Igatpuri News : इगतपुरी शहर : इगतपुरी तालुक्यातील वयोवृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पंचायत समितीतील कृषी अधिकारी कैलास भदाणे यांची बदली करावी, अन्यथा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे बुधवारी (ता. १८) दिला.
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, इगतपुरी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ व आदिवासी सेलचे अध्यक्ष भागवत भगत यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, की घोटी येथील कृषी केंद्रात बी-बियाणे व खते घेतल्यावर कच्चे बिल देऊन जास्त पैसे घेतल्याची तक्रार घेऊन वयोवृद्ध शेतकरी पंचायत समितीतील कृषी अधिकारी कैलास भदाणे यांच्याकडे गेले होते. मात्र, कृषी अधिकाऱ्यांनी उलट वयोवृद्ध शेतकऱ्यालाच अपमानास्पद वागणूक देत आरेरावीची भाषा वापरून ‘तू कृषी केंद्र चालकांची गच्ची पकड, तिकडे मारझोड कर, मला सांगू नको, परत इकडे येऊ नको,’ अशा पद्धतीने शेतकऱ्याचा अपमान केला. इगतपुरी आदिवासी तालुका आहे.
सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. कृषी केंद्रचालक कच्च्या पावत्या देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. कृषी केंद्रचालकांना मदत करणारे कृषी अधिकाऱ्यांची बदली न केल्यास शेतकरी संघटनेतर्फे टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
दरम्यान, भात उत्पादक म्हणून इगतपुरी तालुका महाराष्ट्रभर ओळखला जातो. तालुक्यातील शेतकरी बागायती शेतीकडे वळले आहेत. भात शेतीव्यतिरिक्त टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, मिरची, कोबी आणि इतर पालेभाज्याही घेतल्या जातात. मात्र, यासाठी कीटकनाशके व खतांची आवश्यकता भासत असून, तालुक्यात कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना कीटकनाशके खते आव्वाच्या सव्वा भावाने विकली जातात, अशा आशयाचे निवेदन शेतकरी संघटनेचे बाळासाहेब धुमाळ यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.