Cotton Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Sowing : कापूस लागवड पिछाडीवर

Kharif Season Cotton : देशातील खरिपाची पेरणी आतापर्यंत ९१५ लाख हेक्टरवर पोचली आहे. खरिपातील सरासरी ८५ टक्के क्षेत्र पिकाखाली आले आहे.

Team Agrowon

Cotton News : देशातील खरिपाची पेरणी आतापर्यंत ९१५ लाख हेक्टरवर पोचली आहे. खरिपातील सरासरी ८५ टक्के क्षेत्र पिकाखाली आले आहे. आतापर्यंत भाताची लागवड जवळपास साडेतीन टक्क्यांनी तर तेलबियांची लागवडही अडीच टक्क्यांनी वाढली आहे. सोयाबीनचा पेरा यंदा चार टक्क्यांनी अधिक आहे. तसेच कापसाची लागवड दीड टक्क्याने कमी दिसते आहे.

जुलै महिन्यात देशातील बहुतेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पेरण्यांनी वेग घेतला. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ४ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अहवालानुसार, देशात खरिपाची आतापर्यंत ९१५ लाख हेक्टरवर पेरणी झाली. मागीलवर्षी याच काळातील पेरणी ९१२ लाख हेक्टरवर होती. म्हणजेच यंदा पेरा जवळपास तीन लाख हेक्टरने आघाडीवर दिसतो.

कापसाची लागवड आतापर्यंत दीड टक्क्याने पिछाडीवर दिसते. यंदा जून महिन्यात पावसाने दडी दिली होती. त्यामुळे लागवडी कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. गेल्या हंगामात ४ ऑगस्टपर्यंत १२१ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. तर मात्र यंदा ही लागवड ११९ लाख हेक्टरवर पोचली. गुजरातमध्ये यंदा कापूस लागवडीत चांगली वाढ झाली आहे.

भाताची लागवड साडेतीन टक्क्यांनी वाढली आहे. आतापर्यंत २८३ लाख हेक्टरवर भाताचं पीक आहे. गेल्या हंगामात २७४ लाख हेक्टरवर भात पीक होते. म्हणजेच यंदा साडेनऊ लाख हेक्टरची वाढ भात लागवडीत झाली.

छत्तीसगडमध्ये सर्वाधिक साडेसहा लाख हेक्टरची वाढ दिसते. त्यानंतर तेलंगणात साडेचार लाख हेक्टर, उत्तर प्रदेशात जवळपास तीन लाख हेक्टर, झारखंड जवळपास दीड लाख हेक्टर आणि मध्य प्रदेश दीड लाख हेक्टरने भात लागवड वाढली आहे.

कडधान्य पेरणी ९ टक्क्यांनी पिछाडीवर

गेल्या आठवड्यापर्यंत कडधान्य लागवड ११ टक्क्यांनी पिछाडीवर होती. पण मागील आठवडाभरात कडधान्य लागवड वाढल्याचे सरकारने स्पष्ट केले. कडधान्य लागवड आता ९ टक्क्यांनी पिछाडीवर आहे.

कडधान्याची पेरणी अजूनही ११ लाख हेक्टरने कमी आहे. आतापर्यंत १०७ लाख हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला. मुगाचा पेरा सव्वाआठ टक्क्यांनी कमी असून जवळपास ३० लाख हेक्टरवर मूग आहे. उडदाखाली २८ लाख हेक्टर क्षेत्र असून जवळपास १४ टक्क्यांनी कमी लागवड आहे.

तूर लागवड ८ टक्क्यांनी कमी

तुरीच्या लागवडीत गेल्या आठवड्यात मोठी वाढ झाल्याचे दिसते. गेल्या आठवड्यापर्यंत तूर लागवड १६ टक्क्यांनी पिछाडीवर होती. पण आता गेल्यावर्षीच्या तुलनेत तुरीखालील क्षेत्र ८ टक्क्यांनी कमी दिसते. म्हणजेच केवळ आठवडाभरात तुरीची लागवड ८ टक्क्यांनी वाढली. आतापर्यंत तुरीखाली जवळपास ३७ लाख हेक्टर क्षेत्र तुरीखाली आले. गेल्या हंगामात याच काळातील क्षेत्र जवळपास ४० लाख हेक्टर होते.

भरडधान्यामध्ये वाढ

देशात आतापर्यंत १६४ लाख हेक्टरवर भरडधान्याचा पेरा झाला. गेल्या हंगामात याच काळात १६२ लाख हेक्टरवर पेरा होता. यात मक्याखालील क्षेत्र जवळपास ६० हजार हेक्टरने वाढून ७६ लाख हेक्टरवर लागवड झाली. बाजरीची लागवडही काहीशी वाढून जवळपास ६६ लाख हेक्टरवर पोचली. तर ज्वारी लागवड साडेसहा टक्क्यांनी कमी होऊन १३ लाख हेक्टरवर पोचली.

तेलबिया लागवड वाढली

देशातील तेलबिया लागवड आतापर्यंत अडीच टक्क्यांनी जास्त दिसते. तेलबियांखाली १८० लाख हेक्टरच्या जवळपास क्षेत्र आले. मागील हंगामात याच काळातील लागवड १७५ लाख हेक्टरच्या दरम्यान होती. तर सोयाबीन लागवडीत आतापर्यंत ४ टक्क्यांची वाढ झाली. सोयाबीनखाली आतापर्यंत १२२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. तर भुईमुगाखालील क्षेत्रात वाढ झाली असून ४१ हेक्टरवर लागवड झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT