Nagar News : येथे होत असलेल्या महासंस्कृती महोत्सवात यंदाही महिला बचतगटांनी तयार केलेले साहित्य, शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीसाठीचा कृषी महोत्सव होत आहे. मात्र महोत्सवाची वेळ चुकली आहे. शेतमाल खरेदीसाठी आलेल्यांना बहुतांश शेतमाल खरेदीसाठी महोत्सवात उपलब्ध नसल्याने आल्या पावली परत जावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शेतकरी, महिला बचत गटापेक्षा खासगी बियाणे, खते, कीडनाशकांची विक्री करणाऱ्या कंपन्यांचे स्टॉल येथे अधिक दिसत आहे. नियोजन चुकल्याने गर्दीही फारशी दिसली नाही. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल थेट विक्री करता यावा यासाठी राज्यभर कृषी महोत्सव घेतले जात आहेत. या संकल्पनेची सुरुवातच २००६ साली जिल्ह्यातून झाली.
जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य सरकारने कृषी विभागाच्या मदतीने राज्यभर महोत्सव घेतले जाऊ लागले. ज्या जिल्ह्याने या उपक्रमाची सुरुवात केली, त्याच नगर जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या हट्टापायी कृषी महोत्सव स्वतंत्र घेण्याएवजी सर्व यंत्रणांना एकत्र करून कार्यक्रम घेत कृषी महोत्सव मोडीत काढला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही महासंस्कृती नावाने हा महोत्सव होत आहे. यंदा लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम घेतला जात असल्याचे दिसत आहे.
कृषी महोत्सवाला गेल्या अनेक वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळतो. येथे शेतकरी ग्राहकांना शेतमालाची थेट विक्री करतात. विशेषतः ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्याची खरेदी करतात. यंदा अजून ज्वारीची काढणी सुरू आहे. गव्हाला दहा ते पंधरा दिवसांचा अवधी आहे. हरभऱ्यासह अन्य कडधान्यालाही बाजारात यायला काही अवधी आहे.
मात्र महोत्सवाचे नियोजन स्वतःकडे घेण्याची घाई झालेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या हट्टामुळे कृषी महोत्सवात धान्य खरेदी करण्यासाठी आलेल्या बहुतांश लोकांना धान्य खरेदी करता येत नाही. अलीकडे ज्वारी, बाजरीला मागणी वाढली आहे. त्यासह नव्या वर्षातील गव्हाची खरेदी करण्याची आशा बाळगून असलेल्या लोकांचा येथे हिरमोड होत आहे. आधीच महोत्सवाची पुरेसी प्रसिद्धी नाही, त्यात धान्यही पुरेसे उपलब्ध नसल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना धान्य खरेदीविनाच परत जावे लागत आहे.=
दर वर्षी कृषी विभाग धान्य व फळे महोत्सव घेतात. गेल्या वर्षीपासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या हट्टामुळे व त्यांना स्वतःकडे नियोजन घ्यायचे असल्याने कृषी महोत्सवच मोडीत निघाल्यासारखा झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.