School First Day  Agrowon
ॲग्रो विशेष

School First Day : मुलांचे शाळाविश्व...

अरुण चव्हाळ 

Children School Story : जून महिन्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांची आणि शाळेत जाण्यासाठी पोरांची एकच धांदल उडालेली असते. त्यातल्या त्यात शाळेत नवीन जाणाऱ्या पोरासोरांचे तर भलतेच किस्से असतात. शाळेत नव्याने जाणाऱ्या मुलांचे भावविश्व कुटुंब, कुटुंबातील माणसे आणि ओळखीचे माणसे यांच्याशी घट्ट असल्यामुळे शाळा त्यांना सुरुवातीला परकी वाटते. लग्नानंतर लेकीला सासरी पाठवताना जसा सगळा गाव वेशीवर येतो, तसे कुटुंबातील अनेक सदस्य लेकरांना शाळेत सोडवायला येतात.

लहान मुलांच्या वर्तणुकीत निरागसपणा असतो. पण यावेळी त्यांना सर्व काही समजते, काहींचे वर्तन आक्रमक असते आणि ते माणसांना सोडायला तयार नसतात. त्यांच्यासोबत आलेली माणसे त्यांना शाळेत सोडून जाऊ लागली की, मुले हिरमुसतात. खूपच जोरजोराने रडतात. शिक्षकांची-आजूबाजूच्या मुलांची आणि मित्र-मैत्रिणींची नजर चुकवून शाळेतून घरी जाण्याचा कसोशीने प्रयत्न करतात.

अनेकदा मुलांच्या भावना समजून न घेतल्यामुळे घरचेही त्यांना शाळेत बसण्याची बळजबरी करतात. वेळप्रसंगी मुलांना मारही खावा लागतो. कालांतराने मुलांना हळूहळू शाळेबद्दल गोडी वाटायला लागते. मित्र-मैत्रिणी ओळखीचे होतात. नवीन कपडे, नवी पुस्तके, नवीन बॅगा, नवीन लेखन साहित्य, नवीन सॉक्स -बूट, नवीन पाण्याची बाटली, नवा डबा अशा अनेक गोष्टी नवनवीन असल्यामुळे त्यांना कुतूहल वाटते.

शाळेत शिकवणाऱ्या नवीन बाई आणि गुरुजी परिचयाचे होतात. शाळेचा परिसर आणि मैदान मुलांना आवडू लागते. जीवनाच्या औपचारिक शिक्षणाचा श्री गणेशा अशा रीतीने सुरू होतो. मग हळूहळू अ पासून ज्ञ पर्यंत सर्व मुळाक्षरे आणि १ पासून १०० पर्यंत संख्याज्ञान होत जाते. आता नव्यानेच जॉनी जॉनी, येस पप्पा... अशा इंग्रजी कवितांनी मुलांना कवेत घेतलेले असते.

वास्तविक पाहता मुलांचे मानसशास्त्र जाणून घेतले तर, मुले सात मिनिटांच्यावर एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात किंवा इतरांचे एकसारखे लक्षपूर्वक ऐकू शकतात. ही गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे शिक्षकांना वारंवार सांगावे लागते, ‘‘चला मुलांनो! माझ्याकडे लक्ष द्या.’’ शिकवणाऱ्यांनी मुलांचे बालमानसशास्त्र जाणून त्यांचे लक्ष खिळवून ठेवण्यासाठी अध्यापनात वेळेनुसार नियोजन केले पाहिजे.

त्यामुळे मुलांचे लक्ष केंद्रित होते आणि त्यांना शिकण्यात गोडी वाटू लागते. लहान मुलांना शिकवणाऱ्या अनेकांनी या गोष्टी साध्य केलेल्या असतात. त्यामुळे मुलांना अशा गुरुजनांची आवड निर्माण होते.

मुलांचे स्वभावगुण हे क्षणाक्षणाला बदलतात. आनंद-दुःख-राग या भावभावना ते लगेच व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्या कलाकलाने शिकवावे लागते. मुलांच्या जगाशी मिळतेजुळते घेऊन शिक्षकांनाही आनंद मिळू शकतो. या अनुषंगाने काही अनुभव सांगतो. माझ्या शेतातील आखाड्यावर मारोती टिप्परकर नावाचे सालदार होते.

त्यांचा सोमेश्वर नावाचा सहा वर्षं पूर्ण झालेला एक मुलगा होता. ते उन्हाळ्यात आखाड्यावर राह्यला आले होते. नंतर उन्हाळा संपल्यावर पावसाळ्याच्या तोंडावर शाळा सुरू झाल्यावर त्याला ते शाळेत टाकणार होते. माझ्यासोबत गावातल्या शाळेत त्याचे नाव टाकण्याचा त्यांचा इरादा होता. सुरुवातीला सोमू मला खूप बोलायचा. मळ्यात गेल्यावर माझ्यासोबत राहायचा. नंतर त्याच्या वडिलांनी त्याचे नाव शाळेत टाकायचे म्हटल्यावर तो मला पाहून खोलीत जाऊन लपायचा.

माझ्या ही गोष्ट ध्यानात आली. मग मी त्याला गोडीगोडीने माझ्या मोटार सायकलवर दररोज चक्कर मारू लागलो. त्याला गाडीवर फिरणे चांगले वाटू लागले. तो माझ्याबरोबर रमू लागला. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर त्याचे नाव पहिलीला टाकण्यात आले. पहिल्या दिवशी त्याला समोर गाडीच्या पेट्रोल टाकीवर बसून शाळेला घेऊन जाऊ लागलो.

त्याने थोडी रडारडी केली, पण नंतर त्याला म्हटलं, ‘‘सोमू, तूच गाडी चालवणार आहेस’’, हे ऐकून तो भलताच आनंदीत झाला. त्याला फक्त हँडलला हात धरू दिला. गाडीवर दोघं मस्त शाळेत पोहोचलो. गावातील विद्यार्थी शाळेत आले.

शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे मी आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक स्वच्छता केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मी ‘आपला माणूस’ वाटायला लागलो. सोनू मला ‘सर’ ऐवजी मळ्यात ऐकलेल्या ‘भाऊ’ नावाने हाक मारू लागला. इतर पोरांना ते नवलाचे वाटायचे. मग हळूहळू सोमूला त्यांनी त्यांचा दोस्त केले. मग मी त्यांना कवी इंद्रजित भालेराव यांची ‘वासरू’ ही कविता म्हणून दाखवायचो.

‘माझी एक गाय होती, तिला होते वासरु/तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरु’, ही कविता पोरांना खूपच आवडायची. मग तेही एकमेकांच्या आणि माझ्या गळ्यात वासरासारखे पडायचे. अशा लळाशाने मी पोरांच्या काळजात शिरत असे आणि पोरं माझ्या काळजात जाऊन बसत. मग मी सोमूबरोबर रस्त्यावरील मळ्यातील गौरव, अभिमन्यू, सौरभ आणि गोरख अशी चार पोरं शाळेत घेतली. आम्ही सहाजण संगमंग येत जाऊ. माझ्या गाडीवर तिघेजण आणि गोकर्ण गुरुजींच्या गाडीवर तिघेजण, असे आम्ही शाळेला ये-जा करीत असू. पोरं आमच्यात भलतीच रुळली.

लेकरं दिवसागणिक बदलत होते. त्यांची बोलीभाषा होती. आम्ही त्यांच्या बोलीभाषेत बोलत असू. नंतर त्यांना पुस्तकातील बाराखडी आणि अक्षरे-शब्द-वाक्ये-उतारा-पाठ असा क्रम शिकवला. हळूहळू लेकरं बोलीभाषेतून पुस्तकीभाषेकडे वळली. संमिश्र कुटुंबातील ही मुले असल्यामुळे आणि गावातील शेतकऱ्यांची-कामगारांची-वंचितांची मुले शाळेत असल्यामुळे या सर्वांना एकत्र करून आम्ही एकीची भावना निर्माण केली.

त्यामुळे आम्ही त्यांचेच झालो. अनुभवातून माणसाला शाळा एकत्र करत असते. आम्ही आणि मुले एकत्र शिकतो -एकत्र जेवतो आणि एकत्र खेळतो. मुलांना आमच्याबिगर आणि आम्हांला मुलांबिगर करमत नाही. मुलांचे सुरुवातीचे बोबडे बोल खूप ऐकू वाटतात. आम्ही गळ्यावर म्हणालेल्या कविता त्यांना खूप आवडतात.

शाळा गावाच्याबाहेर रानात असल्यामुळे शाळेच्या बाजूने वाहणारा ओढा, ओढ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज, ओढ्या भोवतालची झाडांची दाटी, दाट सावलीत रंगलेले खेळ, पक्ष्यांचे आवाज, उन्हाची तिरीप, पावसाचा शिडकावा, झाडांच्या पानांची सळसळ, मोरांचे केकावणे, कोल्ह्यांची कोल्हेकुई, कुत्र्यांचे इवळणे, गाईंचे हंबरणे, बैलांच्या डिरकाळया, घोड्यांच्या टापांचा आवाज, सापांच्या कातीन, मोरपीस, कोंबड्यांची झुंज, कुत्र्यांची कळवंड, म्हशींची टक्कर, झाडांना लटकलेले खोपे, पाखरांचे उडणे-गिरक्या मारून बसणे, ओढ्यातील गारगोटी जमा करून त्या एकमेकींवर घासून विस्तव निर्माण करणे, कुपाटीवरून पळणारे सरडे, मोहोळ, पाखरांची अंडी, प्राण्यांची बीळं असं बरंच काही अनुभवताना शाळेच्या पुस्तकातील-अभ्यासक्रमातील आणि अभ्यासाच्याबाहेर आमच्या गमतीजमती चालू असतात. त्यामुळे शाळेत मुलेही उपस्थित राहतात. शिक्षण आणि संस्कार अखंड होतात.

(लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT