Sharad Pawar Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra NCP Crisis : पक्षावर ताब्यासाठी रस्सीखेच

Team Agrowon

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेप्रमाणेच पक्षावर ताबा मिळविण्यासाठी दोन्ही गटांकडून रस्सीखेच सुरू झाली आहे. मूळ पक्ष आपलाच असल्याचा दावा शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून सोमवारी करण्यात आला.

त्याचबरोबर एकमेकांच्या गटातील कळीच्या पदांवरील व्यक्तींना हटवून त्या जागी आपआपल्या गटाच्या नेत्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष दीर्घकाळ चालणार असल्याचे संकेत मिळाले.

शिवाय हा संघर्ष विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोगापासून ते न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यताही स्पष्टपणे पुढे आली. बुधवारी (पाच जुलै) राष्ट्रवादीतील दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

अजित पवार यांच्या गटाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हटवून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली, तर विधिमंडळ पक्षनेतेपदी जयंत पाटील यांच्या जागी अजित पवार यांची नियुक्ती केली.

अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेतून अपात्र करावे, अशी याचिका अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे.

पक्षातील बहुतांश आमदार आणि पदाधिकारी आमच्या बाजूने असल्याने पक्ष आणि चिन्ह आमचेच आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने केला. पवार यांच्यासह कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि अन्य नेत्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला.

दरम्यान, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कार्याध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल यांना हटविल्याचे ट्विट केले, त्यालाही छगन भुजबळ नी आव्हान देत कार्यकारिणी जोपर्यंत त्यांना हटवत नाही तोवर पटेल कायम राहतील, असे सांगून पवार यांना आव्हान दिले.

नऊ जणांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल केल्याचा मुद्दा उपस्थित करत पवार यांनी ‘आमच्याकडे बहुमत आहे. आमदारांनी मला विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून निवडले आहे. तसेच अनिल पाटील हे पक्षाचे प्रतोद होते.

त्यांची नियुक्ती कायम करण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला अपात्र करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे, असे सांगितले.

श्री. पटेल म्हणाले, ‘दिल्ली येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत माझी कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मला काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना पदमुक्त करण्यात येत असून त्यांच्याजागी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

तसेच महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येत आहे. अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी लवकरच करण्यात येतील. त्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी बांद्र्यातील एमईटी कॉलेजमध्ये पाच जुलै रोजी मेळावा घेण्यात येणार आहे.

त्यामुळे जयंत पाटील यांनी आपला कार्यभार तत्काळ, आत्ताच तटकरे यांच्याकडे सोपवावा. कालपासून काही जण आमच्या पक्षातील सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारी पत्रे देत आहेत. मात्र, या सदस्यांवर कारवाई करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे.’

‘कारवाईसाठी कायदा, नियम आहे ’

श्री. पवार म्हणाले, ‘आम्ही घेतलेला निर्णय कुणाला बंड वाटेल किंवा आणि काय वाटेल. त्याविरोधात कुणी कारवाई करणार असेल तर कायदा आणि नियम आहे.

त्यासाठी अधिकारही दिलेले आहेत, असे सूचक विधान पवार यांनी केले. आमच्याविरोधात कारवाई करताना वर्षापूर्वी असाच वाद निर्माण झाला होता. त्यावेळी दिलेला निकाल आपण सर्वांनी पाहिला आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही विरोधात राहून वर्षभर अभ्यास केला आहे. त्यामुळे फटाफट निर्णय घेऊ. आमदारांच्या कामांना दिलेल्या स्थगिती उठवून अधिक निधी देऊन विकासकामे करणे हेच आमचे ध्येय आहे. महायुतीचे सरकार आम्ही चांगल्या पद्धतीने चालवू. शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत काम करू.’

पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवू : तटकरे

राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष पटेल यांनी कालच (रविवारी) माझी नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी संघटनात्मक कामावर भर देणार आहे. पाच तारखेला आम्ही राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे. त्यावेळी अन्य नियुक्त्याही केल्या जातील. प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, सूरज चव्हाण, उमेश पाटील यांची नियुक्ती केली आहे.

पदे वाटायचा अधिकार किटी पार्टीला नाही : आव्हाड

दरम्यान, शरद पवार हेच आमचे नेते आहेत आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे, हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यासह सर्वच नेते मान्य करतात तर मग अध्यक्ष या नात्याने तटकरे आणि पटेल यांना रविवारीच पदमुक्त केले आहे. त्यामुळे पदे वाटायचा अधिकार किटी पार्टीला नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

राष्ट्रीय अध्यक्ष हे पद पक्षाच्या घटनेत आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या घटनेने पक्षाध्यक्षांना काही अधिकार दिले आहेत. त्या अधिकारात पटेल व तटकरे यांना रविवारीच निलंबित केले आहे.

पटेल कार्यकारी अध्यक्ष असले तरी तुम्ही नेमणुका करू शकत नाही. पक्षातून निलंबित केल्यानंतर नियुक्त्या का केल्या? पक्षाध्यक्षाला लपवून आपण नऊ आमदारांना पक्षविरोधी कारवाया करण्यास प्रवृत्त केले त्याबद्दल पटेल यांना निलंबित केले आहे. जयंत पाटील यांची नियुक्ती पवार यांनी केली आहे.

कायदेशीर कारवाई करणार नाही, असे एकजण म्हणत होते, असे काही जण म्हणतात मग त्यांचे नाव का घेत नाही. त्यांचे नाव शरद पवार आहे. जयंत पाटील आणि शरद पवार यांनी एकत्र बोलून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कायदेशीर अज्ञानातून घेतलेल्या निर्णयांना काहीच अर्थ नाही.’

तटकरे, पटेल यांची हकालपट्टी

सुप्रिया सुळे यांनी पक्षाध्यक्ष पवार यांना पत्र लिहिल्यानंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पदावरून हटविण्यात आले. ही कार्यवाही रविवारी (ता. २) करण्यात आल्याचे पत्र सोमवारी प्रसिद्धीस दिले. दरम्यान सुळे यांच्या पत्रानंतर पटेल आणि तटकरे यांचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेत हक्कालपट्टी केली असे जाहीर करण्यात आले.

शिंदे गट अस्वस्थ; फडणवीसांच्या बंगल्यावर खलबते

राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागानंतर शिंदे गट कमालीचा अस्वस्थ झाला आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दिवसभर खलबते सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दैनंदिन कामकाजात कुठेही शासकीय कामाची नोंद नव्हती.

ते दिवसभर ठाण्यातील निवासस्थानी होते. यादरम्यान शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले. या आमदारांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांची समजूत शिंदे यांनी काढल्याचे समजते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिवसभर चर्चा केली.

विधानसभा अध्यक्ष फडणवीसांच्या भेटीला

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सोमवारी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. वैधानिक दर्जाचे पद असताना त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने हा आज चर्चेचा विषय ठरला.

शरद पवार यांना विसरला का? : अजित पवार

प्रदेशाध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. पक्ष जर तुमच्याकडे असेल तर राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत, असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता, ‘शरद पवार यांना विसरला का?’ असा प्रतिसवाल त्यांनी केला. १९९९ पासून आम्ही सर्वजण एकत्र काम करत आहोत.

कालच पटेल यांनी प्रदेशाध्यक्षदी तटकरे यांची नियुक्ती केली आहे. काल आम्ही शपथ घेतल्यानंतर काहीजण प्रतिक्रिया देत आहेत. आम्हाला कायदेशीर गोष्टींमध्ये जायचे नाही, आम्ही जनतेत जाऊ, असे सांगितले होते. पण रात्री १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन वेगळीच भूमिका जाहीर केली जात आहे. आम्ही पात्र की अपात्र, पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाकडे हे कुणी व्यक्ती ठरवत नाही तर निवडणूक आयोग ठरवत असतो. आम्ही म्हणजेच पक्ष असल्याने कारवाईचा प्रश्नच येत नाही.

’ सुप्रिया सुळे यांनी तुमच्याविरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न केला असता, आम्ही पक्ष वाढवणारे आहोत. कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही, असे श्री. पवार म्हणाले.

शरद पवार यांना भुजबळांचे आव्हान

प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्षपदावरून शरद पवार यांनी हटविल्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी पवार यांना आव्हान दिले. ते म्हणाले, ‘प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक पक्षाच्या कार्यकारिणीने केली आहे.

त्यामुळे नेमणुकीचा आणि पदावरून काढण्याचा अधिकार वरिष्ठांना नाही, जोवर कार्यकारिणी पदावरून काढत नाही तोवर पटेल पदावर असतील. कार्यकारिणीचा निर्णय नियमाने आहे. त्यामुळे ते अजूनही काम करू शकतात. कार्यकारिणीच्या निर्णयानंतर पाहता येईल.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT