नारळबागेच्या व्यवस्थापनाची सुत्रे

प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने नारळाच्या विविध जातींची लागवड तसेच पीक उत्पादन वाढ आणि आंतरपीक पद्धतीबाबत शिफारशी केलेल्या आहेत. यामुळे उत्पादनात वाढ करणे शक्य आहे.
Intercropping of spice crops in coconut orchard
Intercropping of spice crops in coconut orchard

प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने नारळाच्या विविध जातींची लागवड तसेच पीक उत्पादन वाढ आणि आंतरपीक पद्धतीबाबत शिफारशी केलेल्या आहेत. यामुळे उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. आशिया आणि पॅसिफिक खंडातील नारळ बागायतदार समिती (APCC) या संस्थेची स्थापना २ सप्टेंबर, १९६९ मध्ये झाली. या संस्थेच्या सदस्य देशातील नारळ उद्योगामधील कार्यक्रमांना प्रोत्साहित करणे, त्यांच्यामध्ये समन्वय साधून नारळ उत्पादन, प्रक्रिया आणि व्यापार यामध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने संस्थेची स्थापना झाली. भारत देखील या संस्थेचा एक संस्थापक सदस्य आहे. भारतामध्ये नारळाच्या लागवडीखाली सुमारे २.०८ दशलक्ष हेक्टर क्षेत्र असून त्यापासून २२,१६७ दशलक्ष उत्पादन मिळते. नारळ क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्र राज्याचा देशात दहावा क्रमांक (क्षेत्र ४३,३२० हेक्टर) आणि उत्पादनामध्ये सातवा क्रमांक (२०९ दशलक्ष नारळ उत्पादन) लागतो. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने नारळाच्या विविध जातींबाबत संशोधन करून लक्षद्वीप ऑर्डीनरी, केरा संकरा, फिलीपार्इन्स ऑर्डीनरी, बाणवली, चंद्र संकरा, फिजी, गोदावरी गंगा या जातींची शिफारस केली आहे. याचबरोबरीने प्रताप, कोकण भाट्ये कोकोनट हायब्रीड - १ या जातींची निर्मिती केली आहे. मसाला पिकांमध्ये दालचिनीची कोकण तेज, कोकण तेजपत्ता, जायफळाची कोकण स्वाद आणि कोकम पिकाची कोकण हातिस या जाती केंद्राने विकसीत केल्या आहेत. केंद्राने केलेल्या संशोधनाच्या शिफारशींच्या आधारे महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत नारळ बागेत मसाला पिकांच्या लागवडीची शिफारस केली आहे. महत्त्वाच्या शिफारशी 

  • झावळावरील काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव २० टक्कांपेक्षा जास्त दिसून आल्यास जैविक कीड नियंत्रणासाठी प्रती हेक्टरी गोनिओझस नेफॅटिडीस हे परोपजिवी कीटक ३,५०० या प्रमाणात बागेत सोडावेत.
  • गेंड्या भुंग्याच्या नियंत्रणासाठी प्रती एकरी विषाणुग्रस्त भुंगे१० ते १५ या प्रमाणात सोडावेत.
  • कोकणातील वालुकामय जमिनीतील बागेत १००० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद व १००० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष हे तीन मात्रेमध्ये विभागून (जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी) द्यावे.
  • नारळ झाडांना शिफारशीत रासायनिक खतांच्या मात्रेसोबत १.५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्याने उत्पादनात वाढ मिळते.
  • एक एकर नारळ लागवडीमध्ये काळीमिरी, जायफळ, दालचिनी, केळी आणि अननस लागवड केल्यास नारळ बागायतदाराला या सर्व पिकांचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यावर एक एकर क्षेत्रातून दरवर्षी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
  • कोकणातील वालुकामय पोयटा जमिनीत नारळ झाडास ठिबक सिंचनाद्वारे ऑक्टोबर ते जानेवारीमध्ये प्रति दिन ३० लिटर पाणी तर फेब्रुवारी ते मे पर्यंत प्रति दिन ४० लिटर पाणी खोडापासून १.२५ मीटर अंतरावर गोलाकार लॅटरल पार्इप टाकून सहा ड्रिपरच्या साहाय्याने द्यावे.
  • कोळी किडीच्या नियंत्रणासाठी अ‍ॅझाडिरॅक्टीन (१०,००० पीपीएम) ४ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून चौथ्या घडापर्यंत फवारणी करावी.
  • कोकण विभागासाठी नारळाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येक उत्पादनक्षम झाडास मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झावळ्या आणि बागेत उपलब्ध होणारे इतर वनस्पतिजन्य भागापासून तयार केलेले ५० किलो गांडूळखत आळे पद्धतीने द्यावे.
  • कोकण विभागामध्ये डी बाय टी या संकरित जातीपासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी प्रती झाडास १ किलेा नत्र, ०.५ किलो स्फुरद, २ किलो पालाश खत मात्रा द्यावी. या मात्रेतील अर्ध्या नत्राची मात्रा २५ किलो गांडूळखताद्वारे दयावी. उर्वरित नत्र, स्फुरद व पालाशाची मात्रा रासायनिक खताद्वारे द्यावी. गांडूळ खत आणि स्फुरदची संपूर्ण मात्रा जूनमध्ये द्यावी. नत्र आणि पालाश खतांची (रासायनिक) मात्रा जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये समप्रमाणात विभागून द्यावी.
  • बागेत केळी, अननस, हळद आणि टॅपिओका ही आंतरपिके घ्यावीत. ही पिके सातत्याने न घेता आलटून पालटून लागवड करावी.
  • कोकणातील लागत्या नारळ बागेपासून अधिक आर्थिक नफा मिळविण्यासाठी आरारुट आणि गवती चहा (लेमन ग्रास) या औषधी वनस्पतींची आंतरपीक म्हणून लागवड करावी.
  • सोंड्या भुंग्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी पिओस्ड ल्यूर ४०० मिलि ग्रॅम हा गंध तीन महिन्याच्या अंतराने सापळ्यामध्ये ठेवावा.
  • कोकणातील नारळ बागेत मिश्रपिक म्हणून नोनी या बहुवार्षिक पिकाची लागवड करावी.
  • कोकणातील नारळ बागेतून अधिक उत्पादन व नफा मिळविण्यासाठी जायफळ, दालचिनी व लवंग या मसाला पिकांची आंतरपिके म्हणून लागवड फायदेशीर ठरते.
  • दालचिनी साल आणि पानांचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी नियमित हंगामात तोडणीनंतर ( ऑक्टोबर ते मे मध्ये ) त्यावर ५ फुटवे ठेवावेत.
  •  ईररिओफाईड कोळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ॲझाडीरेक्टीन (५०,००० पीपीएम) ७.५ मिलि सम प्रमाणात पाण्यात मिसळून मुळाद्वारे द्यावे.
  • बागेत अधिक नफा मिळविण्यासाठी लिली या फुलपिकाची आंतरपीक म्हणून लागवड करावी.
  • संपर्क- ०२३५२ - २५५०७७ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,भाटये, जि.रत्नागिरी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com