गांडूळखत अर्क निर्मिती

गांडूळपाणी तयार करण्याची मडका पद्धत.
गांडूळपाणी तयार करण्याची मडका पद्धत.

सेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे महत्त्व आहे. या लेखामध्ये गांडूळखत अर्क बनवणे आणि वापर या विषयी जाणून घेऊ.

गांडूळखताप्रमाणेच त्याचा अर्कही उत्तम पीकवर्धक मानला जातो. त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यासह सूक्ष्म मूलद्रव्ये असून, ती पिकांना त्वरित उपलब्ध होतात. परिणामी पिकांची प्रतिकारक्षमता वाढून उत्पादनाला चालना मिळते. 

साहित्य 

  • दोन माठ-एक लहान एक मोठा
  • तिपाई 
  • अर्धवट कुजलेले शेणखत व सेंद्रिय पदार्थ 
  • गिरिपुष्प, लुसर्न घास व कडूनिंबाचा कोवळा पाला
  • पूर्ण वाढ झालेले गांडूळे १००० अथवा अर्धा किलो.
  • गरजेइतके पाणी 
  • अर्क जमा करण्यास चिनी मातीचे अथवा भांडे
  • पोयटा माती
  • कृती 

  • जुना माठ घेऊन त्याला तळाला बारीक छिद्र करून त्या छिद्रात कापडाची वात अथवा कापसाची वात टाकावी. तो माठ एका तिपाईवर ठेवावा.
  • माठाच्या तळात जाड वाळूचा ४ इंचाचा थर लावावा.
  • जाड वाळूच्या थरावर ३ इंचाचा पोयटा मातीचा थर लावावा.
  • त्यावर अर्धवट कुजलेल्या शेणखताचा थर लावावा. हलके पाणी मारावे.
  • त्याच ओलाव्यात अर्धा किलो पूर्ण वाढ झालेली गांडुळे सोडावीत.
  • गांडुळांना खाद्य म्हणून गिरिपुष्प, लुसर्नघास व कडूनिंबाचा कोवळा पाला प्रत्येकी अर्धा किलो शेणस्लरीसह मिसळावा.
  • मोठ्या माठावर लहान माठ पाणी भरून ठेवावा. त्याखाली तळाला छिद्र करून वात बसवावी म्हणजे थेंबथेंब पाणी मोठ्या माठात पडेल.
  • तिपाईच्या खाली व्हर्मिवॅाश जमा करण्यास चिनीमातीचे अथवा काचेचे भांडे ठेवावे. पहिल्या सात दिवसांत जमा झालेले पाणी पुन्हा वरील माठात टाकावे. त्यानंतर सात दिवसांनी जमा होणाऱ्या पाण्यास गांडूळखत अर्क किंवा गांडूळपाणी किंवा व्हर्मिवॅाश म्हणतात. ते पिकावर फवारणीस योग्य असते.
  • गांडुळांच्या संवर्धनासाठी 

  • एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त २००० गांडुळे  असावीत.
  • बेडूक,  उंदीर,  घूस,  मुंग्या,  गोम या  शत्रूंपासून गांडुळाचे संरक्षण करावे.
  • संवर्धक खोलीतील,  खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान २० अंश ते ३०  अंश सेंटिग्रेडच्या दरम्यान ठेवावे. गादीवाफ्यावर  
  •      सरळ सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी  साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा ४० ते ४५ टक्के ठेवावा.
  • गांडूळे हाताळतांना किंवा गांडूळ खत 
  • वेगळे  करताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडुळे वेगळी करावीत,  जेणेकरून इतर  गांडुळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.
  • गांडूळखत वापरताना घ्यावयाची काळजी 

  • गांडूळ खताचा वापर केल्यानंतर रासायनिक खते कीटकनाशके किंवा  तणनाशके जमिनीवर वापरू नयेत.
  • गांडूळ शेतीत पिकांच्या मुळांभोवती चांगला  ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच तो वर्षातून ९ महिने टिकवणे आवश्यक आहे.
  • गांडूळ आच्छादनरुपी सेंद्रिय पदार्थांचा वापर अन्न म्हणून करतात. सेंद्रिय आच्छादनाचा पुरवठा वरचेवर करावा.
  • योग्य प्रमाणात ओलावा आणि आच्छादनाचा पुरवठा झाला नाही तर गांडुळांच्या कार्यक्षमतेते घट येते.
  • गांडुळ व गांडूळखताचे उपयोग

    अ) जमिनीसाठी 

  • गांडुळामुळे जमिनीचा पोत सुधारतो
  • मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. 
  • गांडुळामुळे जमिनीची धूप कमी होते. जलधारण शक्ती वाढते. 
  • गांडुळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना  इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
  • जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते
  • जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
  • बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
  • जमिनीचा सामू  ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
  • गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला  त्तम प्रतीची बनवितात.
  • गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर  असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना उपलब्ध होतात.
  • जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.
  •  ब) शेतकऱ्यासाठी  

  • अन्य रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. 
  • जलधारणा क्षमता वाढत असल्याने पाणी पाळ्याचे प्रमाण कमी होते.
  • गांडुळे व खताच्या विक्रीतून फायदा होतो. रोजगाराची संधी उपलब्ध होते.
  • गांडूळखत अर्क वापरण्याची पद्धत 

    पीक, फूल फळावर आल्यावर १० दिवसांच्या अंतराने व्हर्मिवॅाश (५ टक्के) (प्रमाण ः १०० लिटर पाण्यात ५ ली.) दोन फवारण्या कराव्यात . 

    फायदे

  • पीकवाढीसाठी आवश्यक घटक गांडुळांच्या त्वचेमध्ये, विष्ठेमध्ये आहेत. त्यातून मिळणारे व्हर्मिवॅाश पिकांसाठी सर्वोत्तम पीकवर्धक आहे. 
  • व्हर्मिवॅाश फुलोरा व फळ पक्वतेच्या अवस्थेत फवारल्याने फुलगळ, फळगळ थांबते. 
  • पीक जोमदार वाढते. पिके रसरशीत दिसतात. 
  • कीड व रोगास प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. 
  • उत्पादनात निश्चित वाढ होते.
  • निगा व काळजी 

  • पाण्याच्या माठातून सारख्या प्रमाणात पाणी थेंबथेंब गळते आहे की नाही, हे तपासावे. व्हर्मिवॅाश जमा होत आहे किंवा नाही हे तपासावे.
  • वरच्या माठात पाणी भरल्यानंतर तोंड जाळीच्या कापडाने बांधावे. 
  • दर आठवड्यास गांडुळांना खाद्य टाकावे.
  • व्हर्मीवॅाश जमा होणाऱ्या बरणीसही गाळण बांधावे. (जेणेकरून डास माशा अंडी घालणार नाहीत.)
  • जमा झालेले व्हर्मिवॅाश सावलीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पिकावर फवारावे.
  • निम गांडूळ अर्क (निगा अर्क )

    कीटकनाशकाचे गुणधर्म असलेल्या विविध वनस्पतींचा पीक संरक्षणासाठी वापर केला जातो. प्रामुख्याने अनेक बियांमध्ये कीडनियंत्रक सक्रिय घटक आढळतात. कडूनिंबामध्ये (अझाडिरेक्टा इंडिका) झाडांच्या निंबोळ्या बरोबरच पाने, फुले, साल, मूळ अशा सर्व अवयवांमध्ये सक्रिय गुणकारी घटक आढळतात. गुणकारी कार्यक्षम असलेले निमतेलाचे बाजारमूल्य जास्त असल्याने शेतकऱ्याकडून कमी वापरले जाते. एक हेक्टर फवारणीला पुरेल इतके कडुलिंब व बीटी द्रावण तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यास अथवा साधनास केवळ ३०० रुपये खर्च येतो. 

    पद्धत 

  • या अर्काच्या निर्मितीसाठी साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला किंवा फवारणीच्या अंदाजे दोन महिने आधी अर्क तयार करावा. 
  • २०० लिटरचा प्लॅस्टिकचा पिंप घेऊन त्याचे दोन भाग करावेत. दोन्ही भागाचे रुपांतर टाकीत करून त्यात अर्क तयार करावा. टाकीच्या तळाला तोटी बसवावी. कडुलिंबांची डहाळी, पालवी, धातूच्या जाळीवर टाकून गांडुळाच्या सहाय्याने खत तयार करावे. टाकीतील खतात घरमाशांनी अंडी टाकू नये म्हणून किंवा गांडुळाचे पक्ष्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी टाकीवर शेडनेट (जाळीने) झाकावे. आठवड्यात एकदा कडूनिंबाचा पाला व डहाळ्याचा थर गांडूळाना खाण्यासाठी घालावा.अर्क तयार करण्यासाठी कडुलिंब, गांडूळ खताच्या वरच्या हिश्शापर्यंत पाणी टाकीत भरावे. खताच्या घनते इतके पाणी टाकीत घालावे. अर्क टाकीच्या तळाशी जमा होईल. तो अर्क नळाच्या तोटीद्वारे खाली ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या भांड्यात जमा होईल. प्लॅस्टिकच्या भांड्यात जमा झालेला अर्क फवारणीसाठी शेतात घेऊन जाण्यास सोपे होते.
  • इक्रीसॅट येथे गांडुळांना आठवड्यात एकदा कडुलिंबाचा पाला खाद्य म्हणून देतात. दोन महिन्यांनंतर अर्क दर दोन आठवड्यांत जमा करतात. अशाप्रकारे एक महिन्यापर्यंत अर्क जमा करतात. या वेळेपर्यंत टाकी पूर्णपणे भरते, तेव्हा अर्क तयार करण्यासाठी नवीन टाकी घ्यावी. हा अर्क महिन्यात वापरणे योग्य ठरते.
  • फायदे 

  • कडुलिंब हे गांडूळासाठी हानिकारक असल्याचे काही अहवाल असले तरी हैदराबाद येथील इक्रीसॅट संस्थेमध्ये मागील पाच वर्षांपासून कडुलिंबाची डहाळ्या, पाने, पालवी देखील गांडूळखत तयार करण्यासाठी वापरले जाते. मात्र, कोणताही विपरीत परिणाम गांडुळांच्या वाढीवर झाला नसल्याचे सांगितले जाते. 
  • चाचण्यामध्ये कडुलिंबयुक्त गांडूळ खताचा अर्क तिसऱ्या अवस्थेमधील घाटेअळीवर फवारले असता किमान ५० टक्क्यांपर्यंत अळीचे नियंत्रण होत असल्याचे दिसून आले आहे. 
  • वापरण्याची पद्धत 

    कडूनिंब गांडूळ अर्क सातत्याने तयार करण्याची सुलभ पद्धत येथे देण्यात येत आहे. आठवड्यात ३० ते ५० लिटर अर्क जमा होईल. असे १०० लिटर क्षमतेचा प्लॅस्टिक ड्रम घ्यावा. आठवड्यात जमा झालेल्या अर्क एक हेक्टरवरील पिकास फवारणीसाठी पुरेशा होतो. अर्क तयार करण्याचे सातत्य ठेवल्यास प्राथमिक गुंतवणुकीचा खर्च कमी होतो. १०० लिटर पाण्यात निम गांडूळ अर्क १० लिटर प्रमाणात मिसळून पिकांवर त्याची फवारणी (शक्यतो सायंकाळी) करावी.

    उत्तम प्रतीचे गांडूळखत मिळण्यासाठी... 

  • शेणखत, घोड्याची लीद,  लेंडी खत,  हरभऱ्याचा  भुसा,  गव्हाचा भुसा,  भाजीपाल्याचे अवशेष,  सर्व प्रकारची हिरवी पाने  व  शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे  गांडुळाचे महत्त्वाचे खाद्य होय.
  • स्वयंपाकघरातील वाया गेलेले भाजीपाल्याचे  अवशेष, वाळलेला पालपाचोळा व शेणखत  सम प्रमाणात मिसळले असता गांडुळाची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
  • हरभऱा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३:१० या प्रमाणात मिसळल्यास उत्तम गांडूळ खत तयार होते.
  • गोबरगॅस स्लरी,  प्रेसमड,  शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
  • डॉ. प्रशांत नाईकवाडी, ८८८८८१०४८६  (वरिष्ठ व आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण निरीक्षक, नोका, पुणे व बायो ॲग्रिसर्ट इटली, युरोप.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com