Sujay Vikhe Vs Jayashree Thorat Agrowon
ॲग्रो विशेष

Controversial Sujay Vikhe Sabha : सुजय विखेंच्या सभेतील ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Controversial Statement : माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संगमनेरमधील युवा संवाद मेळाव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

Team Agrowon

Mumbai News : माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संगमनेरमधील युवा संवाद मेळाव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंतराव देशमुख यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

एकीकडे महिलांना ‘लाडकी बहिणी’चा मान दिला म्हणायचे आणि दुसरीकडे महिलांविरोधात किळसवाणे वक्तव्य करायचे ही भाजपची संस्कृती आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, की लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष युतीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे सर्वांनी ऐकले आहे. भाजपचा माजी खासदार सुजय विखे यांच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजप पदाधिकाऱ्याने विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्रीबद्दल अत्यंत हीन, भाषा वापरली. वसंत देशमुखांनी वापरलेली भाषा हीच भाजपची महिलांबद्दलची खरी मानसिकता दाखवते, अशा विकृत मानसिकतेला माता भगिनी त्यांना जागा दाखवतील.

संगमनेर येथील सभेत वसंतराव देशमुख म्हणाले, की निवडणुकीच्या काळात आम्ही मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही, अशी थेट धमकी देत तिच्याविषयी हिणकस भाषा वापरली. अशी वक्तव्य करणारा व्यक्ती वयाने ज्येष्ठ आहे. महिलांबद्दल अशी भाषा भाजपवालेच बोलू शकतात, हीच त्यांची संस्कृती असून ब्रिजभूषणपासून गल्ली बोळातल्या पदाधिकाऱ्यांनी ते दाखवून दिले आहे. हा केवळ डॉ. जयश्री थोरात यांचा अपमान नाही तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. राज्यातील माता भगिनी या अपमानाचा व्याजासह निवडणुकीत बदला घेतील, असेही नाना पटोले म्हणाले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर असलेल्या भूमीत उभं राहून भर राजकीय मंचावरून महिलांसाठी अशी अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या भाजपच्या किळसवाण्या विचारसरणीचा निषेध केला आहे. नगर जिल्ह्याचे नामांतर केले खरे, परंतु महिलांबाबत असलेले स्वतःचे किळसवाणे विचार बदलले नाही. निवडणुकीत मतांसाठी कोणत्या ही स्तराला जाणाऱ्या भाजपने या निवडणुकीत तो खालचा स्तर गाठून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणखी एक गालबोट लावले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, जयश्री थोरात यांच्याबाबतची भाषा पाहिली तर लाडक्या बहिणींबाबत भाजप काय विचार करतात हे समोर आले आहे. मनात असलेल्या गोष्टी आता ओठांवर येत आहेत. थोरात यांच्या मुलीबाबत विखे पाटील यांच्या सभेतील उद्गार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे डोळे उघडणारे आहेत.

थोरात यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे म्हणाले, की वसंत देशमुख यांनी आमची बहीण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली. ती त्यांची खरी संस्कृती आहे, अशा शब्दांत टीका केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT