Village Story Agrowon
ॲग्रो विशेष

Village Story : चकवा

Team Agrowon

समीर गायकवाड

Story : सुनीताच्या थोरल्या भावाचा, औदुंबरचा आदल्या रात्रीच फोन आला होता. ‘‘अक्काची तब्येत लई खालावलीय. आबांनी दिकून जिवाची धास्ती घेतलीय, ते दोघंबी तुझी वाट बघत्येत तायडे; तवा तू ताबडतोब निघून ये.’’ इतकंच त्यानं सांगितलं होतं. अक्का म्हणजे सुनीताची आई पारूबाई, आबा म्हणजे सुनीताचे वडील सुखदेव गणाजी भोसले. सुखदेव- पारूबाई या जोडप्याच्या सहा अपत्यांपैकी औदुंबर सर्वांत थोरला. सुनीता त्याच्या पाठची. सहदेव, महादेव या जुळ्यानंतर अनिता नि सर्वांत शेवटी अनंता झालेला. सुखदेवच्या वडिलांचं गावात वजन होतं. भरपूर स्थावरजंगम मालमत्ता होती. घराचं छानसं गोकूळ होतं. त्यांच्या सुखात बिब्बा घातला तो थोरल्या जावयाने.

सुनीता अभ्यासात हुशार होती. पोरीला प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून सुखदेवाने तिला ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण दिलं. अभ्यासात फारशी गती नसणाऱ्या, चिकण्या चोपड्या दिनकरवर तिचा जीव जडला. दिनकरचा स्वभाव आणि रागरंग सुखदेवास ठीक वाटत नव्हते, तरीही पोरीचा हट्ट म्हणून त्यानं मान्यता दिली. सुनीताचा नवरा दिनकर हा भयंकर पाताळयंत्री नि अप्पलपोटा होता. संपत्ती पाहूनच त्यानं सुनीताला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. सुखदेवने आपल्या मुलीला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते पटलंच नाही. ती सदैव पतीची बाजू घ्यायची. दरम्यानच्या काळात अनिता वगळता तिने कुणालाही साधा फोन केला नव्हता, चार ओळींचे पत्रही पाठवलं नव्हतं.

आता एकदम आई अत्यवस्थ असल्याचा फोन आल्याने तिच्या मनात कोलाहल माजला होता. पहाटेच्या सुमारास तिला झोप लागली. सकाळी गाडी भोपाळमध्ये पोहोचली तेव्हा गावाकडे फोन करावा असं तिला राहूनराहून वाटत होतं. तिने औदुंबरला फोन लावला. त्याचा आवाज तिला खूप खोल गेल्यासारखा वाटला. तो काय सांगत होता हे तिला रेल्वेच्या गोंगाटापायी नीट ऐकू येत नव्हतं. अकराच्या सुमारास ट्रेन खांडवा स्टेशनला पोहोचली तेव्हा औदुंबरसह अनंता, अनिताचाही फोन येऊन गेला. फोन कनेक्ट करेपर्यंत कट होत होता. आपण वेळेत घरी जाऊ का, असा विचार करत असतानाच दिनकरचा फोन आला. तो नेहमीप्रमाणे सासरबद्दल नकारात्मक बोलत होता.

गाडीने वेग पकडला होता. बारा वाजण्याच्या सुमारास एक मोठा आवाज झाला, बहुधा अर्जंट ब्रेक लागला होता. मिनिटभरासाठी गाडी जागेवरच उभी होती. त्याचवेळी सुनीताच्या फोनवर पुन्हा एकदा औदुंबरचा फोन येऊन गेला. औदुंबरचा फोन लागेनासा झाला तेव्हा ती अस्वस्थ झाली. त्या दरम्यानच तिच्या डब्यात एक विलक्षण ओजस्वी, कृशदेहाची देखणी वृद्धा शिरली. चालत्या गाडीत ही वृद्धा कशी काय शिरली असा तिला प्रश्‍न पडला. ती वृद्धा थेट तिच्याशेजारी सीटवर येऊन बसली. तिची काया पिवळट असूनही चेहऱ्यावर तेज होते. तिचा पेहराव साक्ष देत होता की ती चांगल्या घरातली असावी. सुनीताची अस्वस्थ मुद्रा पाहून वृद्धेने विचारलं, ‘‘मुली काही अडचण आहे का बाळा?’’

परप्रांतात असूनही तिने इतक्या मायेने मराठीत प्रश्‍न केल्यानं सुनीताला नवल वाटलं. वृद्धा एकटीच होती, छोटीशी बॅग वगळता काही सामानही नव्हतं. तिचा आवाज अगदी मृदू होता. तिच्या डोळ्यांत वेगळंच आपलेपण होतं. ट्रेनने वेग पकडताच दोघींची गट्टी जमली. ओढाळ वृद्धेने सुनीताला बोलतं केलं. तिची अस्वस्थता, गाऱ्हाणंही ऐकून घेतलं. सुनीता रडतच बोलत होती, आईच्या आठवणींनी व्याकूळ झाली होती. दिनकरशी तिचं लग्न थाटात झालं होतं. दिनकरने लग्नात सासऱ्याला खिंडीत गाठून सर्व मागण्या पूर्ण करून घेतल्या होत्या. आपला इंगा दाखवत पहिल्या दिवाळसणाला सासरी आल्यावर सुनीताच्या वाटणीची जमीन मागितली होती.

रोडलगत असणारा भाग मागितला, ज्यात सुखदेवच्या वडिलांची समाधी होती. यावरून घरात भयंकर वादळ उठलं. दिनकरनं सुनीताला भडकावत आपला हिस्सा दिला जात नाही असं सांगून माहेरी पाठवलं. अतिलाडात वाढलेल्या सुनीताला बोलण्यातला आचपेच नव्हता. रागाच्या भरात आपल्या जन्मदात्याला तिने दूषणे दिली. सुखदेव तिच्यापुढे नमला. मग दिनकरने अव्वाच्या सव्वा मागण्या केल्या. सुखदेवने मधला मार्ग काढला, सुनीताच्या हिश्‍शाच्या वाटणीची बाजारभावाने जी काही किंमत होती तेवढे पैसे दिनकरला दिले. त्यात तो कंगाल होण्याच्या अवस्थेत आला. सर्वांचा जीव तळमळला. परिणामी, त्या दिवसापासून सुनीताला माहेरचे दरवाजे बंद झाले. त्यानंतर सुनीता आजच माहेरी निघाली होती.

तिची हकीकत ऐकून होताच वृद्धेने तिच्या चुका दाखवून दिल्या. हक्क बजावण्याआधी कर्तव्ये निभावणं महत्त्वाचं असतं हे पटवून दिलं. हिस्सा अवश्य मागावा मात्र त्यात नैतिकता असली पाहिजे असंही ठणकावलं. जन्मदात्यांचा अवमान करण्याआधी हजारदा विचार केला पाहिजे, कारण ते आपल्यासाठी झिजलेले असतात. जोडीदाराचं ऐकावं मात्र त्यामागचा हेतूही ओळखला पाहिजे. संपत्तीचा हव्यास माणसाला आयुष्यातून उठवतो. त्यामुळे हाव किती करायची यालाही मर्यादा असली पाहिजे नि ज्याचं चुकतं त्याला सुनवता आलं पाहिजे! वृद्धेने एकापाठोपाठ एक टोचण्या दिल्या.

तिच्या बोलण्याने डोळे उघडलेल्या सुनीताचे डोळे पाणावले. मन पश्‍चात्तापाच्या आगीत होरपळून निघालं. ती रडू लागताच वृद्धेने तिला जवळ घेतलं. तिच्या केसांतून सायमाखला हात फिरवला. सांत्वन केलं. सुनीताने तिच्या मांडीवर शिणलेलं मस्तक टेकवलं. मायेने ओथंबलेल्या तिच्या स्पर्शाने झोप कधी लागली ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा टळटळीत दुपार झालेली. सुनीताचा नकार डावलत वृद्धेने आपल्या हाताने आग्रह करून खाऊ घातलं. तिच्या हातांना विलक्षण चव होती, गेली कित्येक वर्षे सुनीताने अशी चव चाखली नव्हती. विमनस्क स्थितीत असूनही ती पोटभर जेवली.

बोलता-बोलता सुनीताने वृद्धेला तिच्याविषयी विचारलं तेव्हा ती नुसतीच हसली. तिचं हास्य केविलवाणं करुण होतं. सुनीताने पुन्हा-पुन्हा विचारल्यावर तिने बॅगेवर असणारा छापील मोबाइल नंबर सांगितला. संध्याकाळ झाली तेव्हा दोघी शांत बसल्या होत्या. सुनीताचं सारं लक्ष खिडकीबाहेर होतं, रेल्वेसोबत पळणाऱ्या झाडांच्या पाठशिवणीतून तिला बालपण, गाव, भूतकाळ नि नातीगोती आठवली. तिची तगमग वृद्धेने निमिषार्धात ओळखली. तिच्या पाठीवरून ती आपला हात फिरवत राहिली. सुनीताचे दुःखाचे कढ शांत होत गेले. त्याक्षणी वृद्धेचे डोळे पाणवले, आपले अश्रू चतुरतेने टिपत तिने बुडू लागलेल्या सूर्यबिंबावर नजर खिळवली. बराच वेळ त्या दोघी मौन होत्या. अंधार घनगर्द झाला तेव्हा सुनीता पुन्हा वृद्धेच्या मांडीवर झोपी गेली. वृद्धा अत्यंत आस्थेने रात्रभर तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती, तेव्हा सुनीताचा चेहरा विलक्षण शांत तृप्त वाटत होता. पहाटेच्या सुमारास सोलापूर आलं तेव्हा तिने सुनीताला जागं केलं. निघताना सुनीतानं तिला गच्च मिठी मारली. प्लॅटफॉर्मवरून पुढे जाताना मागे वळून पाहत हात हलवले. डबडबल्या डोळ्यांच्या वृद्धेने आपले थकलेले भेगाळलेले हात हलवले. निरोपाची निरवानिरवी झाली.

अनंता सुनीताला न्यायला आला होता. ती त्याच्या गळ्यात पडून रडली. आई बरी आहे का म्हणून विचारत राहिली. तो प्रश्‍नांना बगल देत राहिला. जीपने तासाभरात ते बोराटीला पोहोचले. तिच्या डोळ्यात आईच्या आठवणींचा समुद्र गोळा झाला होता. गावात शिरल्यापासून तिला काही तरी चुकल्यासारखं वाटत होतं. वस्तीचा रस्ता लागला तशी तिची बेचैनी वाढली, कारण साऱ्या रस्त्याने अनंता शांत होता. वस्तीपाशी माणसांची गर्दी दिसताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिने वस्तीच्या दिशेने धाव घेतली. मात्र तिथे जे दिसलं त्यानं तिच्या हृदयाच्या चिंधड्या उडाल्या. एका कोपऱ्यात सारवण करून दिवा लावून त्यावर दुरडी झाकली होती नि जवळच पारूबाईचा हार घातलेला फोटो होता.

सुनीताने जोराने किंचाळी मारली, आईच्या नावाने हंबरडा फोडला नि ती धाय मोकलून रडू लागली. अनिता तिच्याजवळ आली, तिने तिला कवेत घेतलं. माणसांच्या घोळक्यात बसलेले थकलेभागले आबा तिथे आले. मग मात्र सुनीताचं अवसान गळून पडलं. आपल्या म्हाताऱ्या बापाच्या गळ्यात पडून ती लहान मुलीसारखी हमसून रडू लागली. माझं चुकलं, आई मला माफ कर गं माय, मला पोटात घे गं माय, म्हणत ती आबांच्या कुशीत शिरून रडू लागली. आबांनी तिला शांत केलं. जिथं पारूबाईच्या देहाला अग्नी दिला होता तिथं सुनीताला नेण्यात आलं. मायलेकीची भेट चुकली होती. सुनीताला आयुष्यभर डागण्या देईल असा तो क्षण होता.

आदल्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारासच पारूबाईचं प्राणपाखरू उडून गेलं होतं. सुनीता येईपर्यंत अंत्यविधी केले जाऊ नयेत म्हणून सुखदेवने बऱ्याच विनवण्या केल्या, मात्र गावाकडे सांज होण्याआधीच अंत्यविधी केले जातात, त्याला अपवाद केलेच जात नाहीत. शिवाय सुनीताचा प्रवास लांबचा होता, ती कधी येईल याचा नेम नव्हता नि गेल्या दीड दशकापासून तिचं गावाशी नातंदेखील नव्हतं. त्यामुळे सूर्यास्त होण्याआधीच पारूबाईच्या देहाला मुखाग्नी देण्यात आला. पारूबाईचं देहावसान झालं तेव्हा औदुंबरने सुनीताला बरेच कॉल केले होते, मात्र आवाजामुळे काहीच कळलं नव्हतं. अस्थी विसर्जनाच्या आधी तिने दिनकरला गावी बोलवलं नि त्याला सडकून सुनावलं. अखेर त्यालाही चूक मान्य करावी लागली.

दशक्रियाविधी झाल्यावर सुनीता, दिनकर मथुरेला परत निघाले. सुनीताचं अख्खं माहेर तिला निरोप द्यायला स्टेशनवर आलं होतं. भरल्या डोळ्याने तिने सर्वांचा निरोप घेतला. आबांनी आसावल्या डोळ्यांनी तिला अलविदा केलं. सुनीताचा परतीचा प्रवास सुरू झाला. तेवढ्यात तिला येतानाच्या प्रवासात भेटलेल्या वृद्धेची आठवण झाली. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने फोन करायचं ठरवलं. वृद्धेने सांगितलेलं नाव, पत्ता आणि बॅगेवरचा छापील नंबरही सुनीताच्या ध्यानात होता. तिने लगबगीने फोन लावला.

पलीकडून एका पोक्त स्त्रीचा आवाज आला. सुनीता बोलता बोलता स्तब्ध झाली, धाय मोकलून रडू लागली. काय करावं, काय नाही तिला काहीच सुचत नव्हतं. अखेर दिनकरने तिच्या हातातला फोन घेतला. बोलताना त्याच्याही चेहऱ्यावरचे भाव वेगाने बदलत गेले. झालं असं होतं, की त्या वृद्धेने जे नाव सांगितले होते, त्यांचाच तो मोबाइल नंबर होता, जिने फोन उचलला होता ती त्या स्त्रीची एकुलती एक मुलगी होती. तिने सांगितलं की पंधरा वर्षांपूर्वीच तिच्या आईचं निधन झालंय. तिच्या आईचं वर्णन आणि स्वभाव सारं त्या वृद्धेशी मिळतंजुळतं होतं. त्या वृद्धेचा स्पर्श ओळखीचा का वाटला, तिच्या हातची चव आपल्या परिचयाची का वाटली याचं उत्तर सुनीताला मिळालं होतं. आपली आई आपल्याला भेटून गेली, पण त्याचा चकवाही आपल्याला ओळखता आला नाही याचं तिला विलक्षण दुःख झालं. काही चकवे काळजाला चटके लावून जातात!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT