BJP Agrowon
ताज्या बातम्या

Assembly Elections : भाजपकडून ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव सुरू

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Assembly Elections BJP : नागपूर : २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात खासकरून पूर्व विदर्भात मोठा फटका बसल्यानंतर भाजप (BJP) नेते एक-एक पाऊल फुंकून फुंकून टाकत आहेत.

पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने विदर्भात ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

२०१९ च्या निवडणुकीत तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह काही ओबीसी नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भाजपकडे आमदारांची संख्या कमी झाली होती. त्यानंतर त्या चुकीची भरपाई करण्यासाठी पक्षाने कसलीही कसर ठेवली नाही.

कारण ओबीसींचे नाराजी ओढवून घेणे परवडणारे नाही, हे प्रमुख नेत्यांच्या लक्षात आले. बावनकुळे यांच्याकडे त्यानंतर ३२ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. त्याच्या काहीच दिवसांनंतर आमदार बावनकुळेंकडे प्रदेशची जबाबदारी सोपवून ओबींसींना आपलेसे करण्याचा भाजपने पुरेपूर प्रयत्न केला. त्यात पक्षाला बऱ्यापैकी यशही मिळाले.

ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव करताना भाजपने एक पाऊल आणखी पुढे टाकले. चंद्रपूर येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे विदर्भवादी नेते असून राष्ट्रीय ओबीसी महसंघाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. डॉ. जिवतोडे यांचा चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. कारण चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे जाळे पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.

डॉ. जिवतोडे यांना पक्षात घेऊन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजय सुकर करण्याचा भाजपचा हा एक प्रयत्न असल्याचे बोलले जाते. चंद्रपूर लोकसभा हा कुणबीबहुल मतदारसंघ आहे आणि येथील कुणबी समाज जेवढा जोडला येईल, तो जोडावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या मतदारसंघात विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. सर्व तयारी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची सुरू आहे. २४ बाय सात इलेक्शन मोडवर असणाऱ्या भाजपने त्यासाठीच ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

ओबीसींना जोडण्याचा यापूर्वीचा भाजपचा प्रयत्न म्हणजे डॉ. आशिष देशमुख. डॉ. जिवतोडेंच्या आधी भाजपने देशमुखांना सोबत घेतले आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर, काटोल हे मतदारसंघ पक्के केले.

सावनेरमध्ये आमदार सुनील केदार आणि काटोलमध्ये माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपकडे तुल्यबळ उमेदवार म्हणून पाहिजे तसे चेहरे नव्हते.

डॉ. आशिष देशमुखांना सोबत घेऊन भाजपने सावनेर आणि काटोलमध्ये जोरदार टक्कर देण्याची तजवीज आजच करून ठेवली आहे.

‘मी निवडणूक लढण्यासाठी नव्हे, तर ओबीसी आणि विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये परत आलो’, असे डॉ. देशमुख सांगत असले तरी भाजप त्यांना दोनपैकी एका मतदारसंघातून लढवणार असल्याची माहिती आहे.

कारण २०१४ मध्ये आशिष देशमुखांनी काका अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही जुळवाजुळव महत्त्वाची मानली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT