Pomegranate Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Farming: कृत्रिम बुद्धिमत्तेचा डाळिंब शेतीतही वापर

AI Technology: सर्कलवाडी (ता. कोरेगाव) येथील डॉ. युगंधर राजेंद्र सरकाळे या उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने डाळिंब बागेमध्ये काटेकोर शेती व्यवस्थापनाच्या सोबत ‘एआय’ तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली.

विकास जाधव : अॅग्रोवन वृत्तसेवा

Satara News: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करून ऊस उत्पादन वाढीचा प्रकल्प बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर यशस्वी झाला. या प्रकल्पातून प्रेरणा घेत सर्कलवाडी (ता. कोरेगाव) येथील डॉ. युगंधर राजेंद्र सरकाळे या उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने डाळिंब बागेमध्ये काटेकोर शेती व्यवस्थापनाच्या सोबत ‘एआय’ तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. डाळिंब झाडांच्या जोमदार वाढीसाठी याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रासोबत सातारा जिल्हा बँकेने ऊस शेतीविषयक प्रकल्प राबवला आहे. यातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे फायदे लक्षात घेऊन डॉ. युगंधर सरकाळे यांनी डाळिंब बागेचे नियोजन केले. याबाबत माहिती देताने डॉ. सरकाळे म्हणाले, की ‘मॅप माय क्रॉप’च्या माध्यमातून उपग्रहाद्वारे शेतीक्षेत्राची मोजणी होते. यातून त्या जमिनीबद्दलची पूर्वीपासूनची माहिती उपलब्ध होते.

ही माहिती अल्गोरिदममध्ये नोंदविल्यानंतर त्यामध्ये भूतकाळातील माहिती सोबत भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मार्ग सुचवले जातात. ‘फसल’च्या माध्यमातून शेतामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसविले आहे. यातून रोजचे हवामान, वातावरणातील बदलाबाबत सूचना मोबाइलवर मिळतात. येणाऱ्या काळात काही क्षेत्रात रोग, किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता असेल तर त्याबाबत सूचना मिळते.

नियंत्रणासाठी कोणते कीडनाशक फवारण्याची गरज आहे, याबद्दल मार्गदर्शनही मिळते. मी शेतामध्ये ‘आयओटी सेन्सर’ बसवले आहेत. शेतामध्ये स्वयंचलित पाणीपुरवठा यंत्रणा आहे. शेतातील विशिष्ठ विभागामध्ये किती पाणी द्यावे लागेल, त्यासाठी किती वेळ लागेल, याचे नियोजन केले जाते. त्यामुळे झाडांना अन्नद्रव्ये, पाणी योग्य समप्रमाणात पुरवले जाते. काटेकोर, एकात्मिक शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंब शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न आहे.

डॉ. युगंधर सरकाळे यांनी जातिवंत, रोगविरहित रोपांची लागवड केली आहे. बागेत तण नियंत्रणासाठी विडमॅटचा वापर केला आहे. यामुळे भांगलणीवर, तणनाशकावर होणारा खर्च कमी झाला. प्रत्येक रोपाला भरीव बांबूचा आधार दिला. रोपांची वाढ तपासत, योग्य वेळी छाटणी करण्यात आली. सेंद्रिय आणि रासायनिक खते आणि पाण्याचा संतुलित वापर केल्याने अकराव्या महिन्यात झाडांची जोमदार वाढ दिसून आली आहे. डाळिंब बागेच्या नियोजनात डॉ. भूषण गोसावी, शेतीमित्र अक्षय सागर आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कृषी विभागाचे अधीक्षक अमृत भोसले यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

‘एआय’ तंत्रज्ञानाचे फायदे :

* उत्पादन खर्चात २० ते ४० टक्क्यांची घट.

* खते, पाणी, कीडनाशकांच्या वापरात बचत.

* कीड, रोगांचे अचूक विश्‍लेषण.

* उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढीची अपेक्षा.

परदेशातील संधी झुगारून शेतीत...

डॉ. युगंधर सरकाळे यांनी बी.टेक. नंतर अमेरिकेतील कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये एम.एस. आणि २०१९ मध्ये पीएचडी केली. या सात वर्षांत ‘एआय’मध्ये सखोल संशोधन करून त्यांनी ‘अनिश्‍चिततेमध्ये निर्णय कसे घ्यावेत?’ यावर अभ्यास केला. परदेशातील संधी झुगारून वयाच्या तिसाव्या वर्षी डॉ. युगंधर सरकाळे भारतात परत आले.

डॉ. युगंधर यांना वडील डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या मार्गदर्शनामुळे लहानपणापासूनच शेती, राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांची ओळख झाली होती. यातून त्यांनी स्वतःची टीम तयार केली. यामध्ये विक्री तज्ज्ञ, कृषी सल्लागार, सातारा डीसीसी बँकेमधील कर्मचारी, जागतिक पातळीवरील शेतीविषयक शास्त्रज्ञ, शेतीतज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून कृषी क्षेत्रात आर्थिक क्रांती होईल. या तंत्रज्ञानातून सामान्य शेतकऱ्यांना वातावरणात होणारे बदल, रोग,किडीचा प्रादुर्भाव तसेच गारपीट, ढगफुटी, हवा आणि जमिनीतील आर्द्रता, तापमान, मातीचा पोत, खतांच्या उपलब्धतेचा उत्पादनावर कसा परिणाम होतो, याबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. या तंत्रज्ञानातून शेतीतील खर्च कमी होऊन उत्पन्नात भर पडेल.’’
डॉ. युगंधर सरकाळे, युवा शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT