पुणेः कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड महोत्सासाठी (Sillod Festival) निधी संकलनासाठी कृषी यंत्रणेला कामाला लावल्याचा आरोप होत आहे. आज विधानसभेतही हा मुद्दा गाजला. तर अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) कृषी खात्याची (Agriculture Department) प्रतिमा धुळीस मिळवली आहे, अशी टिका करत कृषिमंत्रालय शेतकऱ्यांसाठी काम करणारे म्हणून ओळखले जात होते, मात्र ते अब्दुल सत्तार यांच्या कारनाम्यामुळे आता वसुलीसाठी ओळखले जाईल, अशी टिका शेतकरी नेत्यांनी केली.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात सिल्लोड महोत्सावाचे आयोजन केले आहे. मात्र त्यासाठी निधी उभारण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावल्याचा आरोप केला जात आहे. तसेच संपूर्ण कृषी विभागालाच वेठीस धरल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणावरून शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त करत जोरदरा टिका केली. कृषी प्रदर्शने किंवा महोत्सव हे शेतकऱ्यांना त्यातून काहीतरी घेता यावे, यासाठी असतात. यातून शेतीची ज्ञानगंगा वाहते, असे आपण समजतो. मात्र कृषिमंत्र्यांनी सिल्लोड महोत्सवातून पैसे वसुलीची गंगा सुरु केली, असा आरोपही शेतकरी नेत्यांनी केला.
महाराष्ट्राच्या राजकारणाला काळिमा फासणारे प्रकरण: नवले
किसान सभेचे नेते अजित नवले म्हणाले की, सिल्लोड महोत्सवाच्या निमित्ताने सुरु असलेली वसुली अत्यंत संतापजनक आहे. देशभरात सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या महाराष्ट्रात असा प्रकार घडतो, हे मोठे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कृषी विभागाला चक्क पैसे वसुलीसाठी नेमले आहे. दूध दराचा प्रश्न, पीकविमा, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे प्रश्न आजही कायम आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची गरज होती. त्याबद्दल कृषिमंत्र्यांना काहीही देणंघेणं नाही. मात्र सिल्लोड महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कृषी विभाग वसुलीसाठी नेमला आहे. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला काळिमा फासणारे आहे, अशी टिका अजित नवले यांनी केले.
प्रतिक्रिया
राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही कायम आहेत. त्यावर चर्चा न होता अधिवेशनात इतर मुद्यांवर काथ्याकुट सुरु आहे. कृषी प्रदर्शन किंवा महोत्सव हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असतात. त्याचा वापर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला पाहीजे. पण शेतकऱ्यांच्या आडून अशी वसुली चुकीची आहे. असे प्रकार थांबायला हवेत.
- रविकांत तूपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
अब्दुल सत्तार मंत्री म्हणून मिळालेल्या संविधानिक अधिकारांचा गैरवापर करत आहेत. कृषी खात्याची प्रतिमा धुळीस मिळवतं आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर अधिकारी खंडणी मागत असतील तर ती सर्वस्वी जबाबदारी मंत्री म्हणून सत्तारांची आहे. त्यांच्याच निर्देशाने हे होतं आहे, असा आमचा आरोप आहे. म्हणून अब्दुल सत्तरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
- हनुमंत पवार, प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.