Sangli News : केळी पीक लागवडीतून शेतकऱ्यांना मोठी संधी आहे. ती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी ठरेल, असा सूर भिलवडीत झालेल्या परिसंवादात उमटला. काकासाहेब चितळे फाउंडेशन व भिलवडी ग्रेप ग्रोअर सोसायटीतर्फे हा परिसंवाद झाला. या परिसंवादात भिलवडीसह अंकलखोप, वसगडे येथील सुमारे २०० उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
पिकाचे पाणी, खते, सूक्ष्मअन्नद्रव्ये व विक्री व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे, या हेतूने काकासाहेब चितळे फाउंडेशनचे गिरीश चितळे व मकरंद चितळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
या वेळी विशेष तज्ज्ञ तुषार जाधव यांनी लागवडीसाठी जमिनीची प्रत, रोपांची निवड, लावणीनंतर रोपांची निगा, पाणी, खत व रोग-कीड व्यवस्थापन, निर्यातक्षम केळी उत्पादनासंदर्भात तसेच खोडवा व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे शंका निरसन केले.
इंदापूरच्या बना हेल्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष जे. के. शिंदे यांनी केळी पिकामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असलेल्या संधींबाबत माहिती देताना पिकांची प्रत व मिळणारे उत्पन्न याबाबत सविस्तर माहिती दिली. आंतरराष्ट्रीय ॲग्रो निर्यात सल्लागार दिलीप घोरपडे यांनी परदेशात भारतीय फळांना विशेषतः केळी पिकाला असलेली मागणी, त्यासंदर्भातील संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.
पीडीकेएएसएमचे कार्यकारी संचालक आबासाहेब काळे यांनी केळी पिकासंदर्भात असलेल्या जागतिक पातळीवरचे भारताचे योगदान, शासकीय पातळीवरून होणारी मदत, निर्यातदार कंपन्या व सल्लागार यांचे चालणारे कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्हा कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी काकासाहेब चितळे फाउंडेशनमार्फत शेतकऱ्यांच्या उपयोगाचा चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल आभार मानले. केळी पिकातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते. काकासाहेब चितळे फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व विक्री व्यवस्थापन केले जाईल.
परिसरातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गिरीश चितळे यांनी केले. मकरंद चितळे, पुष्कर चितळे, रघुनाथ देसाई, व्यंकोजी जाधव यांनी मान्यवरांचा सत्कार केला. अतुल चितळे, जैन इरिगेशनचे अशोक मगदूम, तालुका कृषी अधिकारी संभाजी पटकुरे, भारती दिगडे, ग्रेप ग्रोवर्स सोसायटीचे अध्यक्ष श्री. शिंदे, महावीर चौगुले, शशिकांत कुलकर्णी, दत्ता उतळे उपस्थित होते. सुबोध वाळवेकर यांनी आभार मानले
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.