Ashadhi Wari Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2023 : अकलूजच्या नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावले

Team Agrowon

Solapur News : ‘चला पंढरीसी जाऊ, बाप रखुमा देविवरा पाहू,’ ‘ज्ञानेश्वर माऊली-तुकाराम’, ‘जय जय रामकृष्ण हरी’...असा हरी नामाचा गजर करीत ‘भक्ती रसात’ चिंब न्हाहून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शनिवारी (ता.२४) सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले. या सोहळ्याने वारकरी सुखावून गेले.

शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूज येथे आगमन झाले. पालखीचे स्वागत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. अश्व आणि पादुकांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनातर्फे या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला. पालखीच्या रथाचे सारथ्य पालकमंत्री विखे-पाटील यांनी केले. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर आदी उपस्थित होते.

हाती दिंड्या-पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा-ताणाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत असल्याचे चित्र पहायला मिळाले.

रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर विविध राजकीय नेत्यांच्या हजेरीनेही या सोहळ्याने लक्ष वेधले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आदी या वेळी आवर्जून उपस्थित होते.

पहिले गोल रिंगण

पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. मानाच्या अश्वाच्या फेऱ्या आणि पाठोपाठ हाती पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांनी रिंगणात मारलेल्या फेऱ्यांनी हे रिंगण डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. या रिंगणात अश्वाच्या धावण्याचा सोहळा पाहणे जणू एक पर्वणीच ठरली. या रिंगणाने उपस्थित वारकरी सुखावून गेले.

अमेरिकन राजदूताची उपस्थिती

या पालखी सोहळ्यातील रंगलेल्या रिंगण सोहळ्याचा सुखद अनुभव घेण्यासाठी अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी हे आवर्जून उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Maharashtra Politics : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेसचा लढा

Neera Karha Upsa Irrigation Scheme : बारामतीचा जिरायत शिक्का पुसणार

Agriculture Input Subsidy : निविष्ठांचे अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

Bioplastic Production : ‘बायो प्लॅस्टिक’ चे उत्पादन वाढविणे काळाची गरज

SCROLL FOR NEXT