Amravati News : शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेत एका कंपनीचे बियाणे जादा दराने विकणाऱ्या कृषिकेंद्राच्या संचालकाविरुद्ध कृषी अधिकाऱ्यांनी दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दर्यापुरातील बनोसा भागात असणाऱ्या न्यू कृषिकेंद्राचे संचालक प्रमोद टोपले यांनी अजित १५५ या कापूस बियाण्याची विक्री ठरवून दिलेल्या भावापेक्षा जादा दराने केल्याची तक्रार भामोद येथील शेतकरी हरिदास खडे यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल केली. या संबंधात दर्यापूर पंचायत समिती कृषी अधिकारी रामागडे यांनी तातडीने पोलिसांना सूचना देत कृषी विभागाच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सदर दुकानाची तपासणी केली.
एकूण ८२ हजार रुपयांचा कापूस बियाण्याचा माल पंचायत समिती कृषी विभागाने जप्त केला. या मालाची नोंद स्टॉक बुकमध्ये न घेता व पावती न देता शेतकऱ्यांना विक्री करण्यात येत होती.
८५० रुपयांना मिळणारी कापूस बियाण्याची एक बॅग तब्बल १२०० रुपयांना विक्री करताना कृषी विभागाने ट्रॅप लावून कृषिकेंद्र चालकास रंगेहाथ पकडले. दर्यापूर पोलिसात संचालक प्रमोद टोपले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेला माल परत
पंचायत समिती कृषी विभागाने त्याच कृषिकेंद्राला हा माल सुपूर्दनाम्यावर परत केल्याची अजब बाब पुढे आली आहे. यासंबंधी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सुपूर्दनाम्यावर माल देता येतो, असा नियम असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या न्यू कृषी विकास एजन्सी केंद्राचे संचालक प्रमोद टोपले यांच्याविरुद्ध दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा नोंद केला आहे.- सुरेश रामागडे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, दर्यापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.