Solapur News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तालुक्यातील १४७६ शेतकऱ्यांचा पीकविमा भरपाईपोटी शासनाने दुसरा हप्ता न दिल्यामुळे रखडला आहे. वंचित शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी पीक विम्याच्या पैशाची आवश्यकता असून, शेतकरी सध्या पीक विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील ६३ हजार १०१ शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मका, कांदा, भुईमूग या पिकांचा विमा भरला. विम्याचा हप्ता शासनाने भरल्यामुळे पीकविमा भरण्यासाठी शासनाने मोठी जनजागृती केली होती.
परंतु, तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस व पाणी लागून पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शासनाकडून जनजागृती अपेक्षित होती; परंतु त्या पद्धतीने जनजागृती न झाल्यामुळे फक्त १९ हजार १५५ शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची ऑनलाइन तक्रार दिली होती. त्यामध्ये ४४८२ शेतकऱ्यांनी दुबार तक्रार केल्याच्या कारणास्तव विमा कंपनीने त्या तक्रारी रद्द केल्या.
१४ हजार ४७३ शेतकऱ्यांची २४ कोटी २५ लाख ७८७ रुपयांची भरपाई गत मे महिन्यात जमा केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना खरीप मशागत व पेरणी, बियाण्यांसाठी पैसे उपलब्ध झाले. त्यामुळे ते शेतकरी सुखावले; मात्र तालुक्यातील ३५४५ शेतकऱ्यांनी काढणी पश्चात तक्रारी केल्या होत्या. त्यातील २०६९ तक्रारी रद्द झाल्या. १४७६ शेतकऱ्यांच्या तक्रारी ग्राह्य धरल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना ७६ लाख २४ हजार ७०६ रुपये भरपाई मिळणार आहे.
शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी हिश्श्याचे पैसे प्राप्त होताच वंचित शेतकऱ्यांचे पैसे तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.- विनायक दीक्षित, जिल्हा व्यवस्थापक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी
बाजरी, तूर, मका या पिकांचा विमा भरला होता; मात्र विमा कंपनीने फक्त बाजरीची भरपाई दिली आहे. अद्याप तूर पिकाची भरपाई दिली नाही. तक्रार एकदाच केली, पंचनामे एकदाच केले, मग तूर पिकाची भरपाई का थांबवून ठेवली?- दत्तात्रय शिंदे, शेतकरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.