गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनाकडे लक्ष द्या

सध्या अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या कापूस पिकांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. या किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनाकडे लक्ष द्या
गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनाकडे लक्ष द्या

सध्या अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या कापूस पिकांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. आधीच पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, त्याचा ही समस्या वाढलेली दिसत आहे. या किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बीटी१ व त्यानंतर आलेले बीटी २ तंत्रज्ञानयुक्त कपाशी लागवडीमुळे बोंडअळ्यांच्या नियंत्रणास चांगली मदत मिळाली होती. मात्र, शिफारशीत पद्धतीप्रमाणे रेफुजी बियाणे लागवड न करणे आणि हंगामाबाहेर कपाशी पीक (फरदड) घेण्यामुळे गुलाबी बोंडअळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली. गेल्या ६ ते ७ वर्षांपासून बीटी कपाशी वाणांवरही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रादुर्भावाची वैशिष्ट्ये ः

  • गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावाची सुरवात प्रामुख्याने कापूस पीक उगवणींनंतर ४५ ते ५० दिवसांनंतर (पात्या, फुले लागण्याच्या अवस्थेत) होते.
  • ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात हिरव्या बोंडावर आढळतो.
  • उशिरा तयार होणाऱ्या कापूस जाती या किडीस जास्त बळी पडतात.
  • गेल्या तीन वर्षापासून कापूस जिनिंग मिल व मार्केट यार्ड परिसरातील कामगंध सापळ्यांमध्ये नर पतंग आढळत आहेत.
  • कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून शेतकऱ्यांनी या किडीच्या सर्वेक्षणासाठी शेतात प्रती एकरी ३ कामगंध सापळे लावून तसेच प्रादुर्भावग्रस्त पाते, कळी, फुले (डोमकळी) ओळखून वेळीच कमी खर्चीक नियोजित व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास गुलाबी बोंड अळीच्या पुढील पिढ्यांना अटकाव आणून भविष्यात होणारे प्रचंड संभाव्य नुकसान टाळता येते. गुलाबी/ शेंदरी बोंड अळीची ओळख व आयुष्यक्रम :

  • अंडी, अळी, कोष व प्रौढ पतंग अशा चार अवस्था.
  • प्रौढ मादी पतंग संपूर्ण जीवनमानामध्ये सुमारे १५० ते २०० लांबुळकि चपटी व पांढरी अंडी रात्रीच्या वेळी पाते, कळी, फुलांवर व कोवळ्या बोंडावर अलग अलग किंवा छोट्या समूहात घालते. (अंडी अवस्था ३-६ दिवस.)
  • अंड्यातून बाहेर आलेली अळीचा रंग पांढूरका व डोके तपकिरी असते. पूर्ण वाढ झालेली अळी कालांतराने गुलाबी/शेंदरी रंगाची असते. (अळी अवस्था ९ ते १४ दिवस)
  • पूर्ण वाढलेली अळी बोंडाला छिद्र पाडून जमिनीवरील पाला पाचोळा किंवा मातीत किंवा उमललेल्या कापसाच्या सरकीमध्ये कोषावस्थेत जाते. (कोषावस्था ८-१३ दिवस) अळी प्रतिकुल हवामान, शीत तापमान परिस्थितीत अन्न पाण्याशिवाय सुप्ताअवस्थेत (Diapause) राहू शकते.
  • पतंग आकाराने लहान, गर्द बदामी रंगाचे असून पंखावर बारीक काळे ठिपके असतात. (प्रौढावस्था ४ ते ८ दिवस. मादी नरापेक्षा जास्त दिवस जगते.)
  • गुलाबी बोंडअळी वाढण्याची कारणे : १. कपाशी पीक हंगामाबाहेर किंवा फरदड घेऊन पीक कालावधी वाढवणे. २. मार्केट यार्ड व जिनिंग कारखान्यामध्ये कच्चा कापूस जास्त काळ साठवून ठेवला जातो. तिथे सरकीमध्ये गुलाबी बोंडअळी सुप्तावस्थेत जिवंत राहते. ३. एकच एक पीक वर्षानुवर्षे घेणे. पिकाची फेरपालट न करणे. ४. कापसाच्या देशी वाणाच्या तुलनेत अमेरिकन कपाशीवर जास्त प्रादुर्भाव होतो. ५. कपाशी पिकाच्या सभोवती रेफुजी (आश्रय) गैर बीटी कपाशीची लागवड न केल्यामुळे किडीच्या प्रतिकारशक्तीत वाढ झाली आहे. ६. पूर्व हंगामी कापसाच्या लागवडीमुळे किडीसाठी वर्षभर खाद्य उपलब्ध होते. ७. दिवसाचे तापमान व रात्रीचे तापमान यामध्ये १० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तफावत असल्यास हे वातावरण गुलाबी बोंडअळीसाठी पोषक राहते. गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी

    पीक हंगामाबाहेर घेणे टाळावे. खोडवा (फरदड) पीक घेऊ नये.

  • मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रा द्याव्यात. नत्र युक्त खतांचा अवाजवी वापर टाळावा. यामुळे पिकाची अनावश्यक कायिक वाढ टाळता येईल.
  • कपाशीमध्ये अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी भगर हे मिश्र पीक घ्यावे. तसेच शेतात एकरी किमान १५ पक्षी थांबे उभारावेत.
  • -बांध व शेताभोवती कीडीच्या पर्यायी खाद्य वनस्पती (उदा. अंबाडी, रानभेंडी) नष्ट कराव्यात.
  • सर्वेक्षण आणि व्यवस्थापनासाठी कापूस जिनिंग मील व मार्केट यार्ड परिसरातील मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे (प्रति १० मीटर अंतरावर १ कामगंध सापळा) व किमान चार ते पाच प्रकाश सापळे लावावते. त्यात अडकलेले पतंग नष्ट करावेत.
  • फुले व बोंडे लागण्याच्या कालावधीत मोठ्या संख्येने नर पतंग जेरबंद करण्यासाठी प्रती एकर १० ते १२ कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यामध्ये २ ते ३ दिवस सतत ८ ते १० पतंग आढळून आल्यास त्वरित व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. शेतात प्रकाश सापळे हेक्टरी ४ ते ५ लावावेत.
  • बोंडअळीग्रस्त फुले/ डोमकळ्या आढळल्यास अशी फुले त्वरित अळीसह नष्ट करावीत.
  • बोंडअळ्यांची अंडी किंवा प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या पिकावर दिसू लागताच ट्रायकोग्रामा बॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोणीस या परोपजीवी किटकाची १ ते १.५ लाख अंडी प्रति हेक्टर (३ ट्रायकोकार्ड प्रती एकर) या प्रमाणे आठवड्याच्या अंतराने तीन ते पाच वेळा कपाशी शेतात सोडावीत. या कालावधीत कोणतेही रासायनिक किडनाशक फवारू नये.
  • पांढरी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिन्थेटिक पायरेथ्रोइड गटातील व संयुक्त कीटकनाशकांचा वापर टाळावा.
  • गुलाबी बोंड अळीचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव दिसताच, (फवारणी प्रति लिटर पाणी.)

  • निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ ते १० मिली किंवा ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५ मिली.
  • सध्या शेतात मुबलक सापेक्ष आर्द्रता आहे, अशा वेळी बिव्हेरिया बॅसियाना (१.१५% विद्राव्य भुकटी) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी फायदेशीर ठरते.
  • रासायनिक कीटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावरच करावा.
  • आर्थिक नुकसानीची पातळी : किडींच्या सर्वेक्षणाअंती ५-१०% किडग्रस्त पात्या, फुले, बोंडे किंवा कामगंध सापळ्यात सरासरी ७ ते ८ नर पतंग सतत दोन ते तीन दिवस. फवारणी प्रति लिटर पाणी फेनप्रोपाथ्रीन (३० ई.सी.) ०.३४ मिली किंवा सायपरमेथ्रीन (१० ई.सी.) ०.७५ मिली किंवा क्लोरॲण्ट्रानीलिप्रोल (९.३%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (४.६% झेडसी) (संयुक्त किटकनाशक) ०.५ मिली. डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५ (विषय विशेषज्ञ -किटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ).

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com