Kolhapur News : कौलव (ता. राधानगरी) येथील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने एक वर्षाची वीज बिले एकाचवेळी पाठवून जोरदार शॉक दिला आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, बिलांचे हप्ते पाडून द्यावेत व दंडाची रक्कम माफ करावी, अशी मागणी केली आहे.
येथे पिकांना पाणीपुरवठा करणारे सुमारे ३५ कृषिपंप आहेत. त्यांची वीज बिले तीन महिन्यांतून एकदा दिली जातात. शेतकऱ्यांकडून ती वेळेत भरलीही जातात. मात्र, जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ अशी चार बिले शेतकऱ्यांना मार्च महिन्यात एकाच वेळी पाठवून वीज कंपनीने जोरदार धक्का दिला आहे.
तसेच वेळेत बिले न भरल्याचा ठपका ठेवून त्यावर दंडही आकारला आहे. या चार बिलांची रक्कम मोठी असल्याने ती भरताना शेतकऱ्यांची आर्थिक अडचण होणार आहे. मुळात वेळेत बिलेच पाठवली नसल्याने शेतकऱ्यांनी ती भरलेली नाहीत. मग त्यावरील दंडाचा शेतकऱ्यावर भुर्दंड का, असा सवाल विचारला आहे.
कंपनीच्या या ढिसाळ कारभाराचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ही वीज बिले भरण्यासाठी हप्ते पाडून द्यावेत व त्यावरील दंडाची रक्कम माफ करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागणी मान्य न केल्यास कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
कंपनीने बिले वेळेत पाठवली असती तर ती शेतकऱ्यांनी वेळेत भरली असती. मात्र, चार बिले एकदम पाठवून ती दंडासह भरण्याची सक्ती केली जात आहे. बिलांची रक्कम मोठी असल्यामुळे ती एकदम भरणे अशक्य आहे. तसेच शेतकऱ्यांची चूक नसताना त्यांना दंड आकारला आहे.- रणजित पाटील, सदाशिव खडके, शेतकरी, कौलव
ज्या कंपनीकडे वीज बिले पाठविण्याचे काम दिले आहे, त्यांनी शेतकऱ्यांना वीज बिले वेळेत दिलेली नाहीत. त्यामुळे बिले वेळेत न दिल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाईल.- समर अत्तार, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी परिते उपविभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.