Nashik Rain
Nashik Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain : नाशिकमध्ये वादळी पावसाने सुगीच्या दिवसांत ‘शिमगा’

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : कळवण, सटाणा, देवळा व मालेगाव तालुक्यांत शनिवारी (ता. ४) मध्यरात्रीपासून वादळी पावसाचा प्रामुख्याने मोठा फटका बसला.

त्यामुळे टोमॅटो (Tomato) व हिरव्या मिरची लागवडी आडव्या झाल्या होत्या. तर रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह रात्री कोसळलेल्या पावसाने गहू, द्राक्ष, कांदा पिकांना मोठा तडाखा बसला आहे.


इगतपुरी व नाशिक तालुक्यांत काही ठिकाणी गारपीट झाली.

जिल्ह्यात बागायती क्षेत्रावर १९०५.५५ तर बहुवार्षिक फळपिकांचे ७७९.८० हेक्टर क्षेत्रावर असे एकूण २६८५.३५ हेक्टर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली. मात्र सोमवार मध्यरात्रीनंतर अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने नुकसानीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ऐन सुगीच्या काळात वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात शिमगा केला आहे.
रात्रीच्या वेळी पाऊस व वातावरणातील गारठ्याचा पिकांना फटका आहे.

सोमवारी (ता. ६) जिल्ह्यात नाशिक तालुक्यात सर्वाधिक ८, त्र्यंबकेश्‍वर ६.४, इगतपुरी ६, तर निफाड तालुक्यात ४.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मार्च महिन्यात सरासरीपेक्षा हा पाऊस नुकसानग्रस्त तालुक्यात २ ते २० पट अधिक नोंदविला गेला आहे.

गहू पिकात सर्वाधिक नुकसान निफाड, नाशिक, येवला, नांदगाव या तालुक्यांत झाले आहे. भाजीपाला पिकात नाशिक, कळवण व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात नुकसान झालेले आहे.

तर द्राक्षासारख्या बहुवार्षिक पिकात निफाड व नाशिक तालुक्यांत मोठे नुकसान आहे. तर आंबा पिकाचे नाशिक, त्र्यंबकेश्‍वर व चांदवड तालुक्यांत नुकसान आहे.

अनेक भागांत लेट खरीप कांदा काढणी अंतिम टप्प्यात असताना पावसामुळे कांदा भिजून नुकसान वाढले आहे. यामध्ये सिन्नर, चांदवड, निफाड या भागांत फटका आहे.
गहू पीक सोंगणीवर असताना निफाड तालुक्यात पीक आडवे झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. सध्या द्राक्ष काढणी हंगामाला गती आली असताना पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. अनेक भागांत सुरू असलेली द्राक्ष काढणी सध्या ठप्प झाली आहे. फटका बसलेल्या भागात द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागले आहेत.

तर निफाड तालुक्यातील उगाव, पिंपळस, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, रौळस पिंपरी परिसरात काही शेतकऱ्यांच्या बागा आडव्या झाल्या आहेत.


कृषी विभागाने जाहीर केलेले जिल्ह्यात पीकनिहाय प्राथमिक नुकसान (हेक्टरी, ता. ६ अखेर)
पीक... नुकसान क्षेत्र
गहू... १८०३.३०
उन्हाळी बाजरी... ०.१०
भाजीपाला व इतर पिके... ३७.१५
द्राक्ष... ७७७
आंबा... २.८०

शेतकऱ्यांनी कळविलेली नुकसानीची स्थिती
- पाऊस कमी वादळ जास्त असल्याने कांदा, गहू, मका, हरभरा पीक भुईसपाट
- अनेक भागांत द्राक्षमालाचे पुढे थांबले.


- काढणीसाठी आलेल्या द्राक्षमालामध्ये काही ठिकाणी तडे
- आंब्याच्या मोहराची प्रचंड कुज, बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने फळ गळ, मोहर गळ


- वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मका, चारापिके, फुलोऱ्यात असलेल्या डाळिंबाचे नुकसान
- लेट खरीप हंगामातील कांदा पिकाचे नुकसान
उन्हाळ कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; पात पिवळी


रात्री विजांच्या कडकडाटासह जोराचा वारा व पाऊस झाला त्यामुळे सोंगणीला आलेला गहू पडले. काढलेला कांदा भिजला. एकीकडे शेतीमालाला भाव नाही, तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
- प्रताप दाभाडे, शेतकरी, बोकटे, ता. येवला

वादळी पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, गहू पीक जमीनदोस्त झाले. द्राक्ष बागामध्ये मणी तडे जाण्यास सुरुवात झाली, काढणीला आलेला कांदा भाव नसताना ही पावसानेही झोडपला.

द्राक्ष व गहू उत्पादक लहरी हवामान व निसर्गचक्र बदलामुळे हवालदिल आहोत. शेतकऱ्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने निसर्गाने शिमगा व शासनाने होळी केली.
- दत्ता जाधव, शेतकरी, मोहाडी, ता. दिंडोरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT