Tur Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Farming : तूर पिकात आंतरमशागतीवर द्या भर

Tur Production : सध्या तूर हे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. मागील १५ ते २० दिवस पाऊस राहिल्याने विविध तणांचा प्रादुर्भाव वाढला असून,आंतरमशागतीची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे.

Team Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे

Tur Crop Management : सध्या तूर हे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. मागील १५ ते २० दिवस पाऊस राहिल्याने विविध तणांचा प्रादुर्भाव वाढला असून,आंतरमशागतीची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे.

वेळेवर कोळपणी

तूर पीक पहिले ३० ते ४५ दिवस तणविरहित ठेवावे. एक किंवा दोन खुरपण्या द्याव्यात.

कोळप्याच्या साह्याने पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणीमुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकतो. कोळपणी केल्यामुळे दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी.

तूर लागवड ९० सें.मी. अंतरावर केली असल्यास वखराद्वारे दोन ओळींतील मशागत करता येते. तसेच ९० सें.मी. लागवड अंतर असेल तर ट्रॅक्टरने मशागत करता येऊ शकते.

सरी काढणे

तिसऱ्या आठवड्यात कोळपणी करून चौथ्या आठवड्यात तुरीच्या दोन ओळींत नांगराच्या साह्याने ३० सें.मी. खोल सरी काढावी. शक्यतो सऱ्या उताराच्या आडव्या पाडाव्यात. सरी काढल्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांमध्ये पडणारा पाऊस सरीत मुरून जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होते. हा ओलावा पीक फुलोऱ्यात असताना व दाणे भरताना उपयोगी पडतो. सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील संशोधनानुसार तुरीच्या दोन ओळींत सरी काढल्यामुळे जमिनीतील ओलाव्यात १५ ते २० टक्के वाढ होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सिंचन व्यवस्थापन

कोरडवाहू क्षेत्रात पाणी देण्याची सोय असेल तर लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पहिले पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी फुलोऱ्यात व तिसरे शेगांत दाणे भरताना द्यावे. किंवा युरियाची २ टक्के प्रमाणे फवारणी करावी.

पाऊस नसेल तर जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याअगोदरच पाणी द्यावे.

पाऊस कमी झाला असल्यास आणि जमीन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही. जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास जास्त प्रमाणात फुलगळ होते. जमिनीतील ओलावा कमी होण्यापूर्वीच, फुले येण्याच्या सुरुवातीलाच संरक्षित पाणी द्यावे.

पिकात पाणी साचू देऊ नका.

तुरीची खालची पाने पिवळी पडली असल्यास नत्राची कमतरता असू शकते. दोन टक्के युरियाची किंवा दोन टक्के डीएपी (दोन किलो प्रति १०० लिटर पाणी) ही फवारणी करावी. ही फवारणी शक्य नसल्यास एकरी निंबोळी पेंड एक पोते, युरिया अर्धा पोते कोळपणीपूर्वी द्यावे.

महत्त्वाच्या बाबी

तुरीचा फुटवा वाढविण्यासाठी ३५ व ५५ दिवसांचे असताना शेंडा खुडवा किंवा ५० ते ५५ दिवशी शेंडा खुडणी करणे महत्त्वाचे आहे.

तूर अधिक सोयाबीन आंतरपीक पद्धती असल्यास काढणीनंतर वखराच्या दोन पाळ्या (सोयाबीनच्या ओळी) मारून मातीचे आच्छादन करावे. आच्छादन म्हणून सोयाबीनचे काड वापरावेत.

पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना १९:१९:१९ खताची १ ते २ टक्के प्रमाणे फवारणी करावी.

सिंचनाची सोय नसल्यास फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत २ टक्के पोटॅशिअम नायट्रेट फवारणी करावी.

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT