Jaggery Market
Jaggery Market  Agrowon
ताज्या बातम्या

Jaggery Market : कोल्हापुरात गूळ सौदे बंदचा अनियंत्रित पोरखेळ

Team Agrowon

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्याच महिन्यात दरावरून वादंग निर्माण झाल्यानंतर तब्बल चार दिवस गूळ सौदे (Jaggery Market ) बंद होते. यातून तोडगा निघाल्यानंतर सौदे नियमित सुरू झाले.

गुळाची खरेदी- विक्री नियमित सुरू झाली असे वाटत असताना माथाडी कामगारांनी यात खोडा घातला. मंगळवारी (ता. ३) दुपारी निम्मे सौदे सुरू असतानाच स्वतःचे उपद्रव मूल्य दाखवत मजुरी वाढीसाठी सौदे बंद केले.

पुन्हा बैठकांचे गुऱ्हाळ सुरू राहिले. बुधवार दुपारपासून अजूनपर्यंत यातून तोडगा निघाला नव्हता. सौदे ही बंद होते.

गूळ हंगाम ऐन बहरात आलेला असताना सौदे बंदचा पोरखेळ नव्या वर्षातही येथील बाजार समितीत कायम राहिला आहे. बाजार समिती प्रशासनासह शासनाचे हतबल अधिकारी हे चित्र बाजार समितीत नित्याचेच झाले आहे.

गूळ बाजारच संकटात येण्याची भीती
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळे बंद आहेत. गुळाच्या आवकेत २५ टक्के घट झाली आहे. याबरोबरच गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर बाजारपेठेला कर्नाटक व इतर जिल्ह्यांतील गुळाची मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

यातून तरण्याचे मोठे आव्हान कोल्हापुरी गुळाला आहे. गूळ बाजाराचा लौकिक राखण्याची जबाबदारी सर्वच घटकावर असताना प्रत्येक जण सोईस्करपणे याकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या पायावरच धोंडा पाडून घेत असल्याचे दुर्दैवी चित्र बाजार समितीत आहे.

पंधरवडा, महिना झाला की प्रत्येक घटकाला आपल्यावर अन्याय झाल्याची जाणीव होते आणि थेट सौदे बंद पडतात. या खेळात सगळ्यांचेच नुकसान होते हे कोणीही लक्षात घेत नाही. सध्या बाजार समितीवर प्रशासक मंडळ आहे.

त्यांच्या साथीला जिल्हा उपनिबंधक व यंत्रणेची ताकद आहे. पण सौदे बंद झाले की ही ताकदच गायब झाल्यासारखी स्थिती होते. प्रत्येकाला खूष करण्याचा नादात आपले अधिकारच गमावल्यासारखी बाजार समिती प्रशासनाची अवस्था झाली आहे.

कुठल्याच घटकावर बाजार समितीचा वचक नसल्याने कोणीही यावे आणि सौदे बंद पाडून जावे, अशीच अवस्था सध्या बाजार समितीत आहे.


सध्या गूळ बाजारात आवक कमी असूनही दरही फार नाहीत अशा प्रतिकूल परिस्थितीत कडक भूमिका प्रशासनाने घेणे अपेक्षित असताना सहजपणे सौदे बंद पडले जातात.

पुन्हा सुरू होतो तो कंटाळवाणा खेळ आणि यात भरडला जातो तो गूळ उत्पादक आणि बाजार समितीचा नावलौकिकही.


बाजार समिती ‘गांधारी’च्या भूमिकेत
बाजारपेठेचा लौकिक घालवणाऱ्या घटना घडत असतील तर बाजार समितीने कडक भूमिका घेणे अपेक्षित असते.

सौदे बंद करू नयेत असे ठरलेले असतानाही काही घटक सातत्याने सौदे बंदचे हत्यार वापरतात.

कोणत्याही कारणावरून सौदे बंद पडले की संबंधित घटकावर बाजार समितीने प्रथम कारवाई करणे अपेक्षित आहे. पण तसे न होता जेवढे म्हणून चर्चेची गुऱ्हाळ लांबवता येईल तेवढे लांबवण्याचे प्रयत्न सुरू राहतात.

गेल्या काही वर्षांत बाजार समितीने अशा पद्धतीने कुठलीच कारवाई केल्याचे दिसत नाही. सौदे बंद पडूनही बाजार समिती ‘गांधारी’ची भूमिका घेत असेल, तर मग बाजार समितीत सौदे कशासाठी, असा सवाल गूळ उद्योगातून व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

Turtle Conservation Issue : रायगडमध्ये तापमानवाढीमुळे कासवसंवर्धन संकटात

Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

Summer Heat : उष्णता वाढली पारा ४५ अंश सेल्सिअसवर

Agrowon Podcast : गव्हाच्या भावात सुधारणा ; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच काय आहेत गहू दर ?

SCROLL FOR NEXT