Pune News : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत मॉन्सून बरसत आहे. या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. मागील आठ दिवसांत ८.४४ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. मात्र, अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.
सध्या जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १२ धरणांत नव्याने पाण्याचा येवा सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासांत ०.९७ टीएमसी पाण्याची आवक झाली. पूर्व पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असला तरी पश्चिम पट्ट्यात कमी-अधिक पाऊस होता. यात मुठा खोरे, नीरा, कुकडी आणि भीमा खोऱ्यांतील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिल्याने ओढेही खळाळून वाहू लागले आहेत.
धरणांत सुरुवातीला कमी आवक होती. परंतु पावसाचा जोर वाढल्यानंतर आवकेत काही प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील २६ धरणांतील पाण्याची उपयुक्त क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. गेल्या वर्षी जवळपास ही सर्व धरणे भरली होती. तर, उजनीत कमी पाणीसाठा झाला होता. मात्र, उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यानंतर वेगाने पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. परंतु मॉन्सून दाखल झाल्यानंतर धरणात आवक सुरू झाली आहे.
एक ते १४ जून या कालावधीत धरणनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
टेमघर ९७, वरसगाव ६८, पानशेत ६३, खडकवासला ९३, पवना ७८, कासारसाई ५६, कळमोडी ५२, चासकमान १०४, भामा आसखेड २६, आंध्रा ३५, वडीवळे १६, नाझरे १४२, गुंजवणी ६३, भाटघर १३१, निरा देवघर ७२, वीर ९८, पिंपळगाव जोगे २४, माणिकडोह ५२, येडगाव ५०, वडज २२, डिंभे ५५, चिल्हेवाडी २१, घोड १६०, विसापूर ९९, उजनी १४३.
शुक्रवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणांत आलेला पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
पानशेत ०.०१, खडकवासला १.१०, पवना ०.०८, चासकमान ०.०१, आंध्रा ०.१०, गुंजवणी ०.०२, भाटघर ०.०९, निरा देवघर ०.०२, वीर ०.९७, पिंपळगाव जोगे ०.९५, माणिकडोह ०.०५, येडगाव १.२२, विसापूर ०.०५, उजनी ४.७२.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.