समीर गायकवाड
गावाकडे एक बरे असते, माणसांच्या चेहऱ्याला कल्हई केलेली नसते. माणसं जशी असतात तशीच राहतात, दिसतात. मुळात गाव असते ते केवढे? शेदोनशे ते पाचशे उंबरा इतकीच काय ती त्याची व्याप्ती. गावात किती भाग म्हणाल, तर एक वेशीबाहेरचे तर दुसरे वेशीच्या आतले जग. म्हणूनच गावात हाक मारताना प्रत्येकाला एकमेकांचा बाप माहिती असतो. हाका मारल्या की लगेच जवळ येतील.
लाघवीपणाने चिटकून बसतील, आधी इकडचे तिकडचे चार शब्द बोलतील. अर्थातच त्यांच्या गप्पांत पीकपाणी, पाऊसवारा हा असतोच. त्यातून सुख-दुःखाची देवाणघेवाण होते. मात्र कधीतरी हेही बिथरतात, ‘‘भावकी गावकीचा विषय सोडून बोल’’ म्हणतात. कधीकाळी दुखावल्याचा राग वर्षानुवर्षे मनात ठेवलेला असतो. त्याचा वचपा यांनाही काढायचा असतो.
शहरी मंडळीही हाडामासाचीच असतात परंतु गावाकडची माणसं त्याच्या जोडीने मातीचीही असतात. यांची नाळ मातीशी घट्ट जुळलेली असते. याउलट काही शहरी व्यक्तींचे आपल्या जन्मदात्या मायबापाशीदेखील जमत नाही. काही तक्रार असली तरी गावाकडच्या माणसांची गाडी विठूचरणी विसावते. राग कितीही असला तरीही हे कोणाचे वाटोळे व्हावे म्हणून प्रार्थना करणार नाहीत. एखाद्या वेळेस अडचणीत सापडलेल्या अशा माणसाला चार गोष्टी ऐकवून मदतच करतील; पण त्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणार नाहीत.
डोईला वेगवगळ्या रंगाचे फेटे बांधून इथेतिथे बसलेली म्हातारी माणसं हे यांचे खरे हाकारे. गावातला सर्वांत ज्येष्ठ म्हातारा जे काही सांगेल त्याच्या शब्दाविरुद्ध शक्यतो कोणी जात नाही. गावात विशेष मान असतो अशा ‘वठलेल्या झाडा’ला. झालंच तर गावातली टाळकरी भजनी मंडळीही आदरस्थानी असतात. त्या खालोखाल गुरव, बामणावर यांची श्रद्धा असते. अबीर, गुलाल, बुक्का हेच यांचे ब्रह्मा, विष्णू, महेश! चिरमुरे, लाह्या, बत्तासे हाच इथला महाप्रसाद. आषाढीला उपवास, नवरात्रात व्रतवैकल्ये, शिवाय कुलदैवत कुलाचार हा यांचा श्रद्धेचा विषय. याशिवाय गावातली दरसालची जत्रा आणि जत्रेला यांना येणारं उफाण हेही अनुभवण्यासारखं.
याचा अर्थ गावातली सर्वच माणसं अशी असतात असं नाही. काही माणसं इब्लीस, पक्की, कपटी बेरकीही असतात. बांधाच्या कोरभर तुकड्यासाठी नरडीचा घोट घेण्यापर्यंत इथला माणूस कधी कधी घसरतो. ‘आईबहिणीला कडंला जाईपर्यंत बघावे अन् भावकीला थुकावे’ असेही भाव इथल्या रक्तात भिनलेले असतात. आपापली सुख-दुःखे, स्वप्ने काळजातल्या कपारीत ठेवून आपल्याच ढंगात चालणारी ही माणसं.
कोणी धोतर तर कोणी पायजमा घालून असतो; आजकाल क्वचित कोणी जीन्सवाला तरणा पोरही येथे हटकून दिसतो. डोक्यावरून नऊवारीचा पदर घेऊन वेस चुकवून कुजबूज करत लगबगीने चालत जाणाऱ्या बायका पाहताना विविधरंगी ठिपके थव्याने चालल्यासारखं वाटतं. अंगावर फुफुटा उडवणाऱ्या वाटेवर चालून भेगाळलेल्या पायात जुनेर वाहणा घालून चालणारी ही माणसं. सावलीचे ज्ञान यांना अधिक उत्तम ठाऊक. पर्यावरण पर्यावरण म्हणून आपल्यासारखं दिखाऊपणाने छाती बडवण्याऐवजी हे झाडाझुडपातच देव शोधतात, पानाफुलांत रमतात.
दरसाली ओढ्याला वरुणदेवाच्या कृपेनुसार वेगवेगळं रुपडं मिळतं. ‘ओढ्याजवळच्या हिरव्याजर्द पानवेली म्हणजे गावातल्या मेलेल्या माणसाचेच झाडातले जल्म’ असं लहानपणापासून ऐकवलं जातं. त्यामुळं त्या पानवेलींची पानं कुणी तोडत नसतं. बहुतांश गावात स्मशानभूमीसाठी वेगळी अशी जागा नसते. गावातली घाण आणि पावसाचं दान पोटात घेऊन नदीशी एकरूप होणारा ओढा गावातल्या माणसांनाही सोबत घेऊन गावमातीच्या कणाकणांत कालवतो आणि नंतर आपल्या हृदयाशी धरून नदीपात्राच्या तळाशी नेतो. मग ती
चंद्रभागा असते नाही तर गोदावरी, कृष्णा, पंचगंगा. तिचं पाणी आपल्याला समिंदराकडं नेते अशी धारणा. म्हणून गावात कुणाची मयत झाली की गावाबाहेरच्या ओढ्यावर त्याचे क्रियाकर्म ठरलेले. पुढे जाऊन हीच माणसं तिथल्या पानवेलीत जन्म घेतात नि मग गावातल्या माणसांना भेटतात असं बोललं जातं.
गावात असते वेशीजवळचं मारुतीचं मंदिर, नाहीतर एखाद्या उभ्या आडव्या आळीला असतं विठोबाचं देऊळ. क्वचित नमाजासाठीचे मातीचे मिनार. ही सर्व धार्मिक प्रवृत्तीच्या गावकऱ्यांची श्रद्धास्थानं. इथले उत्सव, उरुस हा त्यांच्या घरचाच जलसा असतो. गावची चावडी ही मुळातच बोलभांड असते. अनेक घटनांची ती मूक साक्षीदार असते. गावातले अनेक निवाडे, वाद, संकटे आणि त्यांचे निवारण याची ती दार्शनिक असते. चावडीच्या भिंतीला कान लावले तरी अनेक श्वास, निःश्वास यांचे उसासे ऐकू यावेत. गावाचा खरा इतिहास चावडीच्या कणाकणांत मिसळलेला असतो.
जसा गाव असतो तसाच त्याचा पार असतो. वडाचे झाड असणारा पार म्हणजे स्वर्गच जणू. क्षणभराच्या उसंतीत विचारलेल्या ख्यालीखुशालीपासून ते निवांतपणे रवंथ करत आपल्या सासूरवाशीण बहिणीबाळीच्या अडचणीपासून ते आई-वडिलांच्या आजारपणापर्यंतच्या विविध विषयांवरच्या गावगप्पा येथे रंगतात. पाराने गावातली पंचांची पंचायत बघितलेली असते. लहान मुलांच्या अनेक विट्या पाराने अलगद झेललेल्या असतात तर कधी कटून आलेला एखादा पतंग वडाच्या शहाजोग फांद्यांनी आपल्या गळ्यात अडकवून ठेवलेला असतो.
पारावरचा कट्टा हा गावाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा मंच असतो. कधी एखाद्या सभेचे तर एखाद्या बैठकीचे दमदार बोल ऐकण्यासाठी गावकरी त्या पाराभोवती गोळा झालेले असतात तर कधी पावसाळी दिवसात तिथे साठलेल्या पाण्यात खेळणाऱ्या पोरांना आपल्या कुशीत घेऊन पाराने त्यांच्याशी मस्ती केलेली असते. गावाचा पार गावाची कळा सांगतो. पार स्वच्छ, प्रसन्न असेल तर गावगाडा खुशीत, शिस्तीत चालू असल्याचा तो दाखला असतो. पाराभोवती कचरा साठलेला असेल नि पार उदास भासला तर गावात काहीतरी अप्रिय घडल्याची, कुणीतरी गेल्याची ती चाहूल असते. पार हा गावाच्या मस्तीचा, रगेल, रंगेलपणाचाही अंदाज देत असतो. पार अनेक अपेक्षा अन् उपेक्षांची जीवघेणी गाऱ्हाणी आपल्या एकट्याच्या अंतःकरणात साठवून असतो.
गावाबाहेरचे तळे अनेक आख्यायिकांचे आगार असते. तळ्याचे पाणी कधी तळाला जाऊन विचारमग्न होते तर कधी पाळी फोडून गावदेवाच्या पायऱ्या शिवून रामराम घालते. तळ्यातील पाण्याच्या तरंगात अनेक प्रतिबिंबे दिसतात. तळ्याकाठच्या जीर्ण झाडांची हिरवी-पिवळी पाने पानगळीत आपला मरण सोहळा साजरा करत फिरकी घेत नाचत नाचत पाण्याशी नतमस्तक होऊन खाली उतरत असतात.
तळ्याकाठची ही झाडे म्हणजे गावातल्या पोरांचा जीव की प्राण. सूरपारंब्यापासून ते लंगडीपर्यंतच्या अनेक खेळांचे डाव इथे मांडलेले. लालसर मऊ गोड उंबरं खात झाडावरचा डिंक, लाख गोळा करताना लालकाळे तिखट मुंगळे चावायचे. त्यांच्या कडक डंखाला पोरांच्या गलक्याची जोड असायची. या सर्वांच्या कोलाहलात आपला सूर मिसळणारे सकळ पक्षिगण सर्व वातावरणाला भारून टाकायचे. एक जादुई माहौल असायचा तिथे.
तळे कोरडे पडले की मग मात्र गावच उदास भासे. मेलेल्या माणसाची आतडी-कातडी बाहेर यावी तसा तळ्यातला गाळ कोरडा झाल्यावर पोटातले मोठाले दगडधोंडे वर घेऊन यायचा. सलग दोन-तीन वर्षे तळे आटले की देवाला भाग बांधला जायचा. सारा गाव अनवाणी राहून उपास-तापास करायचा. पुढल्या पावसाळ्यात बक्कळ पाऊस पडला की आधी देवळाला आतून बाहेरून काव आणि पिवडीच्या रंगाचे दोन हात ठरलेले असायचे.
तळ्यातल्या पाण्याविषयी जुनी माणसं वेगवेगळ्या दंतकथा रंगवत बसत. तळ्याचं पाणी कुणा एकाच्या घरचं नसूनही ते सर्वांच्या डोळ्यात असायचं. चरायला गेलेली अख्ख्या गावाची गुरं गावात परतताना तिथे आळीपाळीने पाणी प्यायची तेव्हा त्यांच्या जिभेचा लप्लाप आवाज आणि त्याच वेळेस त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा मंजुळ आवाज ऐकताना मावळतीचा लाल-पिवळा सूर्य तळ्यातल्या पाण्यात कधी बुडून जायचा ते कळायचे नाही.
या साऱ्या गावखुणा म्हणून परिचित असल्या तरी गाव म्हणजे नेमके काय याचे उत्तर शोधताना जिवाला अमृतानुभव लाभतो. गाव म्हणजे मातीतल्या माणसांचा जथ्था, जो दुःखाचे अवडंबर करत नाही अन् सुखाचे उच्छृंखल बाजार भरवत नाही. देवळातल्या मुक्या खांबातही गावाची कहाणी ऐकायला येते. ओढ्यातल्या अवखळ पाण्यातही गावाचे उष्म अश्रू ओळखायला येतात. गाव असतो एक चिरंतन आनंदाचा चैतन्यमय सोहळा. गाव असतो माणूसपणाचा उरुस.
गाव म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंत साथ देणारी, अखंड ऊर्जा देणारी सावली. गाव म्हणजे आई, गाव म्हणजे बाप, गाव म्हणजेच विठ्ठल-रुखमाई, गाव म्हणजे आकाशाची निळाई अन् निसर्गाची हिरवाई, सरतेशेवटी गाव म्हणजे फाटक्या कपड्यात दुःख लपवून आई-बापाची सेवा करणाऱ्या अन् मातीच्या ऋणात राहणाऱ्या शेकडो माणसांचा एकसंध देह असतो. गाव आहे म्हणून कित्येक आयुष्य समृद्ध झालीत, होताहेत आणि होतील.
समीर गायकवाड, ८३८०९७३९७७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.