अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon : खानदेशात मका दरात (Maize Rate) सुधारणा झाली असून, कमाल दर २०५० रुपये प्रतिक्विंटल आहेत. सध्या बाजार समित्यांमध्ये आवक (Maize Arrival) कमीच आहे.
मध्यंतरी किमान दर १७५० रुपये तर कमाल दर १९५० रुपये प्रतिक्विंटल होते. आवक कमी असताना दर कमी होते. सध्या मळणी सुरू आहे.
पुढील सात ते आठ दिवसांनंतर बाजार समित्यांत आवक सुरू होईल. यातच दरात किंचित वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
मक्याची लागवड खानदेशात यंदा मागील हंगामाच्या तुलनेत काहीशी वाढली होती. खानदेशात सुमारे ३५ हजार हेक्टरवर लागवड झाली होती.
लागवड विविध टप्प्यांत झाली. ऑक्टोबरच्या अखेरीस लागवड कमी होती. सर्वाधिक लागवड नोव्हेंबरमध्ये झाली. तसेच काही शेतकऱ्यांनी डिसेंबर व जानेवारीत लागवड केली.
ऑक्टोबरमध्ये लागवडीच्या मक्याची मळणी सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या मक्यात कापणी, कणसे मळणीसाठी गोळा करण्याचे काम सुरू आहे.
तर डिसेंबरच्या सुरुवातीस लागवड केलेल्या मका पिकात दाणे पक्व झाले असून, पुढे फक्त एक वेळेस सिंचन करावे लागेल.
जानेवारीत लागवड केलेल्या मका पिकात निसवण मागील १२ ते १६ दिवसांपूर्वीच पूर्ण झाली आहे. या पिकात दाणे पक्व होत आहेत.
या पिकास पुढे दोन वेळेस सिंचन करावे लागेल. सध्या मळणीचे काम जळगावमधील चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर भागात सुरू आहे.
मळणीला पुढील आठवड्यात चांगला वेग येईल. कारण नोव्हेंबरमधील लागवडीच्या मका पिकाची कापणी, कणसे गोळा करण्याचे काम १०० टक्के पूर्ण होईल.
काही भागात मजूरटंचाई आहे. तसेच सध्या खानदेशात यात्रोत्सव, कानजाऊळ व इतर कार्यक्रम असल्याने मजूरटंचाई अधिक जाणवत आहे.
उष्णताही वाढत आहे. यामुळे पुढेही टंचाई अधिक असणार आहे. परंतु मजुरीसंबंधी सातपुड्यातील मंडळी विविध भागात दाखल झाली आहे. यामुळे ही टंचाई दूर करण्यास काहीशी मदत होईल.
अमळनेर, चोपडा येथील बाजारात मिळून सध्या रोज ६०० क्विंटल मक्याची आवक होत आहे. जळगाव, चाळीसगाव भागांत मक्याची आवक सध्या कमी आहे. पुढील पंधरवड्यात बाजारात मक्याची आवक वाढू शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.