गणेश कोरे
Valentine day Rose Success Story : दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जगभरात आणि देशांतर्गत बाजारपेठांमध्येही गुलाबाच्या विविध रंगी फुलांना प्रचंड मागणी असते. पुणे- तळेगाव येथील फ्लोरिकल्चर पार्क देशात प्रसिद्ध आहे. येथून व मावळ तालुक्यातील फुलांच्या क्लस्टरमधून यंदा या दिनानिमित्त सुमारे ७५ लाख फुलांची निर्यात तर एक कोटी फुलांचा देशांतर्गत पुरवठा झाला आहे. या वर्षीचे हवामान, वाढलेले विमान भाडेशुल्क. अन्य गुलाब उत्पादक देशांची स्पर्धा या मुद्द्यांच्या अनुषंगाने घेतलेला वृत्तांत.
दरवर्षी १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने गुलाबाच्या फुलांची जागतिक बाजारपेठ फुलून गेलेली असते. या दिनासाठी असलेली फुलांची प्रचंड मोठी मागणी लक्षात घेऊन फूल उत्पादक देशांमधील शेतकरी कित्येक महिने आधीपासून लागवड ते काढणीपर्यंत निर्यातक्षम गुलाब व्यवस्थापनात व्यस्त असतात. देशातील महाराष्ट्र हे देखील महत्त्वाचे फूल उत्पादक राज्य आहे. त्यातील पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात निर्यातक्षम फूल उत्पादनासाठी राज्य पणन मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीने येथे फ्लोरिकल्चर पार्क उभारले आहे. त्याद्वारे अनेक शेतकरी आणि उद्योजक वर्षभर अत्याधुनिक पॉलिहाउसमधून फुलांचे उत्पादन घेत आहेत. व्हॅलेंटाइन डे निमित्त जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी या पार्कमधून मोठी उलाढाल दरवर्षी होते.
यंदाचे चित्र
तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क सुमारे २५० एकर क्षेत्रात वसले आहे. त्यातील १७५ एकरांपैकी एक ते १० एकर क्षेत्रावर पॉलिहाउसमध्ये गुलाबांसह विविध फुलांचे उत्पादन घेतले जाते. यात ९० टक्के विविध रंगी गुलाब आणि त्यातही ९० टक्के लाल गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. विविध रंगांमध्ये पांढऱ्या, पांढऱ्या फुलांना लाल किनार, फिकट व भडक गुलाबी, पिवळा, केशरी, पिवळसर पांढरा आदींचा समावेश असतो. या वर्षी (२०२४-२५) फ्लोरिकल्चर पार्कमधून व्हॅलेंटाइन डेसाठी सुमारे २२ लाख फुलांची निर्यात झाली. या वर्षी ढगाळ वातावरण व आर्द्रता जास्त काळ राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फवारण्या व त्यावरील खर्च वाढला. थंडीचा काळ कमी असल्याने कळ्या लवकर उमलल्या. त्याचा फटका उत्पादनाला बसला. सुमारे १५ ते २० टक्के उत्पादन कमी झाले अशी माहिती ‘इंद्रायणी फ्लोरिकल्चर’चे संचालक प्रदिप ढोले यांनी दिली. ते म्हणाले, की आमची चार एकर क्षेत्रात तीन पॉलिहाउसेस आहेत. मागील १६ वर्षांपासून आम्ही निर्यातक्षम फुलांचे उत्पादन घेत आहोत. यामध्ये लाल गुलाबासह नऊ विविध रंगी गुलाब वाणांचा समावेश आहे. यंदा व्हॅलेंटाइन डेसाठी सुमारे ६० हजार फुलांची निर्यात केली. पैकी ५० हजार फुले देशांतर्गत बाजारात पाठविली. या वर्षी थंडीचा कालावधी कमी राहिल्याने आणि उत्पादन लवकर सुरू झाल्याने निर्यातदारांच्या अपेक्षेपेक्षा निर्यात लवकर सुरू करावी लागली. निर्यातही लवकर संपल्याने देशांतर्गत बाजारात फुलांची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे निर्यातीसाठीच्या तसेच देशांतर्गत फुलांना १५ ते १६ प्रति फूल असा दर राहिला.
काढणीचा कालावधी कमी झाला
मावळ तालुक्यात गुलाब फूल उत्पादनांचे जणू जाळेच तयार झाले आहे. येथे फूल उत्पादक संघही कार्यरत आहेत. संघाचे पदाधिकारी मुकुंद ठाकर म्हणाले की तालुक्यात पॉलीहाऊसमधील फुलशेतीचे सुमारे एक हजार एकर क्षेत्र आहे. यंदा पाऊस जास्त झाल्याने थंडी देखील चांगली पडेल आणि त्याचा कालावधी जास्त राहील असा आमचा फूल उत्पादकांचा अंदाज होता. त्यानुसार आम्ही ५० ते ५५ दिवसांच्या ‘हार्वेस्टिंग’ (काढणी) नियोजन केले होते. मात्र तशी स्थिती निर्माण झाली नाही. थंडीचे फार कमी दिवस राहिले. प्रतिकूल हवामानामुळे फुलांचे उत्पादन लवकर सुरू होऊन हार्वेस्टिंगचा कालावधी ५० ते ५५ दिवसांवरून ४० दिवसांवरच आला. यामुळे गरजेपेक्षा आधी फुले निर्यातीसाठी पाठवावी लागली. मावळ तालुक्यातून या वर्षी ५० ते ५५ लाख फुलांची निर्यात परदेशात झाली. तर सुमारे ७५ लाख फुलांचा देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा झाला. निर्यातीमध्ये लंडन, अमेरिका, नेदरलॅंड, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई, मलेशिया आदी देशांचा समावेश राहिला. तर देशांतर्गत बाजारपेठेत दिल्ली, काश्मीर, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांचा समावेश राहिल्याचेही ठाकर म्हणाले. आश्वासक बाब म्हणजे लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असल्याने देशांतर्गत विविध फुलांना मागणी मात्र वाढली आहे. परिणाम, २० फुलांच्या गड्डीला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहेत.
अन्य देशांशी स्पर्धा
यंदा तळेगाव पार्क व मावळ तालुक्यातील फुलांचे क्लस्टर अशी एकूण व्हॅलेंटाइन डेसाठी सुमारे ७५ लाख फुलांची निर्यात, तर एक कोटी फुलांचा देशांतर्गत पुरवठा झाला. काही वर्षांपूर्वी भारतातून व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने विविध देशांमध्ये गुलाबांची निर्यात व्हायची. मात्र विमान वाहतूक शुल्क वाढत असल्याने निर्यातदारांनी केनिया आणि इथिओपिया देशांतील फुलांना पसंती दिली. चीननेही गुलाब उत्पादनात वाढ केल्याने भारताच्या तुलनेत या देशांतील फुलांचा जागतिक बाजारपेठेत पुरवठा वाढला आहे. भविष्यात हे आव्हान असल्याचे मुकुंद ठाकर बोलून दाखवतात.
पुणे बाजार समितीमधील उलाढाल
निर्यात आता थांबली असून देशांतर्गत बाजारातील उलाढाल सुरू झाली आहे. पुणे बाजार समितीमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने पुणे आणि सातारा जिल्ह्यातून मंगळवार (ता. ११)पासून गुलाबांची आवक आणि मागणी सुरू झाली. ‘कट फ्लॉवर’चे प्रमुख अडतदार किरण ननावरे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की पुणे बाजारातून अहमदाबाद, बडोदा, सुरत, गांधीनगर सह बेळगाव, मंगळूर, हैदराबाद येथून मागणी वाढली आहे. ही आवक गुरुवार (ता.१३)पर्यंत दररोज सुमारे ४ ते ५ हजार गड्डी याप्रमाणात राहील. लाल फुलांच्या प्रति गड्डीला २५० ते ३०० तर ‘फ्रेंडशिप’साठी गुलाबी व पिवळ्या रंगाच्या २० फुलांच्या गड्डीला २०० ते २५० रुपये दर राहतील असेही ननावरे यांनी सांगितले.
संपर्क
- प्रदीप ढोले, ८६००२६८३६८ - (इंद्रायणी फ्लोरिकल्चर - तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क)
- मुकुंद ठाकर, ९८२३४४०८०३ (मावळ तालुका फूल उत्पादक संघ)
- किरण ननावरे, ९९२२९४६२३० (पुणे बाजार समिती, प्रमुख अडतदार (फुले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.