Chandrapur News : वन्य प्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी धान शेतीच्या बांधांभोवती मजुरांच्या साहाय्याने तारा लावत असताना विजेचा जोरदार धक्का बसत दोन शेतकऱ्यांसह एका मजुराचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता. ११) दुपारी ११ वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर मेंडकी या गावात घडली.वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनंतर विरोधकांनी शासनाच्या धोरणावर चांगलीच टीका केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागात धान (भात) शेती होते. दरम्यान सध्या पाऊसमान चांगले असल्याने पीक देखील बहरावर आहे. मात्र याच जिल्ह्यात जंगलक्षेत्र मोठे असून ताडोबा सारखे अभयारण्य देखील आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढता आहे. अशा घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसानही होते. त्याला प्रतिबंध म्हणून शेतकरी जीवंत वीजवाहक तारांचा उपयोग करीत पीक वाचविण्याचा प्रयत्न करतात. बुधवारी (ता. ११) दुपारी ११ वाजताच्या सुमारास बहरावर असलेल्या धान पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे याकरिता गणेशपूर मेंडकी येथील प्रकाश राऊत यांच्या शेतात तारांचे कुंपण लावण्याचे काम सुरू होते. या कामासाठी त्यांनी आपल्या घरातील नानाजी राऊत यांना घेतले.
त्यासोबतच युवराज डोंगरे आणि पुंडलीक मानकर या दोन मजुरांसह इतर तीन मजूर देखील या कामाकरिता होते. धान बांधीला तार कुंपण घेत असताना अचानक त्यामध्ये वीज प्रवाह संचारला. यामुळे विजेचा जोरदार झटका बसत प्रकाश राऊत, नानाजी राऊत त्यासोबतच काम करणारे युवराज डोंगरे व पुंडलीक मानकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेत विजेचा धक्का लागल्याने कामावरील इतर दोन ते तीन मजूर जखमी झाल्याची माहिती ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद बानबाले यांनी दिली.
मृत्यूबाबत वाढले गूढ
पीक संरक्षणासाठी तार लावत असताना या चौघांचा मृत्यू झाला. मात्र या तारांमध्ये वीज प्रवाह आला कोठून या बाबत अनेक तर्क लावण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबियांनी विजेसाठी बॅटरीचा उपयोग केला जातो, असे सांगितले. बॅटरी नेण्यापूर्वी आधी तार लावण्याचे काम करण्यात येत होते. त्यानंतर बॅटरीचा उपयोग करून वन्यप्राण्यांना रोखण्यात येणार होते, असाही दावा केला आहे.
मृतक राऊत यांच्या शेतात कूपनलिका (बोअरवेल) असून तेथे वीजप्रवाह आहे. वन्य प्राण्यांसाठी तारेचे कुंपण घेत असताना या बोअरवेलच्या लगत असलेली वायर कटलेली असावी. त्याचा संपर्क कुंपणाच्या तारेशी होत ही घटना घडल्याची शक्यता आहे. घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध घेता यावा याकरिता वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाअंती खुलासा होईल. मात्र मृतकांचे हात भाजलेले असल्याने विजेच्या धक्क्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा.प्रमोद बानबाले, पोलिस निरीक्षक, ब्रम्हपुरी पोलिस ठाणे
चंद्रपूर जिल्ह्यात मोठे वनक्षेत्र आहे. त्यासोबतच राज्याच्या इतरही भागात असलेल्या शेतीला वन्यप्राण्यांचा मोठा त्रास आहे. त्या पार्श्वभूमीवर १०० टक्के अनुदानावर सौर कुंपणाची योजना राबवावी, अशी मागणी आम्ही सातत्याने केली. परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. माझ्या मते हे शासकीय अनास्थेचे बळी आहेत. खुद्द वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्यामुळे आता तरी शासनस्तरावर या संदर्भाने उपाययोजना होतील, अशी अपेक्षा आहे.विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेता, विधानसभा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.