River Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

River Conservation : नद्या वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ आवश्यक

River Water : सध्या पाण्यासाठी आपल्या जिवाला काहीच कष्ट पडत नसल्यामुळे आपल्याला शुद्ध पाण्याचे, वाहत्या नद्यांचे अजिबात महत्त्व राहिले नाही. परिणामी, घरामध्ये प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापनाचीही गरज राहिली नाही. या निसर्ग संपत्तीचा नाश सुरू झाला.

Team Agrowon

डॉ. नागेश टेकाळे

River : सध्या पाण्यासाठी आपल्या जिवाला काहीच कष्ट पडत नसल्यामुळे आपल्याला शुद्ध पाण्याचे, वाहत्या नद्यांचे अजिबात महत्त्व राहिले नाही. परिणामी, घरामध्ये प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापनाचीही गरज राहिली नाही. या निसर्ग संपत्तीचा नाश सुरू झाला. जिच्यासोबत आपले जीवनच जोडले गेलेले आहे, तिला वाचविण्यासाठी खरेतर प्रयत्नांची शर्थ केली पाहिजे.

पूर्वी गावचे सर्व लोक पिण्याच्या पाण्यासाठीही वाहत्या नदीवर अवलंबून असत. घरी नळाने पाणी आल्यामुळे नदी ही वापरण्याची त्यातही कपडे धुण्याची जागा झाली. कपडे धुण्यासाठीही अनेक रासायनिक घटक वापरले जाऊ लागल्यामुळे ते घटक पात्रात शिरले. यातूनच जलपर्णीने नदीत प्रवेश केला. ही जलपर्णी माता दहा बारा नव्या रोपट्यांना जन्म देऊन सुमारे १५-२० किलो वजनाची झाल्यानंतर मृत्यूनंतर तळाला जाऊ लागली. तिथे तिचे गाळात रूपांतर होऊ लागले. नद्या थांबण्यास जलपर्णी, विविध शेवाळ आणि इतर पान वनस्पती जबाबदार आहेत. या वनस्पतींच्या पृष्ठभागावरील दाट थरामुळे पाण्यात सूर्यप्रकाश जाणे कमी झाले. प्राणवायूही कमी मिसळला जाऊ लागला. परिणामी, नदीपात्रातील मासे कमी होऊ लागले. नदी स्वच्छ ठेवणारा हा महत्त्वाच्या घटकाचे अस्तित्व हरवून गेले तर नदी अस्वच्छ का नाही होणार?

नद्या थांबण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नदी पात्रातील वाळूचा बेसुमार उपसा आणि तिच्या पाण्याचा शेतीसाठी वापर. शेती ही प्रामुख्याने पाण्यावर अवलंबून, त्यामुळे नदीकाठी शेती बहरत गेली. नदीकाठची वृक्ष संपदा नष्ट झाली. नदीला एका विशिष्ट टप्प्यात बांधून ठेवणारी लहान मोठी झाडे तिच्यावर बंधूप्रमाणे प्रेम करतात. अशा झाडे व त्यांची मुळेच नसल्यामुळे नद्या बंधमुक्त झाल्या. शेती एकदम नदीच्या काठावर आली. येथील शेतीतून वाहणारे पाणी आणि गाळासोबतच रासायनिक खते, कीटकनाशके आली. जसा वाळू हा नदीचा प्राण आहे, तशीच नदीकाठची झाडे. नद्याच्या उगमाजवळ एकेकाळी असलेली घनदाट वृक्षांचे जंगलही राहिलेले नाही. नदीच्या उगमाचे मुख वृक्षाअभावी उघडे राहणे म्हणजे भविष्यात तिचे अस्तित्व पुसण्यासारखेच आहे. वाहती नदी, ओढे, नाले, नदीच्या लहान मोठ्या उपनद्या आणि त्यांचे जाळे हे आपल्या शरिरातील रक्तभिसरण संस्थेप्रमाणे असते. या संस्थेत धमणी आणि निला या दोन मुख्य वाहिका असतात. एक अशुद्ध रक्त वाहून नेते, तर दुसरी शुद्ध. शुद्ध पाणी वाहणाऱ्या नाले, ओढे, छोटेमोठे प्रवाह वाहत येऊन नदीला मिळाल्यानंतर नदी वाहती होते. दुर्देवाने हे छोटे प्रवाह कोरडे पडत चालले आहेत. उपनद्या गाळाने भरून कोरड्या पडल्या आहेत. त्या केवळ अशुद्ध, प्रदूषित पाणी वाहणाऱ्या धमन्या झाल्या आहेत. आता नद्याच आटून चालल्या आहेत, म्हटल्यावर त्यावर अवलंबून असलेल्या आड, विहीरी आटून जातील नाहीतर काय?

नद्यांना वाहते ठेवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. त्याचे उपक्रमही स्तुत्य आहेत. पण आपण हे का करत आहोत, हे का केले पाहिजे याची जाण सामान्यापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नदीवर केवळ मानवाचा हक्क नाही, हे समजून घ्यावे लागेल. नदीवर निसर्गामधील सर्व प्राणिमात्राचा, वृक्ष वल्लींचा तेवढाच आणि त्यात राहणाऱ्या जलचरांचा तर त्या सर्वांहून अधिक अधिकार आहे. कारण त्यांचे जगणेच त्यावर अवलंबून आहे. अन्य पशुपक्ष्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी हवे. तर माशासारख्या जलचरासाठी पाणी आणि त्यातील विरघळलेला प्राणवायू हे खरे जीवन आहे. नदीचे व्यवस्थापन सुरू करण्यापूर्वी सर्व प्रथम या सर्व मुददयांना अग्रस्थानी ठेवणे गरजेचे आहे. नदीत जलचर असतील तरच ती नदी स्वच्छ राहून वाहती राहते. जलचरांच्या जगण्यातील प्रजोत्पादनासह सर्व क्रियांसाठी स्वच्छ पाण्यासोबतच मुबलक वाळू आवश्यक असते. अन्नासाठी किनाऱ्यावर मुबलक वृक्षसंपदा असावी लागते. थांबलेली नदी वाहती करणे हे मोठे शास्त्र आहे. त्यामागील विज्ञान समजावून घ्यायला हवे. एखाद्या नदीचा जन्म आणि तिचे वाहणे यास हजारो वर्षांचा इतिहास आहे. अशाच एखाद्या नदीचा मृत्यू होण्यात तिच्या स्वतः बरोबरच अनेकांना वेदना होत असतात. नदीच्या मृत्यूपूर्वीच्या या वेदनांचा अनुभव स्वत:च्या मृत्यूमधून स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांनी घेतला. ते मूळचे आय.आय.टी., कानपूर येथून सेवानिवृत्त झालेले प्रोफेसर डॉ. जी. डी. अग्रवाल. त्यांनी दूषित गंगेला शुद्ध करण्यासाठी शासनाला आवाहन केले.

अनेक उपाययोजना सुचविल्या, एवढेच नव्हे तर या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गंगामाईच्या किनारी उपोषणाला बसले. त्यांचे हे ११२ दिवसांचे उपोषण पूर्णपणे वाया गेले. वयाच्या ८६ व्या वर्षी १९ ऑक्टोबर १९८२ ला ऋषिकेशलाच त्यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला. प्रो. अग्रवाल यांचा गंगेसाठी केलेल्या उपोषणाचा, तिच्या वेदना अनुभवून स्वत: पाण्याचा एक थेंबही मृत्यूआधी जिभेवर न घेण्याचा आणि मृत्यूस ११२ दिवसांनी सामोरे जाण्याचा प्रसंग अनेक नदी प्रेमीसाठी जास्त क्लेशकारक होता. डॉ. अग्रवाल यांना मी प्रत्यक्ष भेटलो आहे, म्हणूनच हा प्रसंग माझ्यासाठी जास्त वेदनादायी होता.
काय मागणी होती या संताची? तर माझ्या गंगेला मुक्तपणे वाहू द्या. तिचे स्वच्छ पाणी तिच्या तिरावरील कोट्यवधी जनतेच्या मुखात जाऊ द्या. तिची गटार गंगा करू नका. उगमाजवळ तिला अडवू नका. तेथे खोदकाम करू नका.
असाच दुर्देवी अंत २०११ मध्ये स्वामी निगमानंद सरस्वती यांचा सुद्धा झाला. त्यांनीही गंगा शुद्धीकरण आणि गंगेच्या उगम परिसरात खोदकाम थांबविण्यासाठी ११५ दिवसांचा आमरण उपवास केला होता. या दोन्हीही जल सेवकांची एकच मागणी होती की गंगेचे पाणी स्वच्छ करा आणि तिला तिच्या मूळ स्वरूपात खळाळत वाहूद्या.

भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री हे काशी परिसरातील गंगा नदीपलीकडील गावामधले रहिवासी. गंगा नदीच्या पाण्यातून डोक्यावर दप्तर घेऊन क्वचित चालत किंवा पोहत दुसऱ्या तीरावर येत. त्यात त्यांचे कधी कपडे भिजले तर तिथेच सुकवण्यास ठेवून दुसरे कपडे घालून शाळेत जात. प्रतिदिन गंगेला प्रणाम करून तिच्या पात्रात प्रवेश करणारा भारत मातेचा हा थोर सुपुत्र परतीच्या प्रवासात सुद्धा पुन्हा नमन करत असे. या प्रवासात या स्वच्छ नदीचे कितीतरी थेंब त्यांच्या मुखात गेले असतील? ही ऊर्जाच नव्हती का? ताश्कंद करारानंतर त्यांचे पार्थिव भारतात आले, तेव्हा अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या मुखात प्रवेश करताना हीच गंगा माता कितीतरी वेळा थरथरली असेल! जीवनाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत प्रत्येक टप्प्यात नदी आपल्या आयुष्यात राहते, रेंगाळते हे खरेच, पण मानसिक पातळीवर अनेक वेळा ती चक्क ठाण मांडून बसते. तिला वाहती, जिवंत ठेवण्यासाठी आपल्या जिवाचे दान देणाऱ्या स्व. डॉ. अग्रवाल यांना नेमके हेच म्हणावयाचे होते का?

नदीची स्वच्छता म्हणजे काय?

गंगेने भारताचा ७९ टक्के प्रदेश व्यापलेला आहे. आज ती उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, हिमाचल, छत्तिसगढ, झारखंड, बिहार, प. बंगालची खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी असल्याचे मानले जाते. पण आता ती जीवनवाहिनी राहिलेली आहे का? सहाशे पन्नास दशलक्ष लोकांना पाणी देणारी ही गंगा आज जगामधील दुसऱ्या क्रमाकांवरील, तर भारतामधील प्रथम क्रमांकाची प्रदूषित नदी आहे. धार्मिकदृष्‍ट्या ती पवित्र नदी आहे. तिला स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत तब्बल २२५० कोटी रुपये खर्च केले. पण त्यातील बहुतांश पैसा हा तिच्या घाटाच्या सुशोभीकरणाबरोबरच पर्यटन वाढविण्यासाठी खर्च झाला. ऋषिकेश, हरिद्वार, वाराणशी येथील गंगा अतिशय सुंदर, देखणी दिसते. पण येथून तिचा गंगासागरपर्यंतचा प्रवास पाहवत नाही. याला मुख्य कारण आपण नदीच्या बाह्य स्वरूपास दिलेले महत्त्व.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT