Playground Agrowon
ॲग्रो विशेष

Village Playground : गाव तिथे हवे क्रीडांगण

Team Agrowon

शिवाजी काकडे

Sport Development : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या भाषणातून वाढती बालगुन्हेगारी आणि कोयता गँग या विषयी चिंता व्यक्त केली. तुर्भे येथे बारावीतील विद्यार्थ्यांच्या एका गटाने त्यांच्याच वर्गातील एका मुलाला किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली. यातच तो मुलगा मृत्युमुखी पडला. दहा ते सतरा या वयोगटातील अल्पवयीन वयोगटातील मुलांच्या हाती चाकू, तलवारी आणि कोयते येऊ लागले.

अपघातात देखील या मुलांचे प्रमाण वाढत आहे. आपली मुले अधिक आक्रमक, हिंसक, टोकाचे अविचारी आणि अविवेकी होत आहेत. या गंभीर समस्येवर सर्वांनी विचार करायलाच हवा. याची कारणे अनेक आहेत. यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे शारीरिक श्रम आणि मैदानी खेळाचा अभाव. मुलांच्या अंगात प्रचंड ऊर्जा असते. शरीरश्रम न केल्याने, घाम येईपर्यंत मैदानावर न खेळल्याने ही ऊर्जा तोडफोड, मारामारी, गाडी जोरात पळवणे, भांडण या कृतीतून बाहेर पडते.

मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अभ्यासाबरोबरच थोडे शरीरश्रम, खेळ, व्यायाम, योग, प्राणायाम, अवांतर वाचन, निसर्गाच्या सांनिध्यात राहणे गरजेचे आहे. दुर्दैवाने शहरी भाग आणि ग्रामीण भागातही मुलांना खेळण्यासाठी मोकळी मैदाने आणि क्रीडांगणे राहिली नाहीत. सरकारने गाव तिथे क्रीडांगण निर्मिती करावी.

स्क्रीन टाइम, आरोग्य आणि हिंसा

टीव्ही, स्मार्टफोन, टॅब्लेट, आयपॅड, संगणक यांच्यावरील मुलांचा वाढलेला स्क्रीनटाइम एक डोकेदुखीचा विषय झाला आहे. स्क्रीनटाइम वाढल्याने निद्रानाश, चिडचिड, एकलकोंडेपणा, एकाग्रतेचा अभाव, स्थूलता, आक्रमकपणा, टोकाच्या भावना व विचारात वाढ, हिंसक कृती अशाप्रकारे शारीरिक व मानसिक व्याधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. शाळा, क्लास, अभ्यास आणि स्क्रीन यामुळे मुलांचे मैदानावर खेळणे कमी झाले.

त्यामुळे मुलांमध्ये पचनाच्या समस्या, लठ्ठपणा व इतरही आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. मुले विविध गेम्स, रील्स, व्हिडिओ पाहतात. यात हिंसक, मारामाऱ्या करणारे प्रसंग असतात. याचाही मुलांच्या मनावर परिणाम होतो. परंतु याचा दोष केवळ मुलांना देता येणार नाही. घरी आणि शाळेतही केवळ अभ्यासाचा धोशा मुलांमागे असतो. मुलांना खेळण्यासाठी मोकळी मैदाने, क्रीडांगणे उपलब्ध नाहीत. मग हे मुले खेळण्यासाठी जातील तरी कुठे?

खेळातून सर्वांगीण विकास

खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खेळातून मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो. लहान मुलांना हवं तसं खेळू दिले तर त्यांच्या सर्जनशीलतेला संधी मिळते. मैदानावर सांघिक खेळल्याने मुलांमध्ये समूहांत काम करण्याची क्षमता, स्वतःच्या व इतरांच्या भावना समजणे,

इतरांशी संवाद साधता येणे, नेतृत्व गुणांचा विकास, ताणतणाव व्यवस्थापन, खिलाडूवृत्तीचा विकास होऊन मुलांचे सामाजिकीकरण होते. आपली मुले ज्याप्रमाणे शाळेत जाण्याची जबाबदारी पालक घेतात तशी ती व्यायामशाळेत, मैदानावर खेळावीत याचीही जबाबदारी पालकांनी घ्यावी. ज्याप्रमाणे माता -पिता मुलामुलींचे लग्न जमवून योग्य साथी निवडतात तसेच मुलांना योग्य क्रीडासाहित्य आणि क्रीडासहकारी मिळवून देणे ही पालकांची जबाबदारी आहे.

प्रत्येक जण बालपणात खेळतो. यातून मुलांच्या शारीरिक विकासाबरोबरच मेंदू विकास होतो. लहान मुलांना मातीत हात घालणे, माती उधळणे, वाळूत विहीर, किल्ला बनवणे, चिखलात, पाण्यात खेळायला आवडते. हातात येईल त्या वस्तूंचे मुले खेळणे बनवतात कारण मुले कल्पक असतात. मुले थोडी मोठी झाली की सवंगड्याबरोबर लंगडी, घसरगुंडी, उड्या मारणे, धावणे, झाडावर चढणे, नदीत, डोंगरावर फिरायला जाणे या गोष्टी मुलांना आवडतात.

मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात राहून खेळायला आवडते. निसर्गाच्या सान्निध्यात खेळल्याने मुले उपजत जिज्ञासू वृत्तीतून हुशार आणि ज्ञानी होतात. परंतु आजचे बरेच पालक मुलांना घराच्या बाहेर पडू देत नाहीत. घरातच महागडी खेळणी, संगणकावर, मोबाइलवर मुले गेम खेळतात. सतत बैठे गेम खेळल्याने मुलांचा विकास खुंटतो. यातून शरीर तंदुरुस्त कसे होणार? मुलांच्या अंगी चपळपणा, लवचिकता, निर्णयक्षमता, विश्‍लेषण कौशल्य, सहनशीलता हे गुण मैदानी खेळातून येतात.

गाव तिथे क्रीडांगण

लहान मुले आजूबाजूच्या परिसरात खेळतात. परंतु मुले मोठी झाली की त्यांना क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, कुस्ती, गोळाफेक, भालाफेक, बॅडमिंटन, कुस्ती, लांबउडी असे मैदानी खेळ खेळण्यासाठी क्रीडांगणाची आवश्यकता असते. यासाठी क्रीडांगणे शाळेत उपलब्ध नाहीत. शहरात तर जमिनीला सोन्याचा भाव आला.

जिकडेतिकडे घरेच घरे झाली. यामुळे शहरात मैदाने, क्रीडांगणे उपलब्ध नाहीत आणि ग्रामीण भागात देखील नाहीत. शहरे आणि ग्रामीण भागात शासनाकडून विकासकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. यातून रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च केला जातो. एका गावासाठी कोटी कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. ही चांगली व समाधानाची बाब आहे.

तरीदेखील विकास म्हणजे केवळ रस्ते, पुल, इमारती बांधणे नव्हे. प्रत्येक गावातील शाळेला भव्य क्रीडांगण असावे. खेळाचे साहित्य असावे. गाव तिथे क्रीडांगण असावे. यातील प्रमुख अडचण म्हणजे जागा उपलब्ध नसणे. ज्याप्रमाणे रस्ते बांधणी, औद्योगिक विकास यासाठी शासनाने अब्जावधी रुपये जमीन अधिग्रहण करण्यासाठी खर्च केले.

त्याचप्रमाणे प्रत्येक गावात, शहरात शासनाने जमीन अधिग्रहण करून क्रीडांगण निर्मिती करावी. त्याच ठिकाणी बगीचा, वाचनालय उभारावे. विकासाच्या प्रक्रियेत बालकांच्या विकासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. शाळेच्या वेळेनंतर देखील मुले इथे खेळतील, बागडतील आणि वाचतील देखील. ही खऱ्या अर्थाने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक ठरेल.

मैदानी खेळात घाम येईपर्यंत खेळल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सोबतच मुलांचे सामाजीकरण होते. मैदानावर खेळल्याने स्क्रीनटाइम आपोआपच कमी होईल. मुलांची चिडचिड आणि आक्रमक, हिंसकपणा कमी होईल. मुले खेळली की पोटभर जेवतात. दमून शांत झोपतात.

कमी वयात येणारा लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि विविध आजारांचा विळखा वाढतोय. यासाठी मैदानी खेळ, व्यायाम, सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. गावागावांत क्रीडांगणे उभारून क्रीडासंस्कृती उभी करावी. सशक्त शरीर, मन आणि मेंदू खेळण्यातून घडते. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. खेळातून मुलांच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळून मुले सुदृढ, सहनशील, शांत, संयमी, समृद्ध, विचारी आणि विवेकी बनतील.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT