Rainy Season Fishing Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Fishing : पावसाळ्यातील मासेमारी बंदी महत्त्वाची...

Fishing Update : सागरी मासेमारी अधिनियमानुसार पूर्व किनारपट्टीसाठी १५ एप्रिल ते १४ जून आणि पश्‍चिम किनारपट्टीसाठी १ जून ते ३१ जुलै या कालावधीमध्ये मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी आहे.

Team Agrowon

महेश शेटकार, हर्षवर्धन शेट्ये, डॉ. स्वप्नजा मोहिते

Rainy Season Fishing : समुद्र अथांग असला तरी त्यातला मासळीचा साठा अमर्याद आहे असे मानण्याचे कारण नाही; तसा पुरावाही नाही. माशांची उपलब्धता दूरवर पसरलेल्या समुद्रापेक्षा किनारी भागात, मुख्यतः सुमारे ४० वाव खोलीपर्यंतच्या भागातच अधिक असते.

या मर्यादित क्षेत्रात (महाराष्ट्रात सुमारे ४३,००० चौरस कि.मी.) सगळ्या नौका मासेमारी करू लागल्या, की आपोआपच संघर्ष निर्माण होतो. मर्यादित जलसंपत्ती मासेमारीद्वारे मिळविणे हाच एक मार्ग असल्यामुळे यावर काही निर्बंध आणणे आवश्यक आहे. अन्यथा, सातत्याने मिळणारे कमाल उत्पादन टिकवून ठेवता येणार नाही.

मच्छीमार नौकांची संख्या बेसुमार वाढूनही मत्स्योत्पादन स्थिर राहिले तर दर नौकेचे सरासरी उत्पादन कमी होण्याची आणि मिळणाऱ्या मासळीचा सरासरी आकार कमी होण्याची भीती आहे. मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्याचा आस कमी होत गेला तर लहान आकाराची मासळी पकडली जाऊन, ती प्रथम प्रजननापूर्वीच पकडली जाण्याची भीती आहे. त्यामुळे मच्छीमार नौकांची संख्या, आसांचा आकार, मासेमारीसाठी वापरावयाचे क्षेत्र यावर काही निर्बंध घालून मासेमारीचा व्यवसाय कालांतराने धोक्यात येण्यापासून वाचविणे आवश्यक आहे. त्याकरिता सागरी मासेमारी अधिनियमानुसार भारताच्या जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घातली जाते. एकसष्ट दिवसांचा हा कालावधी पूर्व किनारपट्टीसाठी १५ एप्रिल ते १४ जून, तर पश्‍चिम किनारपट्टीसाठी १ जून ते ३१ जुलै असा ठरविण्यात आला आहे.

मासेमारी करणाऱ्या नौकांसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक होते. त्यामुळे या नौकांचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो. प्रतिकूल हवामानात (उदा. समुद्र खवळणे, चक्रीवादळ) नौका समुद्रामध्ये नेल्यास नष्ट होण्याचा धोका असतो. यामुळे देशाची, पर्यावरणाची तसेच वैयक्तिक हानी होते. नौकांना पावसाळ्यात मासेमारी करण्यापासून बंदी घालून त्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळण्यासाठी हा मार्ग व्यावहारिक सुज्ञपणा आहे. सामाजिक हानीपासून संरक्षण करण्याकरिता राज्याने मासेमारी बंदी करणे यामुळे योग्य ठरले आहे.

परिणाम आणि उपाययोजना

जे मच्छीमार फक्त मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात, त्यांच्या उत्पन्नावर पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा परिणाम होतो. बऱ्याच मच्छीमारांकडे मासेमारीसाठी खास तयार केलेली कौशल्ये असतात आणि ते इतर प्रकारच्या कामात पारंगत नसतात. परिणामी, त्यांना मासेमारी उद्योगाच्या बाहेर पर्यायी रोजगाराच्या संधी शोधण्यात आव्हानांचा सामना करावा लागतो.

मासेमारी बंदी दरम्यान मच्छीमार आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगांना आर्थिक आव्हान असते. या कालावधीत मच्छीमार आणि इतरांसाठी मासळीपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याची किंवा मत्स्यद्योगाशी निगडित काही कौशल्ये विकसित करणारी प्रशिक्षण आयोजित करून, यावर मात करता येऊ शकेल.

पावसाळ्यापूर्वी मिळालेल्या मासळीपासून चटणी, लोणची किंवा सुक्या मासळीपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. या योजना पावसाळ्यातील मासेमारी बंदी कालावधीत रोजगार निर्माण करून अर्थार्जनालाही हातभार लावू शकतात. कायद्याने पावसाळ्यात मासेमारी बंदीसारखे निर्बंध अलीकडे घालण्यात आले आहेत.

पावसाळ्यात मासेमारीसाठी न जाण्याची आणि नारळीपौर्णिमेला समुद्रपूजन करून मासेमारीला सुरुवात करण्याची मच्छीमारांची परंपरा आहे. या प्रथेला अनुसरून हा निर्बंध आहे. या निर्बंधाचे पालन मच्छीमार जितक्या काटेकोरपणे करतील, तितकीच त्या निर्बंधाच्या उद्दिष्टपूर्तीस मदत होऊन शाश्‍वत मासेमारी ही संकल्पना वाढण्यासाठी हातभार लागेल.

पावसाळा आणि माशांचे प्रजनन

माशांच्या प्रजननासाठी समुद्राच्या पाण्याचे तापमान, पोषक द्रव्य, पाण्याची क्षारता व घनता इत्यादी महत्त्वाच्या बाबी मानल्या जातात. पावसाळा या सर्व बाबींनी अनुकूल असतो. म्हणूनच बरेचसे मासे इतर ऋतूच्या तुलनेत पावसाळ्याच्या सुरुवातीला, पावसाळ्यात किंवा पाऊस संपताना परिणामकारक प्रजनन करतात.

याच काळात काही मासे अंडी देण्याच्या मार्गावर असतात. त्याचबरोबर बाल्यावस्थेतील मासळी पकडली जाण्याची व त्यायोगे मासळीच्या साठ्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. काही माशांच्या प्रजाती अंडी घालण्यासाठी किंवा अंडी घालण्यासाठी विशिष्ट भागात स्थलांतर करतात आणि या काळात मासेमारी केल्याने त्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.

पर्ससीन पद्धतीची मासेमारी थव्याने राहणारे पृष्ठभागाजवळील मासे पकडण्यासाठी होते. अशा काळात जर प्रजननयोग्य मासे किंवा माशांची पिले पकडली गेली, तर पावसाळ्यानंतर होणाऱ्या मासेमारीवर विपरीत परिणाम होतो.

प्रत्येक प्रजातीच्या माशांची प्रजनन क्षमता वेगवेगळी असते. अंडी घालण्याचा काळ पावसाळा असला तरी प्रत्येक मासा, संबंधित मोसमात किती अंडी घालणार, कुठे अंडी घालणार यासाठी पावसाळ्यातील वातावरण, पाण्यातील पोषक घटक, पाण्याचा सामू, क्षारता आणि तापमान हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील महत्त्वाच्या माशांचे प्रजनन आणि पुढील महिन्यात होणारी पिलांची वाढ लक्षात घेता, या दरम्यान मासेमारी बंदी पाळणे महत्त्वाचे ठरेल.

पावसाळा आणि कोळंबीचा जीवनक्रम

भारत सध्या कोळंबी उत्पादनात अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळंबीला मोठी मागणी आहे. पावसाळा हा ऋतू कोळंबीच्या बीजोत्पादनाचा हंगाम असतो. प्रजननासाठी परिपूर्ण असलेले नर व मादी कोळंबी, सामान्यतः मे महिन्याच्या अखेरीस सागरी किनाऱ्याकडे येण्यास सुरुवात करतात.

मादी कोळंबी कमीतकमी पन्नास हजार ते दीड लाख अंडी घालते आणि इथूनच कोळंबीच्या वाढीला सुरुवात होते. कोळंबीच्या जीवनक्रमातील महत्त्वाच्या वेळी मासेमारी केल्यास अंडी, बाल्यावस्थेतील कोळंबीला हानी पोहोचते. याचाच परिणाम भविष्यातील कोळंबी उत्पादनावर होतो.

पावसाळा आणि खाडीतील मासेमारी

पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी असली तरी खाडीत मासेमारी केली जाते. या वेळी तांबोशी, रेणवी, शीतक, मुत्री, बोयर इत्यादी मत्स्य प्रजाती परंपरागत जाळी उदा. वाण, गळ ट्रॅप्स, गिलनेट इत्यादी वापरून पकडल्या जातात. यावर देखील निर्बंध घालून हे मत्स्य साठे जतन करण्याची गरज आहे. कारण पावसाळ्यात नदी नाल्यातील पोषक द्रव्ये ही पावसाच्या पाण्याने वाहून येतात आणि खाडीत जमा होतात. हे घटक माशांच्या पिलांच्या वाढीस कारणीभूत असतात.

- डॉ. स्वप्नजा मोहिते, ९५४५०३०६४२, (मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming: साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत  

Farmer Cup: ‘फार्मर कप’द्वारे १५ हजार शेतकरी गट होणार: मुख्यमंत्री

Fenugreek Farming: मेथी पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

Rain Crop Damage: पाऊस सुरूच, उडीद पीक गेले हातचे

Pune APMC Corruption: पुणे बाजार समितीत २०० कोटींचा गैरव्यवहार: रोहित पवार

SCROLL FOR NEXT