‘बेस्ट क्वालिटी’ उत्पादन, पॅकिंग, ट्रेडनेमद्वारे ब्रॅंडिंग, सुपर मार्केटना माल पुरवून मिळवलेली सक्षम बाजारपेठ. खोर (जि. पुणे) येथील समीर डोंबे या इंजिनियर युवा शेतकऱ्याची अशा विविध वैशिष्ट्यांनी साकारलेली अंजीर शेती शेतीतला उत्साह कमालीचा वाढवणारी आणि प्रेरणादायी आहे. अंजिरापासून जॅम या नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या निर्मितीतून प्रक्रिया उद्योजक म्हणूनही समीर पुढे येत आहे. पुणे जिल्ह्यातील खोर (ता. दौंड) हे चहूबाजूंनी डोंगर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव आहे. येथील समीर डोंबे हा अवघ्या सत्तावीस वर्षाचा युवक अत्यंत धडाडीने, आत्मविश्वासपूर्वक व दूरदृष्टी ठेवून शेतीत विधायक काही घडवतो आहे. विविध समस्यांचा सामना करताना प्रचंड सकारात्मक दृष्टिकोनातून शेतीत नवे आविष्कार घडवण्याचे आव्हान पेलतो आहे. समीरचे वडील मोहनराव रावसाहेब डोंबे शिक्षक आहेत. त्यांना तीन भाऊ. या संयुक्त कुटुंबाची ६५ एकर शेती समीर आपल्या भावांच्या सहकार्याने कसतो आहे. सन २०१३ मध्ये समीरने बीई मेकॅनिकलची पदवी घेतली. दहावी, बारावीला गावात प्रथम येण्याचा मान पटकावून बुद्धीची चुणूक त्याचवेळी दाखवली. डिप्लोमा, बीईपर्यंत शैक्षणिक ‘मेरीट’चा आलेख असाच उंचावता ठेवला. प्रगतिशील शेती हेच ध्येय बीईची पदवी, जोडीला बुद्धिमता कौशल्य असल्याने पुण्यात खासगी कंपनीत चांगली नोकरी व पगार मिळवणे समीरला कठीण गेले नाही. दीड वर्षे तिथं अनुभव घेतला. पण स्वतःच्याच शेतीत भरीव काही घडवण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. पण आपल्या पोरानं चांगली नोकरी सोडून शेतीची कास धरावी हे स्वीकारणं घरच्यांना अवघडच गेलं. पण समीरनं दृढनिश्चय ढळू न देता नोकरीचा राजीनामा देत शेतीतलं करियर सुरू केलं. अंजीर हे मुख्य पीक, त्याशिवाय डाळिंब, कांदा पिकं होती. मार्केट व्यवस्था केली मजबूत शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने दर्जेदार अंजीर पिकवयाचे. पण त्याचा दर मात्र व्यापाऱ्यांनी ठरवून ते देतील ते पैसे मुकाटपणे स्वीकारायचे हे समीरला पटायचे नाही. बाजारातील मध्यस्थांचे जाळे, मालाचे वजन शेतकऱ्यांच्या समक्ष न करणे, रूमाली पद्धत या गोष्टी त्याला अस्वस्थ करीत. याच विक्री पद्धतीमुळेच शेतकरी तोट्यात असल्याच्या निष्कर्षापर्यंत तो आला. सक्षम बाजारपेठ मिळवण्याच्या अन्य पर्यायांचा शोध तो घेऊ लागला. सुपर मार्केटवर लक्ष केंद्रित पुणे भागातील विविध सुपर मार्केट समीरच्या नजरेस पडायची. त्यातूनच हडपसर भागातील छोटे सुपर मार्केट समीरला अंजिरांसाठी उपलब्ध झाले. पुणे-सोलापूर हायवेवरील एका हाॅटेलच्या आवारात स्टॉल लावूनही बॉक्स पॅकिंगमधून अंजिराची थेट विक्री सुरू केली. उद्योजक प्रकाश कुतवळ यांच्या पाहण्यात हा प्रयोग आला. त्यांनी समीरला चक्क कंपनीत बोलावून घेतले. शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या मालाच्या मार्केटिंगचे स्वतःच प्रयोग केले तर आर्थिक प्रगतीपासून ते फार दूर राहणार नाहीत, असा संदेश दिलाच. शिवाय एका मोठ्या सुपर मार्केटशी संपर्कही करून दिला. त्यानंतर समीरने मागे वळून पाहिले नाही. प्रभावी मार्केटिंगचे प्रयत्न मोठे सुपर मार्केट मिळवण्याची संधी समीर यांनी सोडली नाही. तेथे आपल्या अंजिराची ‘क्वालिटी’ दाखवली. मात्र हे फळ नाशवंत असल्याने सुपर मार्केटद्वारे विक्री कठीण असल्याचे सांगत तेथील अधिकाऱ्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. पण चिकाटी सोडेल तो समीर कसला? माझ्या जबाबदारीवर माल पुरवतो. विकला जाईल तेवढ्याच मालाचे पैसे द्या असा विश्वास त्याने त्या अधिकाऱ्यांना दिला. कोरूगेडेट पॅकिंग आणि फळाची उत्तम क्वालिटी यातून आॅर्डर्स आणि विक्रीही वाढत गेली. त्यानंतर समीर एकापाठोपाठ एक सुपर मार्केट काबीज करीत निघाला. मातीत काम करण्याचा अभिमानच समीर म्हणतो की नोकरीपेक्षा शेतीच जास्त भरवशाची आहे. शेतीचे व्यवस्थित ‘प्लॅनिंग’ केले, मार्केटिंग व्यवस्था स्मार्ट पद्धतीने हाताळली तर चांगला पैसा निश्चित मिळू शकतो. इंजिनियर असलो तरी मातीत काम करण्याचा अभिमानच वाटतो. उत्पादन, ग्रेडिंग, पॅकिंग, वाहतूक, सुपर मार्केटससोबत दररोज संपर्क अशा विविध आघाड्यांवरील काम आव्हानाचे, कसरतीचे असते. पण थकवा जाणवत नाही, समाधानच मिळते. समीरची आजची ‘अचिव्हमेंट’
अंजिराचा वैशिष्ट्यपूर्ण जॅम
समीरची बलस्थाने
संपर्क : समीर डोंबे, ९५५२४३५००३
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.