Fraud Agrowon
ॲग्रो विशेष

दारव्ह्यात ४० शेतकऱ्यांना घातला एक कोटीचा गंडा

सराईत गुन्हेगारांना शोधण्यात हातखंडा असलेल्या पोलिसांना शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांनी फसगत करणारा व्यापारी मात्र गेल्या वर्षभरापासून सापडत नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ ः सराईत गुन्हेगारांना शोधण्यात हातखंडा असलेल्या पोलिसांना शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांनी फसगत (Farmer Fraud) करणारा व्यापारी (Trader) मात्र गेल्या वर्षभरापासून सापडत नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. फरार आरोपी नियमितपणे कुटुंबाच्या संपर्कात राहत त्यांना दैनंदिन कामांसाठी पैसे पुरवीत असताना तो पोलिसांनाच कसा मिळत नाही, असा सवाल करण्यात आला आहे.

दारव्हा तालुक्‍यातील गणेशपूर येथील रहिवासी असलेल्या नंदकिशोर ऊर्फ सुनील विठ्ठलराव महल्ले यांचा त्यांचे नातेवाईक असलेल्या बाबाराव वानखडे यांच्यासोबत महल्ले ट्रेडिंग कंपनी नावाने अडत व्यवसाय आहे. दारव्हा बाजार समितीचा परवानाधारक असलेल्या महल्ले यांनी गावातीलच शेतकऱ्यांकडून अनेकदा शेतीमालाची खरेदी केली. त्यानंतर त्याने चुकारेही केले. गावातूनच थेट खरेदी होत असल्याने आणि रोख चुकारे मिळत असल्याने शेतकरी त्याला त्याच्या मागणीनुसार १०० रुपये प्रति क्‍विंटल कमी दराने माल विकत होते, असे फसगत झालेले शेतकरी संजय गावंडे सांगतात.

२०२१ मध्ये देखील नंदकिशोर महल्ले याने गणेशपूर गावातील ४० शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर या शेतीमालाची खरेदी केली. या सर्व शेतकऱ्यांना चुकाऱ्यापोटी धनादेश देण्यात आले. संजय गावंडे यांना आठ लाख २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे; तर काही शेतकऱ्यांकडे काटा पावत्या आहेत. परंतु हे धनादेश बॅंकेत वटविण्यासाठी टाकल्यानंतर महल्ले यांच्या खात्यात निधी नसल्याने ते अनादरीत झाले. गावातील बहुतांश शेतकऱ्यांना हाच अनुभव आला. त्यानंतर त्यांनी नंदकिशोर महल्ले यांच्या घरी धाव घेतली असता तो फरार झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांकडून देखील योग्य खुलासा होत नसल्याने अखेरीस याप्रकरणी दारव्हा पोलिसात ३१ जुलै २०२१ रोजी तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण केली. परंतु वर्षभराचा कालावधी लोटला असताना कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील या आरोपीस पोलिसांना शोधता आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवरच संशय व्यक्‍त केला जात आहे. फरार असलेल्या नंदकिशोर याने खरेदी केलेला शेतमाल हा अग्रवाल यांच्या गोदामात ठेवलेला होता. हे गोदाम सील करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. परंतु त्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यानंतरच्या काळात नंदकिशोरच्या सांगण्यावरून त्याचे वडील व नातेवाइकांनी गोदामातील शेतीमाल बाहेर काढत त्याची विक्री केली, असाही आरोप संजय गावंडे यांनी केला आहे.

या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली. परंतु मुख्य आरोपी नंदकिशोर महल्ले गेल्या वर्षभरापासून सापडत नाही. आम्ही तक्रारकर्त्यांना तो दिसल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे. परंतु तक्रारकर्ते आम्हाला आरोपीबद्दल माहिती देत नसल्याने अडचण होत आहे.
सुरेश म्हस्के, ठाणेदार, दारव्हा पोलिस ठाणे, यवतमाळ
पोलिसांकडून अर्थकारणाआड यातील आरोपीचा शोध घेतला जात नसल्याचा आम्हाला संशय आहे. आरोपी नंदकिशोर महल्ले हा कुटुंबीयांच्या सातत्याने संपर्कात आहे. त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी देखील तो नियमीत पैसे पाठवत असताना पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवत साधे कॉल रेकॉर्डही तपासले जात नाहीत, यावरूनच पोलिसांची भूमिका स्पष्ट होते.
संजय गावंडे, शेतकरी, गणेशपूर, यवतमाळ
सायबर सेलच्या मदतीने आणि इतर सर्वच पोलिसी हातखंडे वापरत आरोपी नंदकिशोर महल्लेचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला जेरबंद करू असा आम्हाला विश्‍वास आहे.
संदीप पाटील भुजबळ, पोलिस अधीक्षक, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Crop Loan Rates: पीकनिहाय कर्जदर निश्चित

Sugarcane Payments Pending: साखर कारखान्यांकडे अडकले शेतकऱ्यांचे ८७६ कोटी रुपये

Jowar Prices Low: ज्वारीला कमी दर; शेतकरी आर्थिक अडचणीत

SCROLL FOR NEXT