कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रण

तुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस शोषक कीड आहे. मागील काही वर्षापासून या किडीचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर मोठया प्रमाणात होत असून उत्पादनामध्ये घट येण्यामध्ये या किडीचा मोठा वाटा आहे.
pest management in cotton
pest management in cotton

तुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस शोषक कीड आहे.  मागील काही वर्षापासून या किडीचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर मोठया प्रमाणात होत असून उत्पादनामध्ये घट येण्यामध्ये या किडीचा मोठा वाटा आहे. म्हणून तुडतुड्याच्या व्यवस्थापनासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बीटी कपाशीत तुडतुड्यांच्या प्रादूर्भाव अधिक हानीकारक ठरत आहे.  सध्या प्रादुर्भाव मोठया प्रमाणात का होत आहे?

  • तुडतुड्यामध्ये किटकनाशकाप्रति प्रतिकारशक्ती तयार होणे- तुडतुड्याचा प्रादुर्भाव कपाशीवर नियमितपणे आढळतो.  २००१ पासून निओनिकोटीनॉईड गटातील इमीडाक्लोप्रीड या किटकनाशकाची बीजप्रक्रिया करण्यात येत आहे. यामुळे सुरुवातीच्या वर्षामध्ये कपाशीचे ३०-४० दिवसापर्यंत रस शोषक किडींपासून संरक्षण मिळाले. मात्र, बीजप्रक्रिया आणि त्यानंतरही इमिडाक्लोप्रीड व निओनिकोटीनॉईड गटातील अन्य कीटकनाशके (उदा. थायामिथॉक्झाम, अॅसिटामीप्रीड) यांचा फवारणीद्वारे वापर करण्यात आला.  
  • ज्या कपाशीच्या वाणाच्या पानावर लव नसते, असे वाण लवकर व जास्त बळी पडतात. ज्या कपाशीच्या वाणाच्या पानावर खालच्या बाजूला लांब व दाट केस असतात, अशा वाणांवर प्रादुर्भाव कमी होतो. संकरित वाणांवर देशी वाणांपेक्षा तुडतुड्याचा प्रादुर्भाव अधिक असतो. 
  • ऑगस्ट-सप्टेंबर महिण्यामध्ये पावसाची उघडीप. ढगाळ वातावरण असते. असे वातावरण तुडतुड्याच्या वाढीस पोषक.  
  • पीक पद्धती - बीटी कापूस अणि सोयाबीन ही दोन पिके मोठया प्रमाणात घेतली जातात. यामुळे तुडतुडयास पर्यायी खाद्य वनस्पती कमी झाल्या.  
  • ओळख 

  • प्रौढ तुडतुडे पाचरीच्या आकाराचे फिकट हिरव्या रंगाचे २-४ मि.मी. लांब
  • पिल्ले प्रौढासारखेच फिकट हिरव्या रंगाचे. त्यांना पंख नसतात. 
  • तुडतुड्याचे खास वैशिष्टये म्हणजे ते चालताना तिरके चालतात व चटकन उडी मारतात.
  • नुकसान पिल्ले आणि प्रौढ पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात. पानात विषारी द्राव सोडतात. त्यामुळे पानाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होतात. सुरुवातीला लहान पिल्ले पानाच्या शिरेजवळ राहतात. मोठे झाल्यावर चपळपणे फिरताना आढळून येतात.  प्रादुर्भावाची लक्षणे

  • प्रादुर्भावग्रस्त पाने खालच्या बाजूला मुरगळतात, कडा पिवळसर होऊन तपकिरी होतात. 
  • अशी पाने वाळतात. गळून पडतात. 
  • रोपावस्थेत प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास झाडाची वाढ खुंटते. 
  • पाने मुरगळून तपकिरी होतात. 
  • पाते, फुले व बोंडे लागल्यानंतर प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनामध्ये घट येते.
  • प्रादुर्भाव फारच जास्त झाल्यास संपूर्ण झाड वाळून जाऊ शकते. 
  • जीवनक्रम

  • अंडी, पिल्ले व प्रौढ अशा तीन अवस्था
  • मादी पानाच्या शिरेत अंडी घालते.
  • ४ ते ११ दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात. 
  • त्यांची ७ ते २१ दिवसात वाढ
  • ५ वेळा कात टाकून त्यांचे प्रौढात रुपांतर 
  • एकूण जीवनक्रम २ ते ४ आठवडयामध्ये पूर्ण.
  • वर्षभरामध्ये जवळपास ११ पिढया पूर्ण होतात.
  • अधिक प्रादुर्भावाचा कालावधी

  • पीक १५-२० दिवसाचे झाल्यापासून ते बोंडे फुटेपर्यंत
  • ऑगस्टचा दुसरा पंधरवडा आणि सप्टेंबरचा पहिला पंधरवडा या काळात सर्वात जास्त संख्या 
  • कपाशीचा हंगाम झाल्यावर इतर पर्यायी खाद्य वनस्पतींवर उपजीविका  
  • एकात्मिक व्यवस्थापन 

  • हंगाम संपल्यानंतर पिकाचे अवशेष जमा करून त्यांचा नायनाट करावा.
  • लागवडीसाठी तुडतुड्यास प्रतिकारक्षम वाणाची निवड 
  • लागवड शिफारशीनुसार योग्य अंतरावर 
  • शिफारशीनुसार खतांच्या मात्रा. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा. बागायती पिकामध्ये नत्राच्या मात्रा विभागून द्याव्या.
  • दरवर्षी पीक फेरपालट.
  • चवळी, मूग, उडीद, सोयाबीन ही आंतरपिके घ्यावीत.
  • बिगर बी टी कपाशी बियाण्यास थायामेथॉक्झाम (७० डब्ल्यू एस) ४ ते ५ ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणात प्रक्रिया करावी. 
  • सुरुवातीच्या काळात रासायनिक किटकनाशकांची फवारणी करू नये. यामुळे मित्र कीटक उदा. ढालकिडा, क्रायसोपा, भक्षक कोळी इत्यादीचे संवर्धन होईल.
  • इमिडाक्लोप्रीड किंवा थायमिथॉक्झाम यांची बीजप्रक्रिया केल्यामुळे निओनिकोटीनॉईड गटातील किटकनाशकांची फवारणी टाळावी. 
  • आर्थिक नुकसानीची पातळी-  जर २-३ तुडतुडे प्रति पान आणि पानाच्या कडा मुरगळलेल्या, पिवळसर झालेली आढळल्यास खालीलपैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी.
  • फवारणी प्रमाण प्रती लीटर पाणी

  • निंबोळी अर्क ५ टक्के किंवा     
  • अॅझाडिरॅक्टीन (१०००० पीपीएम) १ मि.ली. किंवा (१५०० पीपीएम) २.५ मि.ली. 
  • फ्लोनीकामिड (५० डब्ल्यू जी.) ०.२ ग्रॅम
  • डायमिथोएट (३० टक्के) १ मि.ली.
  • कपाशीच्या लागवडीपासून ६० दिवसापर्यंत जैविक घटकांचा फवारणीसाठी वापर करावा.
  • ६० दिवसानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर .
  • एकाच किटकनाशकाची लागोपाठ फवारणी करू नये. वापर आलटून पालटून करावा.
  • संपर्क डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ किटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव ता. गेवराई अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com