MPSC Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Success Story: भागू ते तहसीलदार भाग्यश्री...

Tehsildar Journey: फाटक्या झग्यातली, अस्ताव्यस्त केस अन् मन असलेली भागू आता शिक्षणाच्या वाटेवरून जिद्दीच्या जोरावर तिच्या केबिनमध्ये बसली होती. बाहेर नामफलक होता ‘भाग्यश्री भीमा साबळे, तहसीलदार.’

Team Agrowon

डॉ. प्रतिभा जाधव

Inspirational Story: ही गोष्ट आहे भागूची. भागूचे आई-वडील मोलमजुरी करणारे. अंगावर फाटके कपडे, रिकामा खिसा, डोईवर कुडाच्या भिंतीवर तग धरून असलेलं चंद्रमौळी छप्पर अन् नजरेत हतबलता. चार मुली अन् दोघं नवरा बायको अशी सहा खाणारी तोंडं. कसंबसं पोट भरत अन् दिवस ढकलत आयुष्य रटाळपणे चाललं होतं. भागू सर्वांत लहान. मोठ्या तिघी शाळा शिकल्या नाहीत. त्याही मिळेल ते काम करून मायबापाला मदत करत होत्या.

भागूला शाळेचं, वही-पुस्तकाचं भलतं आकर्षण. तिच्या झोपडपट्टीपलीकडं मोठी कॉलनी होती. चांगल्या कुटुंबातील त्या मुलांचे स्वच्छ गणवेश, महागडी दप्तरं, बुटं अन् त्यांना घ्यायला येणाऱ्या भारीतल्या शाळेच्या चकचकीत बसेस बघून तिचा जीव पार बारीक बारीक व्हायचा. ती मुलं शाळेत निघून गेली की हीदेखील तिच्या झोपडीत येऊन बसायची गुमान. बहिणी अन् मायबाप कामावर गेलेली असायची मग हिला झेपेल तेवढं घरकाम हिने करायचं हे ठरलेलं.

तुमच्या माघारी मुलींचे काय?

एकदा कसलातरी सर्व्हे करायला आलेल्या अंगणवाडीताईने खट्टू झालेल्या भागूला बघितलं अन् बोलतं केलं. तेव्हा भागू ‘‘मला शिकायचंय पण मायबापाकडं पैसा ना वेळ. त्यांच्या दृष्टीने मिळेल ते काम करून चार पैसे मिळवणं महत्त्वाचं. शिक्षण हे श्रीमंत लोकांचं काम; आपलं नाही.’’ सारं एका दमात बोलून हमसून रडायला लागलेली भागू बघून अंगणवाडी ताई कळवळली. एकीकडे सारी सुबत्ता असूनही मोठ्या घरातली न शिकणारी पोरं अन् इकडे शिकायची इच्छा आहे पण सारीच प्रतिकूलता असणारी भागू.

काहीतरी ठरवून दुसऱ्या दिवशी अंगणवाडीताई सकाळीच भागूच्या घरी आल्या अन् तिच्या मायबापाला म्हणाल्या, ‘‘तुमचं आयुष्य असं मोलमजुरी करत चाललं आहे. आज पोटाला मिळालं उद्या मिळेल की नाही याची खात्री नाही. मुली शिकल्या तर काहीतरी काम करून स्वाभिमानाने आपल्या पायावर उभ्या राहतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात त्याप्रमाणे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. सतत कष्ट करून तुमच्यामागे लागलेल्या कैक व्याधी बघा.

तुम्ही असे आयुष्यभर काबाडकष्ट करत खंगून एक दिवस अखेरचा निरोप घ्याल. पण मग मागे राहिलेल्या या चौघींचे काय? कधी विचार केलाय का? रक्ताचे नातेवाईक आताच तुम्हाला ओळख देत नाहीत. तुम्ही गेल्यावर मुलींच्या पाठी तरी उभे राहतील का? पण शिक्षण अशी गोष्ट आहे की ती माणसाला ताठ मानेनं जगायला शिकवते. विचार, सृजन, रोजगार देते. तुम्ही किमान भागूला तरी शाळेत घाला. हवं तर मी मदत करते तुम्हाला तिच्या प्रवेशासाठी.’’

भागूचा शाळेत प्रवेश

भागूच्या मायबापाचं शिक्षणाविषयीचं भय बहुधा अज्ञानातून आलं होतं. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासच नव्हता. त्यांनी भागूच्या शाळेची जबाबदारी अंगणवाडीताईकडे सोपविली. शाळा एव्हाना सुरू झाल्या होत्या. ऑगस्टमध्ये भागूचा प्राथमिक शाळा प्रवेश झाला. त्या एकपाठी चुणचुणीत पोरीने परीक्षेत कधीच पहिल्या पाचातील क्रमांक सोडला नाही. तिचं प्रगतीपुस्तक पाहून मायबाप खूष व्हायचे. भागू सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल आली. तिचे सत्कार झाले. मायबापाला गगन ठेंगणे झाले.

हळूहळू तिच्या न शिकलेल्या बहिणी एकएक करून बापाने बऱ्या सोयरिकी बघून उजवल्या. पण त्यांचे संसार फार काही व्यवस्थित चालेना. सासुरवास भोगत, दारुड्या नवऱ्याचा मार खात त्या पर्याय नसल्याने मुकाटपणे संसार करत राहिल्या. सासरचा छळ सहन न झाल्याने त्यातल्या एकीने पेटवून घेऊन आत्महत्या केली. त्या दिवसापासून तिचा बाप धक्का बसून जो मौनात गेला तो काही केल्या बाहेर येईना. भ्रमिष्ठासारखा करायला लागला. आई कष्ट करी आणि हा घरात बसून असे. सारे सांभाळत एव्हाना भागू पदवीचे शिक्षण घेत होती.

भागूने शिक्षकांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. प्रतिकूल परिस्थितीतून शिकण्याची संधी मिळाली की माणूस स्थैर्य, उत्कर्षाची स्वप्नं बघतो अन् चिकाटी, जिद्द ठेवून प्राणपणाने ती पूर्णही करतो. तसेच झाले; पहिल्याच प्रयत्नात भागुची तहसीलदार पदासाठी निवड झाली. सुदैवाने तिला चांगले शिक्षक लाभले तिच्या परीक्षा व निवडप्रक्रियेत ते सोबत होते. आताशा थकलेल्या अंगणवाडी ताई, तिचे शिक्षक, आईबाबांचे चरणस्पर्श करून ती तिच्या कार्यालयात आली.

फाटक्या झग्यातली भागू आता शिक्षणाच्या वाटेवरून जिद्दीच्या जोरावर तिच्या केबिनमध्ये बसली होती. बाहेर नामफलक होता ‘भाग्यश्री भीमा साबळे, तहसीलदार’. केबिनमध्ये शाहू-फुले-डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमा तिने भिंतीवर लावल्या त्यापुढे नत होऊन तिने आपला सारा संघर्ष आठवला. झोपडपट्टीतली ‘भागू ते तहसीलदार भाग्यश्री’ हा प्रवास ह्या महामानवांच्या विचारांनी दाखवलेल्या वाटेनेच तिने पूर्ण केला होता. बुद्धिमत्ता असूनही समान संधी व मार्गदर्शन न मिळालेल्या अनेक भागू आपल्या अवतीभवती असतील त्यांचा शोध घेऊ या का?

pratibhajadhav279@gmail.com

(लेखिका साहित्यिक, वक्ता व एकपात्री कलाकार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT