Parbhani News : यंदा अतिवृष्टी व मॉन्सून्नोत्तर पावसामुळे झेंडूचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. परंतु प्रतिकूल हवामान स्थितीत मोरेगाव (ता.सेलू) येथील कृषी पदवीधर तरुण शेतकरी प्रभाकर चव्हाळ यांनी काटेकोर व्यवस्थापन करून दोन एकरांत दर्जेदार झेंडूचे उत्पादन घेतले आहे. झेंडूमध्ये कोथिंबीर आणि फ्लॉवरचे आंतरपीक घेऊन बोनस उत्पन्न मिळाले. यामुळे झेंडू या मुख्य पिकाच्या उत्पन्नाची जोखीम कमी करणे शक्य झाले.
मोरेगाव येथील चव्हाळ परिवार फळे, फुले, भाजीपाला उत्पादन घेणारे शेतकरी कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रभाकर चव्हाळ यांनी बीएस्सी कृषी पदवीनंतर एमबीएची पदवी संपादन केली. घरच्या शेतीमध्ये नवनवीन पीक पद्धतीचे प्रयोग करत असताना सेलू येथील कृषी सल्लागार सेवा केंद्रही ते चालतात. दसरा-दिवाळी सणाची मागणी लक्षात घेत दर वर्षी झेंडू लागवड करतात.
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात दोन एकरांवर (आठ हजार झाडे) लागवड केली. दोन सऱ्यांमध्ये चार फूट अंतर ठेवले. एकआड एक सरीमध्ये झेंडू आणि फ्लॉवरची लागवड केली. गादीवाफ्यावर कोंथिबिरीचे पीक घेतले. जिल्ह्यात यंदा अनेकवेळा अतिवृष्टी झाली. ऑक्टोबरमध्ये मॉन्सून्नोत्तर पाऊस झाला. बुरशीजन्य करपा पडल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
चव्हाळ यांनी झेंडूत बांबू, तारांची बांधणी केली. करप्याचे वेळेवर व्यवस्थापन केले. त्यामुळे प्रतिकूल हवामान स्थितीतही अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी नुकसान झाले. कोथिंबिरीला प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीच्या ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले. दसऱ्याला ४५ क्विंटल झेंडू उत्पादन निघाले. थेट शेतातून प्रतिकिलो ४५ रुपये दराने विक्री केली. फ्लॉवरचे उत्पादन सुरू झाले. आजवर २५ ते ३० क्विंटल उत्पादन निघाले. ७० रुपये किलो दर मिळाला, अजून ५० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे, असेही चव्हाळ यांनी सांगितले.
कोथिंबिरीतून झेंडू, फ्लॉवर बियाणे तसेच लागवडीवरचा खर्च निघाला. तारबांधणी तसेच करप्याचे वेळेवर व्यवस्थापन केले. त्यामुळे दर्जेदार झेंडू उत्पादन मिळाले. दिवाळीला ६० ते ६५ क्विंटल झेंडू निघेल. पुणे, हैदराबाद येथील मार्केटमध्ये पाठविणार आहोत.प्रभाकर चव्हाळ, शेतकरी, मोरेगाव, ता. सेलू, जि. परभणी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.