Lohgaon Cow Death
Lohgaon Cow Death  Agrowon
ताज्या बातम्या

Lohgaon Cow Death : बावीस गाईंच्या मृत्यूमुळे ढेरे कुटुंबावर कोसळले आभाळ

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

लोहगाव, जि. नगर ः आठ दिवस झाले, गोठा रिकामा होतोय, दररोज दोन-तीन गाई (Cow) दम तोडत आहेत. एक-एक करत बावीस गाईंना गोठ्यातून (Cattle Shed) बाहेर काढावे लागले. लेकरांसारखी जपलेली जित्राबं डोळ्यांदेखत जात असल्याने आभाळ कोसळलंय, एवढं दुःख ओढावलंय की ते पचवायचं कसं, नेवासा तालुक्यातील लोहगावच्या ढेरे कुटुंबाची (Dhere Family) ही अवस्था जिवाची काहिली करणारी आहे.


गाईंना वाचवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पराकाष्ठा असूनही मृत्युसत्र थांबेना. आठ दिवसांत तब्बल बावीस गाईंचा मृत्यू होणं थरकाप उडवणारं आहे. या प्रकाराने लोहगावात सन्नाटा पसरलाय. नगर-औरंगाबाद रस्त्यावरील घोडेगावापासून पाच किलोमीटर अंतरावर लोहगाव. या भागात पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने बहुतांश शेतकरी दूध व्यवसाय करतात. आठ दिवसांपासून मात्र हे गाव चर्चेत आलेय ते ढेरे कुटुंबातील दुभत्या गाईंच्या अचानक होत असलेल्या मृत्यूमुळे. जनार्दन सोपान ढेरे यांचे सर्वसाधारण कुटुंब. रोहिदास व रामदास हे त्यांची मुले शेती करतात. २००९ पासून शेतीला पूरक म्हणून दूध व्यवसायाला सुरुवात केली. सर्व गाई एचएफ. सुरुवातीला दोन-चार गाई होत्या. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली. गाईंचा विस्तार होत असल्याने चांगल्या गोठ्याचे बांधकाम केले. आता गोठ्यात २९ गाई झाल्या होत्या. दररोज दोनशे लिटरच्या जवळपास संकलन व्हायचे. गाईचा विस्तार अधिक असल्याने पाच एकरांवर चाऱ्याची लागवड. रोजच्या चाऱ्यात विकत आणलेला ऊस, गिन्नी गवत आणि लसूण घास असायचे.

बुधवारी (ता. २१) नेहमीप्रमाणे ऊस, गिन्नी गवताची कुट्टी एकत्रित करून जनावरांना टाकली. लसूणघास दिला. रात्री एकच्या सुमारास गाईंचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका गाईचा मृत्यू झाला. एका दिवसात सायंकाळपर्यंत पाच गाईंचा मृत्यू झाला. चाऱ्यांतून विषबाधा झाल्याचे समजून पशुसंवर्धन विभागाकडून उपचार सुरू झाले, मात्र गाईंचा मृत्यू थांबला नाही. लोहगावासह परिसरातील गावांत माहिती कळाली आणि गावकरी हादरले. आठ दिवसांपासून गावांतील शेतकरी, महिला नातेवाईक ढेरे वस्तीवर बसून आहेत. आजपर्यंत २२ गाईंचा मृत्यू झालाय. अचानक आलेल्या संकटाने ढेरे कुटुंब मोडून पडलेय. लेकरासारख जपलेल्या गाई डोळ्यासमोर जीव तोडत असल्याने कुटुंबातील महिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नाहीत. गावातही सन्नाटा पसरल्यासारखा झालाय. आभाळच कोसळलेय, दुःख पचवायचे कसे, असा प्रश्‍न येथे येणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे, असे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब राजळे म्हणाले.

मृत्यूचे कारण स्पष्ट होईना
लोहगावांत ढेरे यांच्या पाच गाईंचा सुरुवातीला गुरुवारी (ता. २२) मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांच्या तपासणीत पुण्यातील रोगनिदान प्रयोगशाळेच्या अहवालात चाऱ्यात आॅक्सिलेट, नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. त्या अनुषंगाने गाईंच्या मृत्यूनंतर पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. सुनील तुंबारे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. घोडेगावचे पशुधनविकास अधिकारी डाॅ. मनोज अभाळे, सहायक पशुधनविकास अधिकारी नेवाशाचे डाॅ. नितीन पालवे, तालुका विस्तार अधिकारी डाॅ. दिनेश पंडुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उर्वरित गाईंवर उपचार सुरू केले. मात्र गाईंचा मृत्यू होण्याचे सत्र अगदी आजपर्यंत थांबायला तयार नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागानेही आता हात टेकलेत. आतापर्यंत ढेरे कुटुंबाने औषधोपचारावर सुमारे चार लाखांच्या जवळपास खर्च केला आहे. आता मात्र ढेरे कुटुंबासह गावकऱ्यांना गाईंच्या मृत्यूबाबत वेगळीच शंका येऊ लागली आहे. पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. मात्र उपचारानंतरही गाईंच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्याने गावकरी, या भागातील दूध उत्पादक मात्र हादरले आहेत. मृत्यूचे कारण स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे कुशीनाथ ढेरे यांनी सांगितले.

मदतीची गरज
ढेरे कुटुंबाचे या अपघाताने वीस लाखांच्या जवळपास नुकसान झालेय. कालच (मंगळवारी, ता. २७) शेतकरी मराठा महासंघाचे नेते संभाजीराव दहातोंडे यांच्यासह गावकऱ्यांनी मुंबईत पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन मदत देण्याची विनंती केलीय. आतापर्यंत नेत्यांनी लोहगावाला भेटी दिल्या. तहसीलदार व पशुसंवर्धनचे अधिकारी वगळता अन्य अधिकारी अजून येथे आले नाहीत. अजून कोणतीही मदत मिळाली नाही. नागरिक मदतीसाठी पुढे येतील, मात्र प्रशासकीय पातळीवर भरीव मदत मिळणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

आमच्या आयुष्यात असा प्रकार कधी पाहिला नाही. अत्यंत संघर्षातून आपला दूध व्यवसाय वाढवलेल्या ढेरे कुटुंबाचे आठ दिवसांत होत्याचे नव्हते झाले. कुटुंब पुरते मोडून पडलेय. या कुटुंबाला आता आधाराची गरज आहे. शासनाने या कुटुंबाला भरीव हात देण्याची गरज आहे.
- भाऊसाहेब राजळे पाटील, ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच, लोहगाव, ता. नेवासा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT