Interview with Dr Kakade: तुम्ही चार दशकांपूर्वी अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी मिळवली. तेव्हा करियरच्या अनेक संधी असताना त्या सोडून तुम्ही स्वयंसेवी संस्थेत नोकरी का पत्करली?
स्वतःऐवजी माझ्या भूमीचा, माणसांचा विकास हा मंत्र आम्हाला मुळातच शेतीमधून मिळाला. मी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो. शेती करीत झेडपीच्या शाळेत शिकलो. रोज सहा किलोमीटर पायी चालून दहावी पूर्ण केली. भाग्य असे की खेडेगावात शिकलो तरी तेव्हाच्या शिक्षकांनी आम्हाला रट्टे देत संस्कार, अध्ययनाची दीक्षा दिली. त्यामुळे आम्ही घडलो. पुढे पुण्यात ‘सीओईपी’ या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बी.ई.’ व ‘एम.ई.’ पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण चालू असतानाच त्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात शासनाने मला व्याख्यातेपदी नेमले.
त्याआधी पदवी शिक्षण घेत असताना कॉलेजमधल्या ‘प्रचिती’ गटाशी जोडला गेलो होतो. तो प्रख्यात ज्ञानप्रबोधिनी संस्थेशी संलग्न होता. आम्ही खेडेगावांमध्ये सतत जात असू व प्रश्न समजून घेत असू. याच काळात पाणी पंचायतीचे विलासराव साळुंखे यांचा सहवास लाभला. ‘प्रचिती’ आणि ‘पाणी पंचायत’ या दोन समूहांमुळे मला कृषी व्यवस्था व तिचे प्रश्न कळू लागले. ते प्रश्न मला अस्वस्थ करू लागले. ही व्यवस्था सुधारण्याची क्षमता असणाऱ्या सामाजिक क्षेत्रातच ‘करियर’ करण्याचे मी त्याच वेळी ठरवून टाकले. या क्षेत्रातील ‘बायफ’विषयी ऐकलेले होतेच; म्हणून मी तिथे नोकरीसाठी १९९२ मध्ये अर्ज केला.
महात्मा गांधीजींचा सहवास लाभलेले ‘बायफ’चे संस्थापक डॉ. मणीभाई देसाई यांनी स्वतः माझी मुलाखत घेतली. त्यांनी थेट मुलाखतीत नियुक्तीपत्रच माझ्या हातात दिले. माझ्यासाठी हा अतिशय सुखद धक्का होता. पुढे नोकरीत सुदैवाने मला अल्पकाळ की होईना काकांचा (डॉ. मणीभाई) सहवास लाभला. त्यांच्या कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव माझ्यावर पडला. त्यामुळे आम्ही झपाटून काम करीत गेलो. आज बायफचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी पार पाडतो आहे. त्या माध्यमातून आणखी कामाची संधी मला मिळाली आहे. माझ्या दृष्टीने ही भाग्याचीच बाब आहे.
पहिल्या टप्प्यात तुम्ही कोणत्या विषयात कामे केली?
बायफमध्ये येताच माझ्या आवडीच्या जलसंधारण विषयात मला भरपूर काम करता आले. राज्यात त्या वेळी फादर हर्मन बाखर यांनी आणलेल्या ‘इंडो-जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम’मध्ये पायाभूत काम करणाऱ्या फळीत मीदेखील एक होतो. बायफच्या माध्यमातून आम्ही पाणलोटाचा पहिला प्रकल्प नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राबवला. या यशस्वी कार्यक्रमाचा मोठा फायदा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प उभारणीस झाला. नाबार्ड व केंद्र शासनानेही पुढे बायफला या विषयातील मातृसंस्था (मदर एनजीओ) म्हणून निवडले.
त्यामुळे बायफने विविध राज्यांतील १३०० गावांमध्ये या प्रकल्पाचा विस्तार केला. तसेच, मातृसंस्था किंवा रिसोर्स संस्था म्हणून अनेक संस्था व हजारो गावांमध्ये यशस्वीपणे कार्यक्रम राबविले. विविध राज्यांना आम्ही अनेक नवे प्रारुप (मॉडेल्स) दिले. ‘सामूहिक शेततळ्यांचे जाळे’ ही संकल्पना देशात सर्वप्रथम बायफने कर्नाटकातून पुढे आणली व ती जागतिक बॅंकेनेही उचलून धरली. या वाटचालीत मी आधी गावस्तरावर काम करणारा ‘विकास अभियंता’ म्हणून काम पाहत होतो. पुढे ‘प्रकल्प समन्वयक’ व ‘प्रकल्प संचालक’ बनलो आणि २००७ मध्ये बायफने माझ्यावर ‘उपाध्यक्ष’ पदाची जबाबदारी सोपवली.
त्यानिमित्ताने बायफच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मला देशभर फिरावे लागले. ग्रामविकासाचे सुरू असलेले विविध प्रकल्प ज्यामध्ये जलस्रोतांची कामे, आदिवासी विकासासाठीचा वाडी उपक्रम, पर्यावरण व वातावरणातील बदल अशा सर्व विषयांमध्ये मला भरपूर काम करता आले. यातून अनुभव मिळाला व सखोल अभ्यास करता आला. कोविडच्या बिकट काळात २०२१ मध्ये मला बायफच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली.
अर्थात, संस्थेच्या सर्व विभागांमध्ये मी आधीची २९ वर्षे काम केले होते; त्यामुळे मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांना मोठी आव्हाने जिद्दीने स्वीकारली. आज आम्ही दरवर्षी ४० लाख लोकांना सेवा देत आहोत. विविध शासकीय विभाग, खासगी कंपन्या व जागतिक संस्थांच्या पाठबळामुळे बायफ आज चढत्या आलेखाने सक्षमपणे उभी आहे व विस्तारतही आहे. हे सर्व श्रेय बायफमध्ये काम करणाऱ्या सात हजार कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाला जाते.
सध्या बायफ कुठे आणि नेमके काय काम करतेय?
सध्या आम्ही १७ राज्यांमध्ये काम करत आहोत. शेतकरी व शेतमजूर आमचा केंद्रबिंदू आहे. त्यातही पुन्हा स्थानिक रोजगार निर्मिती हे आमचे ध्येय आहे. दुग्धविकासाचा आमचा कार्यक्रम आज शेतकरी कुटुंबांमध्ये रोजगार निर्मितीचे सर्वांत मोठं साधन बनला आहे. त्यासाठी आम्ही देशभर साडेचार हजार पशुसंवर्धन केंद्रे चालवतो आहोत. या केंद्रांमधून कृत्रिम रेतनाद्वारे (आर्टिफिशियल इन्सिमिनेशन) शेतकऱ्यांच्या दारात आम्ही दुधाळ गायी तयार करीत आहोत. लिंग निश्चित वीर्यमात्रा (सेक्स सॉर्टेड सीमेन) तंत्रज्ञान बायफनेच पहिल्यांदा भारतात आणले. या वीर्यमात्रांच्या वापरातून आज ९० टक्के कालवडी जन्माला येत आहेत.
याशिवाय आम्ही जिनॉमिक्स (जनुकीय क्रमनिर्धारण) तंत्र आणले आहे. त्यातून शेतकऱ्यांना त्यांची गाय किंवा बैल कोणत्या क्षमतेचा आहे हे तत्काळ समजते. भृण प्रत्यारोपण (एम्ब्रिओ ट्रान्स्फर) तंत्रही आम्ही पुरवतो आहोत. आज गावागावातील पशुपालक २०-२० हजार रुपये देत हे तंत्र त्यांच्या गायींमध्ये वापरु लागला आहे. दुसरे म्हणजे आता आम्ही कृत्रिम रेतन (आर्टिफिशियल इन्सिनिमेशन) तंत्राकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राकडे वाटचाल करीत आहोत. बायफ आता खेडेगावांकडे ‘एआय’ घेऊन निघाली आहे. बारामती ‘केव्हीके’च्या प्रक्षेत्रांवर जसे उसावर ‘एआय’ तंत्र यशस्वीपणे वापरले जात आहे; तेच तंत्रज्ञान आम्ही उरळी कांचनला भाजीपाला पिकांवर राबवतो आहोत.
ॲरीट सोल्युशन या कंपनीबरोबर करार करून पशुधन व्यवस्थापनातही आम्ही ‘एआय’ तंत्र आणले आहे. त्यात गायीच्या गळ्यात एक ‘एआय’ कॉलर बांधली जाते. त्यातून गायीच्या सर्व हालचालींच्या नोंदी व तिच्या आरोग्याची स्थिती पशुपालकाला मिळते. तसेच गायीचा माजावर येण्याचा कालावधीदेखील निश्चितपणे कळू लागला आहे. वातावरणातील बदल व पशुधनातील समस्येवरही गांभीर्याने काम चालू आहे. ‘आयसीएआर’च्या ‘नॅशनल इस्टिट्यूट ऑफ ॲनिमल न्यूट्रिशन’सोबत करार करीत बायफने आता ‘हरितधारा’ नावाचे पशुखाद्य आणले आहे. त्यामुळे रवंथाद्वारे मिथेनचे होणारे उत्सर्जन २० टक्क्यांनी घटते.
या प्रयोगात आम्ही आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत काम करतो आहोत. पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, मृदा संधारण, आरोग्य, फलोत्पादन, पीकबदल, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, कौशल्य विकास अशा किती तरी क्षेत्रांत बायफ वेगाने काम करते आहे. याशिवाय ‘महिला केंद्रित उपजीविका’ क्षेत्रात आम्ही गुजरातमध्ये दोन लाख महिला उद्योजक तयार करत आहोत. त्यासाठी गुजरात सरकारची गुजरात लाइव्हीलहुड प्रमोशन कंपनी, रिलायन्स फाउंडेशन आणि बिल ॲण्ड मिलिंडा गेट्स फाउंडेशन यांनी बायफवर विश्वासाने जबाबदारी सोपवली आहे.
दुसरा मोठा कार्यक्रम एल ॲण्ड टी फायनान्स कंपनीसोबत राबवत आहोत. यातून ग्रामीण भागात ‘डिजिटल सखी’ तयार केल्या जात आहेत. यात गावातील सुशिक्षित महिलांना प्रशिक्षित करून गावाला ई-सेवा पुरवल्या जातात. बिहार व उत्तर प्रदेशात हा उपक्रम चालू आहे. याशिवाय महिलांद्वारे शेती अवजारे बॅंकाही चालवल्या जात आहेत. उरळी कांचनमध्ये नव्याने साकारत असलेल्या ‘ग्रामीण नावीन्यता केंद्रा’त आमचे सारे उपक्रम तुम्हाला लवकरच बघण्यास मिळतील.
तुमच्या नजरेतून आता बायफची पुढील वाटचाल कशी असेल?
आम्ही आता ‘बायफ - २०३०’ चा आराखडा तयार करत आहोत. शेतकरी सहभागातून हा आराखडा तयार होईल. ग्रामीण भागात दरवर्षी किमान एक कोटी लोकांपर्यंत आमच्या सेवा देण्याची तयारी चालू आहे. लोकांच्या जीवनात आनंद व समृद्धी आणणाऱ्या या सेवांचा विस्तार हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असेल. लोकांचा ओघ खेड्याकडून शहराकडे सुरू आहे. मात्र बायफचे सर्व उपक्रम लोकांना खेड्यातच रोजगार कसा मिळेल यावर भर देणारे आहेत.
उदाहणार्थ, आम्ही वाडी उपक्रमातून फलोत्पादनाद्वारे अडीच लाख शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबवले. या उपक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी प्रत्यक्ष भेट दिली होती. खेडेगावातील युवा पिढीच्या इच्छा- आकांक्षांची पूर्तता करणारे उपक्रम गावस्तरावरच कसे राबवले जातील; त्यासाठी शेतीचे यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण कसे करता येईल, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कशी आणता येईल, एका एकरातून किमान पाच लाख रुपये देणारे मॉडेल कसे विस्तारता येईल यावर आम्ही काम करत आहोत. नव्या पिढीला त्यांच्या गावात समृद्धीची साधने उपलब्ध करून देणारे तंत्रज्ञान आणणे हेच आता ध्येय असेल.
- डॉ. भरत काकडे,
९४२३५०७३३५ bkkakade@baif.org.in
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.