बियाण्यांची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना

बियाण्यांची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना
बियाण्यांची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना

बियाण्यांची साठवणूक करताना बियाण्यांतील ओलाव्याचे प्रमाण आणि बीज भांडारातील तापमान व वातावरणातील आर्द्रता यांचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे तापमान व वातावरणातील आर्द्रता याकडे विशेष लक्ष द्यावे. याशिवाय प्रतिबंधात्मक उपायांनीही बियाण्यांची साठवणूक क्षमता वाढविता येते.   बियाण्यांची साठवणूक प्राणवायुविरहित जागेत सुरक्षितपणे करता येते. नत्रवायू हा इतर कुठल्याही वायूपेक्षा बियाण्यांचे साठवणुकीतील आयुष्यमान वाढविण्यात महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे बियाण्यांची काढणी करताना व त्यावर प्रक्रिया करताना बियाण्यास होणारी इजा ही बहुतेक करून साठवणुकीच्या काळात उगवण शक्ती कमी होण्यास कारणीभूत ठरते. आनुवंशिकतासुद्धा बियाण्यांची साठवणूक शक्ती जास्त अथवा कमी असण्यासाठी कारणीभूत असते. अ) प्रतिबंधात्मक उपाय :

  • मळणी करताना खळे कोठारांपासून लांब अंतरावर असावे.
  • बियाणे साठवण्यापूर्वी ते चांगले वाळवावे. ज्यामुळे बियाण्यातील ओलावा दहा टक्क्यांपेक्षा कमी होईल. या ओलाव्यामध्ये किडीचे प्रजनन होण्याची शक्यता कमी असते.
  • बियाणे साठवणुकीपूर्वी रिकामी पोती, कणग्या, साठवणुकीची जागा तसेच वाहतुकीची साधने स्वच्छ करून कीडरहीत करावी.
  • साठवणुकीच्या जागेतील भिंतीचे छिद्र व बारीक भेगा सिमेंटने लिंपून घ्याव्यात, कारण त्यात कीटक वास्तव्य करतात.
  • साठवणुकीच्या जागेत उंदराची बिळे असल्यास काचेचे तुकडे, दगड टाकून सिमेंटने बुजवून घ्यावीत. उंदरांनी प्रवेश करू नये यासाठी दरवाजे, खिडक्या घट्ट लावाव्यात. दरवाजाखाली गॅल्व्हनाईजचा पत्रा बसवून घ्यावा.
  • उंदीर तसेच पक्ष्यांना प्रतिबंध करण्यासाठी खिडक्यांना लोखंडी तारेच्या जाळ्या बसवाव्यात.
  • रिकामे गोदाम/भांडारामध्ये भिंतीवर/पृष्ठभागावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • बियाणे साठवणुकीसाठी शक्यतो नवीन गोण्या/पोती वापरावीत. जर जुने पोते वापरायचे असल्यास पोते गरम पाण्यात (५० सेल्सिअस तापमानापेक्षा जास्त) १५ मिनिटे भिजवून नंतर सुकवून वापरावेत.
  • पोते डनेजवर (लाकडी फळ्या, पॉलिथिन चादर, बांबूच्या चट्ट्या) ठेवावेत आणि पोत्यांची थप्पी भिंतीपासून ३ फूट अंतरावर ठेवावी.
  • बियाणे साठवलेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून दर १५ दिवसांनी बियाण्यांची तपासणी करावी. गोळा केलेला कचरा जाळून टाकावा.
  • पावसाळ्यात बियाणे हवाबंद ठेवावे.
  • पावसाळ्यात बियाण्याला मोकळी हवा लागेल असे ठेवावे.
  • साठवणुकीच्या जागेत पावसाचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • बीजभांडाराचे वातावरण/हवामान कोरडे व थंड राहील याची काळजी घ्यावी.
  • साठवण करावयाच्या बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण सुरक्षित पातळीपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • खाली पडलेले बियाणे जमा करून त्याची विल्हेवाट लावावी, तसेच बीजभांडाराचा तळ खराब झाला असल्यास तातडीने त्याची दुरुस्ती करवी.
  • ब) गुणात्मक उपाय यामध्ये रसायनविरहित व रसायनांच्या साहाय्याने किडींचा बंदोबस्त करता येतो. १) रसायनविरहित उपाय थंड तापमान पद्धत : बऱ्याचदा साठवणुकीतील किडी- विशेषत: बाल्यावस्थेतील या १४ अंश से. तापमानाखाली मरतात. गोठणबिंदूच्या खाली तापमान गेल्यास या किडींचा नाश होतो. साठवलेल्या बियाण्यामध्ये नैसर्गिक थंड हवा खेळवून आपणास त्यात थंडावा आणता येतो. त्याचप्रमाणे शीतपद्धतीच्या उपयोगाने मोठ्या प्रमाणात बियाणे थंड करता येते. उष्ण तापमान पद्धत : अनेकदा साठवणुकीतील किडी या ५०-६० अंश सेल्सिअस तापमानास १० ते २० मिनिटात मरण पावतात. किडीच्या वाढीसाठी लागणाऱ्या‍या अनुकूल तापमानापेक्षा ५ अंश सेल्सिअसने तापमान वाढल्यास त्यांची वाढ थांबते. जवळजवळ सर्वच किडी ५० अंश सेल्सिअस तापमानास दोन तासांसाठी संपर्कात आणल्यास नाश पावतात. साठवणुकीपूर्वी सर्व बियाण्यास एकसारखा उष्ण प्रवाही हवेचा झोत, इन्फ्रारेड, जास्त पुनरावृत्ती वीज, अति उष्ण लहरी या पद्धतीचा अवलंब करतात. नियंत्रित वातावरण पद्धत : बियाण्याची साठवणूक वातभेद्य (निर्वात) पद्धतीने करण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली असून प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर बियाणे साठवणुकीसाठी या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीस हवाबंद साठवणूक असेही संबोधतात. बियाणे हवाबंद किंवा निर्वात माध्यमात साठवले असता बियाण्यांच्या तसेच कीटकांच्या श्‍वासोच्छ्वासामुळे साठवणुकीच्या माध्यमातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. कार्बन डायऑक्साइडमुळे कीटकांना श्‍वासोच्छ्वासास अडथळा निर्माण होऊन त्यांचे नियंत्रण होते. या तत्त्वाचा उपयोग करून बियाणे १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी साठवले जाते. साठवणुकीचे माध्यम उदाहरणार्थ, प्लॅस्टिकचा ड्रम, पत्र्याची कोठी इत्यादी हे हवाबंद असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे हवाबंद माध्यमांमध्ये बियाणे भरून त्यांच्या क्षमतेच्या ४० ते ५० टक्क्यांपर्यत कार्बन डायऑक्साइड वायू त्यामध्ये भरला असता बियाण्यातील कीटकांचे नियंत्रण होते. निष्क्रिय घटक : बिनविषारी पदार्थ, उदाहरणार्थ- माती, राख, गारगोटी इत्यादीचा वापर करावा. जर किडींच्या शरीरातील ६० टक्के पाणी किंवा ३० टक्के वजनात घट झाली तर त्यांचा नाश होतो. २) रासायनिक उपाय रासायनिक उपायांमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने धुरीजन्य कीटकनाशकाचा वापर शासनमान्य अधिकृत परवानाधारक धुरीकरण यंत्रणेमार्फतच करावा. संपर्क ः भागवत चव्हाण, ९४०४५५१००९ (कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com