Chandrapur News : दहशतवाद, नक्षलवाद यांना पोसण्याचे काम काँग्रेसच्या काळात झाले. गडचिरोलीत नक्षलवादामुळे सामान्यांचे जगणे अवघड झाले होते. दरदिवशी घडणाऱ्या बॉम्बस्फोटामुळे देशातील प्रत्येक जण भयभीत होता. आता दहशतवाद, नक्षलवाद अंतिम घटका मोजत असून गडचिरोलीदेखील नक्षलवादाऐवजी पोलाद हब म्हणून देशभरात ओळखले जात आहे आणि हाच खरा नवा भारत असल्याचे प्रतीपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
चंद्रपूर येथे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार तसेच गडचिरोली लोकसभेचे अशोक नेते यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. ८) आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हंसराज अहीर, रामदास आठवले उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, की काँग्रेसने देशात नेहमीच तुष्टीकरणाला प्रोत्साहन दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळू नये याकरिता काँग्रेसने प्रयत्न केले. धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचे पाप देखील काँग्रेसच्या माथी आहे. देशात दहशतवाद, नक्षलवाद पसरविण्यालाही कॉंग्रेसच दोषी आहे. स्वातंत्र्यानंतरही काश्मीरची परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तरही कॉंग्रेसवाल्यांकडेच आहे.
यावर्षी त्यांनी लोकसभेसाठी जाहीर केलेला वचननामा मुस्लीम लीगच्या शब्दानुसार आहे, अशी जहरी टीकादेखील त्यांनी केली. देशातील ८० कोटी सर्वसामान्यांना मोफत धान्य दिले जात आहे. ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सन्मान निधी पोहोचतो. अशा योजनांमधून मध्यस्थांची साखळी कमी करून कमिशनराज संपविण्यात आले आहे.
काँग्रेसला जे अनेक वर्षांत जमले नाही ते आम्ही करून दाखविले. याउलट विदर्भाचे भाग्य बदलणाऱ्या समृद्धी महामार्गाला, मुंबई मेट्रो तसेच पंतप्रधान आवास योजनेला विरोध करण्याचे काम काँग्रेसने केले. हे करण्यामागे त्यांना अपेक्षीत कमिशन हेच एक मुख्य कारण होते. आज मात्र समृद्धी महामार्गाने विदर्भाचे चित्र बदलले आहे. अशाच विकासाला प्रोत्साहन देण्याचे धोरण भाजपचे आहे, असेही श्री. मोदी म्हणाले. या वेळी सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
काँग्रेस म्हणजे कडू कारले
काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी वाक्चप्रचार म्हणून दाखविला. ‘कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच!’ अशी काहीशी प्रवृत्ती काँग्रेसची आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.