Vegetable Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Cultivation : बारमाही भाजीपाला लागवडीवर भर

Vegetable Farming : परभणी जिल्ह्यातील मिरखेल (ता. परभणी) येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी संभाजी गायकवाड यांनी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या उत्पादनावर भर दिला आहे.

Team Agrowon

Vegetable Farming Management : शेतकरी नियोजन

पीक : भाजीपाला

शेतकरी : संभाजी गायकवाड

गाव : मिरखेल, ता. जि. परभणी

एकूण क्षेत्र : ४.५ एकर

भाजीपाला लागवड : २ एकर

परभणी जिल्ह्यातील मिरखेल (ता. परभणी) येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी संभाजी गायकवाड यांनी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या उत्पादनावर भर दिला आहे. दर्जेदार भाजीपाला उत्पादन घेत स्वतःची विक्री व्यवस्था उभी केली आहे. या माध्यमातून वर्षभर मिळणाऱ्या खात्रीशीर उत्पन्नातून आर्थिक प्रगती साधली आहे.

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे गाव म्हणून मिरखेलची ओळख आहे. संभाजी गायकवाड यांची मिरखेल शिवारात ४.५ एकर जमीन आहे. मागील २० वर्षांहून अधिक काळापासून ते विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत आहेत. दरवर्षी दोन एकर जमीन ही भाजीपाला लागवडीसाठी राखून ठेवलेली असते. त्यात प्रत्येकी ५ ते १० गुंठे क्षेत्रावर विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली जाते. तसेच २० गुंठ्यांवर शेवंती, गलांडा, झेंडू, ॲस्टर आदी फुलांचे उत्पादन घेतले जाते.

स्वतःची विक्री व्यवस्था

जमीनधारणा क्षेत्र कमी असल्यामुळे शेतीमशागतीच्या कामांसाठी बैलजोडीचा सांभळ करणे शक्य नव्हते. त्यामुळे संभाजीराव यांनी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. शेतीकामांमध्ये संभाजी यांना पत्नी माया, सासू छायाबाई यांची मदत होते. सर्व कुटुंबीय भाजीपाला लागवडीपासून काढणीपर्यंतच्या कामांमध्ये सहकार्य करतात. शिवाय लागवड, पीक व्यवस्थापन, खुरपणी, काढणी आदी कामांसाठी आवश्यकतेनुसार मजूर लावले जातात.

दररोज सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीचपर्यंत शेतीकामे केली जातात. दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाजीपाला, फुलांची काढणी केली जाते. मालाची स्वच्छता, प्रतवारी करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे बाजारात चांगले दर मिळण्यास मदत होत असल्याचे संभाजीराव सांगतात. प्रतवारी केल्यानंतर भाजीपाला वाहनांमध्ये भरून परभणी येथे विक्रीसाठी घेऊन येतात. सकाळी ६ ते १० या वेळेत भाजीपाल्याची विक्री करून पुन्हा गावी येतात. लॉकडाउनच्या काळात स्वतःच्या वाहनाद्वारे परभणी शहरातील विविध वसाहतीमध्ये मित्र सुदाम माने यांच्या मदतीने घरपोच भाजीपाला विक्री त्यांनी केली आहे. खर्च वजा जाता दररोज चांगले पैसे हाती राहत असल्याचे संभाजीराव सांगतात. त्यातूनच भाजीपाला वाहतुकीसाठी स्वतःचे वाहन खरेदी केले आहे. तसेच गावात पक्के घर बांधले आहे.

जून लागवडीतून उत्पादन सुरू

यंदा जून महिन्यामध्ये प्रत्येकी ५ गुंठे क्षेत्रावर चवळी, कारले, दोडके, गवार, काकडी, दुधी भोपळा, काशीफळ, देवडांगर, वाल लागवड केली आहे. तसेच दोडक्यामध्ये आंतरपीक घेतले आहे. सलग १० गुंठे क्षेत्रावर कोथिंबीर लागवडही आहे. वेलवर्गीय भाजीपाल्याची ५ बाय १.२५ फूट अंतरावर ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केली आहे. दहा गुंठे क्षेत्रावर कांदा बियाणे फेकून लागवड केली आहे. दहा गुंठ्यांवर झेंडू, तर उर्वरित १० गुंठ्यांवर इतर फुलपिकांची लागवड आहे. मागील आठवड्यापासून कारले, दोडके, काकडी, कोथिंबीर, तोंडली या पिकांमध्ये काढणीस सुरुवात झाली आहे.

आगामी नियोजन

पुढील काळात १० गुंठे क्षेत्रावर टोमॅटो लागवडीचे नियोजन आहे. त्यानुसार टोमॅटोचे रोप तयार केली आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत चवळी, वाल, गवार, भोपळे यांचे उत्पादन सुरू होईल. त्यानंतर शेतजमीन रिकामी झाल्यावर प्रत्येकी ५ गुंठे क्षेत्रावर विविध भाजीपाला, तसेच झेंडू फुलपिकाची लागवड करण्याचे नियोजित आहे.

भाजीपाला पिकांमध्ये विविधता

बारमाही भाजीपाला पिकांच्या लागवडीवर भर दिला जातो. त्यात पालेभाज्यांमध्ये शेपू, पालक, चुका, मेथी, कोथिंबीर, तांदुळजा, लाल माठ, तर वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडके, कारले, दुधी भोपळा, तोंडली, काशीफळ (लाल भोपळा), देवडांगर (गोल भोपळा) आदी पिकांची लागवड असते. तसेच शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवार, चवळी, वाल, तर कंदवर्गीयमध्ये बीट रूट, कांदा, लसूण यासह वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची आदी भाजीपाला पिकांचे प्रत्येकी ५ गुंठे क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. बाजारातील मागणीनुसार अळू (चमकुरा), पुदिना तसेच भरिताच्या वांग्याचे देखील उत्पादन घेतात.

संभाजी गायकवाड, ९७६३५७१५५९, (शब्दांकन : माणिक रासवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT