कुठेही जाऊ न शकणारी म्हातारी माणसं कामावर गेलेल्या कष्टकरी लोकांची वाट बघत उंबरठ्याकडे डोळे लावून बसत. रांगणारी, आईच्या पोटाला बिलगून असणारी तान्हुली ज्याच्यात्याच्या आईसंगट जातात नि पोरसवदा असणारी चिल्लर पोरं गावातच घरी असत.
घरातली पिकली पानं या नव्या अंकुरांकडे लक्ष पुरवत. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं मखमली जाळी असणारी ही वृद्ध फुलं कधीच म्लान वा कोमेजलेली वाटत नाहीत, त्यांच्यात पांडुरंगानेच प्राण फुंकलेले असल्याने त्यांचे तेज काही औरच असे.
डोळ्यात निमालेला संघर्षाचा विस्तव, कपाळावरल्या रेषांत लिहिलेलं कष्टाचं गीत यामुळे यांचे चेहेरे तेजस्वी दिसत. त्यांच्या अंगावरचे कपडे गंजी केलेले नसले तरी त्यातली स्वच्छता अद्भुत असे. या कष्टकऱ्यांना नुसते बघितलं तरी पाहणाऱ्याचे चेहरे प्रसन्न होत. काबाडकष्ट करून हाडाची काडं नि अंगांचे चिपाड झालेले असा यांचा अवतार राही.
यांच्या हातापायाचे भेगांचे जाळे अन् रापलेल्या ओठाआडचे अर्धेमुर्धे दात मला कधीच विजोड वाटले नाहीत. हे जर कधी कामापायी कंबरेत वाकले तरी यांचा कणा मात्र ताठ असायचा. थोडं ऊन, थोडी सावली, थोडी शिरवळ, थोडी शांत हवा नि उन्हाच्या झळा सोसत हरेक दुपार यांची अग्निपरीक्षा घेई अन् विझलेल्या चुली, त्यापुढचा राखंचा उदासवाणा ढीग, खोल गेलेले रांजणांचे तळ यांचे मूक जोडीदार बनून राहत.
दारापुढून ओरडत गेलेलं एखादं अवखळ पोर किंवा गप्पा मारायला घरात आलेली जिवाभावापेक्षा जास्त असणारी शेजारची एखाद्या म्हातारीची भुणभुण इतकेच काय ते ओळखीचे आवाज दुपारच्या अमृतवेळेस घरात नांदत. फार पूर्वी या वखताला सुया, बिब्बे, पिना, धागे इत्यादी चीजा दारोदार विकत फिरणाऱ्या बायका यायच्या; नंतर नंतर त्या बंद झाल्या. गारेगार विकणारा एखादा रसूलभाई मात्र बर्फ खिसत खिसत ओसाड गल्ल्या पालथ्या घालत असे.
सगळी रिकामटेकडी मंडळी गावाच्या वेशीत गोळा होऊन चकाट्या पिटत बसत नाहीतर एखाद्या दिवशी पत्त्यांचा डाव रंगत असे. एखाद्या दुपारी कुणाच्या तरी भांडणांचा डोंब उठायचा मग सगळा गाव त्यांच्या दारात येई. नाहीतर त्या घरातली भांडणं वेशीत येत. या भांडणातली मजा ओसरली की जो तो पुन्हा आपल्या बिनकामाच्या गुताड्यात गुंतून जाई. दरम्यान चावडीत निराळीच चर्चा चालायची.
तंबाखू मळत मळत कुणाच्या घरी काय चाललंय अन् कुणाच्या फडात कोण गाव्हतंय याचा चाखाचोळा दबत्या आवाजात तिथे चालू असे. मध्येच एखाद्याची मेख हाती लागली की ‘दे टाळी’ म्हणून मोठा गलका होई. पुन्हा आवाज नॉर्मल व्हायचा. मग पानसुपारीची चंची हलकी होऊन जायची.
इदुळा दुपारच्याला देवळाजवळ काही म्हातारी कोतारी बसलेली असत. लिंब-पिंपळाच्या सावलीत बसून गळणारी पाने निरखीत राहत. गावातला पार चवचाल असायचा, चावडी शिंदळकी असे अन् देवळाची ओसरी आयुष्याची जोडीदार राही. बाकी सर्व ठिकाणांपेक्षा देवळापाशी जास्त शांतता असे. दुपारच्याला देवळातल्या पाकोळ्या भिरभिरणं थांबवून कोनाड्यात शांत निजत.
आज्जी आज्ज्याच्या मागं हट्ट करून देवळात आलेलं एखादं दुसरं पोरही अगदी बिनसुध झोपी जायचं. झाडांवरची पाखरंही चिडीचूप होऊन गेलेली असत. गाभाऱ्यात सकाळी लावलेल्या उदबत्तीचा मातकट ओलसर दर्प आणि सुकलेल्या फुलांचा दरवळ यांचे गंधतरंग देवळाबाहेरून चालत जाणाऱ्यालाही भुलवत. हा गंध नाकात शिरताच तिथून जाणारा पांथस्थ पायातल्या वहाणा बाजूला काढायचा.
उभ्यानेच हात जोडायचा, काही क्षणासाठी तिथे आपले बुड टेकायचा. काही वेळाने सावल्या लांब-तिरक्या होत. निरस दुपार सरल्याची ती पहिली खुण असे. जी पाखरांच्या गलबलाटाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटवे. चुलीच्या पोटातल्या काटक्या पेटून उठत, मातीने सारवलेल्या जर्मनच्या भांड्यात बघता बघता चहाचे आधण चढे मग दुपार संपल्याचे जणू सूतोवाच होई.
मावळतीचा सूर्य मिश्किलपणे हसत, कललेल्या सांजेचे उधाणलेले रंग त्याच्या डोळ्यांत साठवत अस्ताकडे जायचा. शेतशिवारातल्या गावातल्या या अमृतवेळा म्हणजे बाळमुखातून बोलणारा अन् शिवारातून डोलणारा देवच जणू! दिवसभराच्या अपूर्वाईला जोवर आपण अंतःकरणापासून पाहत नाही तोवर इथले चैतन्य जाणवणार नाही. मनातला खरा भाव इथे जास्त चांगला कळू शकतो.
इथं नांगर चालवून, काळ्याभोर मातीच्या कुशीतून कोवळे हिरवेकंच अंकुर फुलवून जे उमजते, ते गळ्यात रुद्राक्षाच्या शंभर माळा घालून भस्म लेऊनही कळणार नाही. त्यासाठी हे अंतरीचे सूर जागवणारे हे क्षण संधी मिळताच जगायला पाहिजेत, नाहीतर आयुष्यातले काही अर्थ अन संज्ञा आपल्याला कधी कळणारच नाहीत. ज्यांनी या अमृतवेळा अनुभवल्या त्यांना शेती माती नि मायबापांची ओढ अमृताहून अधिक राहिली ती याचमुळे. हे जपले पाहिजे.
समीर गायकवाड, ८३८०९७३९७७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.