Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : ऐन दिवाळीत पिकांची राख रांगोळी

माणिक रासवे

परभणी ः जून, जुलै मधील सततचा पाऊस (Heavy Rainfall) त्यामुळे जमिनी चिभडल्या. पिकांची वाढ (Crop Production) खुंटली. ऑगस्टमध्ये सोयाबीनच्या शेंगा, कापसाचे बोंडे भरण्याच्या अवस्थेत पावसाने तब्बल महिनाभर ताण दिला. उत्पादकता घटली. त्यात आता ऐन सुगीमध्ये परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे पिके वाया (Soybean Crop Damage) गेलीत. पाण्याचा निचरा होत नाही.

कापणी करता येत नाही. पाऊस थांबायचे नाव घेत नाही. उत्पादन हाती लागलच नाही. रब्बी पेरणीच्या खर्चाचे वांदे आहेत. औंदा पावसानं संमद्या पिकांची राख रांगोळी केली त्यामुळं आता कशाची आलीय दिवाळी. पिके काळवंडली त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची रया गेली अशा व्यथा जांब मंडलातील शेतकऱ्यांनी मांडल्या.

परभणी जिल्ह्यात दसऱ्या पासून दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यानंतर कापूस, तूर आदींसह फळपिकांनाही जबर तडाखा बसला आहे. शुक्रवारी (ता. १४) तब्बल तीन ते चार झालेल्या मुसळधार पावसामुळे जणू शेतकऱ्यावर दुखःचे आभाळ कोसळले असल्याची परिस्थिती निर्माण झाली.

जांब येथील लक्ष्मण रेंगे म्हणाले की, गेल्यासाली पावसात भिजल्यामुळे डागील झालेले सोयाबीन अजून घरात पडून आहे. यंदा सोयाबीनचा वाण बदलला. दहा एकरांवर पेरणी आहे. दोन्ही बाजूने वाहणाऱ्या नाल्यांचे पाणी शेतात शिरले. चार एकरांवरील सोयाबीन अनेक तास पुराच्या पाण्यात होते. अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही. उभ्या सोयाबीनमुळे कुजल्या आहेत. शेंगांवर बुरशीचा थर चढला आहे. भिजून भिजून दाणे डागील झाले आहेत. औंदा उत्पादन आणि भाव कमी मिळून दुहेरी नुकसान झाले आहे.

मांडाखळी येथील बालासाहेब राऊत यांच्या पाच एकर सोयाबीनमध्ये वरच्या बाजूच्या शेतातून पाणी पाझरत आहे. सोयाबीनची पानगळ झाली आहे. शुक्रवारी तीन ते चार तास पाऊस झाल्याने पीक पाण्याखाली गेले. भिजलेल्या शेंगांना मोड फुटले आहेत. महादेव राऊत यांच्या शेतात जाण्यासाठी गावाजवळील तसेच त्यापुढील औढा ओलांडून जावे लागते. त्यामुळे शेतमालाच्या वाहतुकीसाठी करणे अवघड काम आहे. शुक्रवारी विजांच्या कडकडाटात तीन ते चार तास पाऊस झाला.

आखाड्यावरील पत्र्याच्या निवाऱ्यात सहा ते सात जणांना जीव मुठीत धरुन थांबावे लागले. पूर आल्यामुळे दोरखंडाच्या मदतीचे ओढे ओलांडावे लागले. पाच एकरांवरील संत्र्याला फळे लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी बागवान बागेची पाहणी करून गेला. सौदा बाकी आहे. परंतु मुसळधार बागेत एक ते दीड फूट पाणी साचलेले आहे. निचरा करण्यासाठी उपाय करून पाणी हटत नाही. त्यामुळे बागेतील सोयाबीन सडले आहे.

अतिरिक्त पाण्यामुळे संत्र्यामध्ये मुळकुज होण्याची भीती आहे. त्यामुळे फळे परिपक्व होणार नाहीत. सोयाबीनपेक्षाही संत्र्याचे नुकसान मोठे आहे. पाळोदी येथे शिक्षक असलेले मुंजाभाऊ शिळवणे यांचे अर्धा ते पाऊस एकर टोमॅटोचे पीक मुसळधारमुळे पाण्यात बुडाले. शनिवारी (ता. १५) उघडीप होती. शिळवणे यांनी सायंकाळी शाळेतून थेट शेतात आले. स्वतः पाठीवर पंप घेत टोमॅटोवर बुरशीनाशकाची फवारणी करत पीक वाचविण्याचा प्रयत्न केला.

जांब मंडळातील जांब, आळंद, भोगाव, मांडाखळी, सोन्ना, उमरी, डफवाडी, पिंपळगाव ठोंबरे, गव्हा, मोहपुरी, १२ हजार हेक्टरवरील सोयाबीन, कपाशचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पेडगाव मंडळातील पेडगाव, किन्होळा, एकरुखा, नरसापूर, पिंपळगाव स. मि, आर्वी, शहापूर, गोविंदपूर, काष्टगाव. आव्हाडवाडी, पान्हेरा आदी गावांतील सुमारे १० हजार हेक्टरहून अधिक पिकांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. पिंगळी, परभणी मंडलातील सर्वच पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यामुळे भरीव मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.

माझे पाच एकरांवर ८०० ते ९०० संत्राची झाडे आहेत. त्यात सोयाबीनचे आंतरपीक आहे. शुक्रवारच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहेत. निचरा होत नाही. त्यामुळे सोयाबीन हातचे गेले आहे. शिवाय संत्र्याची फळाचे खूप नुकसान झाले आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी. विमा भरपाई द्यावी.
महादेव राऊत, शेतकरी मांडाखळी
दहा एकर सोयाबीन आहे. सततच्या पावसात भिजल्यामुळे शेंगा काळवंडल्या आहेत. दाणे डागील झाले आहेत. चार एकरांवरील सोयाबीनमधून ओढ्याचा पूर गेल्याने नुकसान आणखीन वाढले आहे. चिखल असल्यामुळे कापणी करता येईना.
लक्ष्मण रेंगे, जांब, ता. परभणी.
अतिवृष्टीमुळे मंडळातील सुमारे बारा हजार हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कृष्णा पाटील, कृषी सहायक मांडाखळी, ता. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT