फळे पिकवणे, धान्य साठवणुकीच्या पारंपरिक पद्धती

खाटी
खाटी

शहादा तालुक्यात गेली तीसेक वर्षे आदिवासींसोबत काम करणाऱ्या जनार्थ आदिवासी विकास संस्थेने विरपूर, भुते, पिंप्राणी, नागझिरी आणि कोटबांधणी या गावांतील जाणकार भिल, पावरा ग्रामस्थांशी संवाद साधून पारंपरिक ज्ञानाची नोंद केली आहे. 

कमीत कमी साधनांत नैसर्गिक हवामानाचा उपयोग करून आदिवासी समाजाने काही सोप्या पण विलक्षण काढणी, प्रक्रिया व साठवण पद्धती शोधल्या आहेत. पिढ्यानपिढ्या  पारंपरिक पद्धती वापरून वनोपजाचा शाश्वत वापर केला जातो. शहादा तालुक्यात गेली तीसेक वर्षे आदिवासींसोबत काम करणाऱ्या जनार्थ आदिवासी विकास संस्थेने विरपूर, भुते, पिंप्राणी, नागझिरी आणि कोटबांधणी या गावांतील जाणकार भिल, पावरा ग्रामस्थांशी संवाद साधून पारंपरिक ज्ञानाची नोंद केली आहे.  टेंभरू  तेंदूपत्ता हे आदिवासींसाठी आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. अनेक ठिकाणी तेंदूपत्ता तोड ठेकेदारांकरवी केल्यामुळे तेंदूपत्ता झाडांचे खूप नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तर तेंदूचे फूल बघायला मिळत नाही. वास्तविकत: तेंदूचे फळ म्हणजे टेंभरू हे आदिवासींच्या आहारातील एक महत्त्वाचे पोषक फळ आहे. पश्चिम सातपुड्यात तेंदूपत्ता व्यापाराचा अतिरेक अजून झाला नसल्याने तेंदूपत्त्याची तोड करूनही झाड फळांवर येऊ शकेल इतपत पाने राहिलेली असतात. ती फळे अजूनही आहारात वापरतात. 

टेंभूर फळ पिकविण्याची पद्धत   टेंभूरचे कच्चे फळ तोडून आणतात. जवळ-जवळ दोन खड्डे खोदून एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्यात धूर जाईल अशा पद्धतीने जोडतात. एका खड्ड्यात भाताचा पेंढा आजूबाजूला लावून टेंभुराचे फळ ठेवतात. वरून माती टाकून भाजून टाकतात. दुसऱ्या खड्ड्यातून शेणाच्या गोवऱ्या लावून धूर पहिल्या खड्ड्यात जाऊ देतात. असे तीन ते चार दिवस सकाळ संध्याकाळ धूर देतात. मग नंतर पिकलेले फळ काढून खातात.

साठवणीच्या पद्धती  खाटी : अंबाडीचा पाला व खाटी फुले

 •   अंबाडी रोपाचा पाला व अंबाडी फळांवरच्या पाकळीसारखे लाल आवरण ( स्थानिक भाषेत खाटी फुले) आदिवासींच्या आहारात बऱ्यापैकी वापरली जातात. फुले विशिष्ट हंगामात येतात त्यामुळे वर्षभर वापरासाठी त्याची विशिष्ट प्रकारे साठवण केली जाते. 
 •  अंबाडीचा पानांना व फळांच्या लाल आवरणाला (खाटी फुले) अलगद काढून उन्हात सुकवले जाते. बांबूच्या टोपलीत सागाची चांगली पाने आतल्या बाजूला ठेवून, पाला किंवा खाटी फुले टोपलीत पूर्ण भरून सागाचे पाने वाकवून बांधतात. टोपलीप्रमाणे सागाचा पोटा तयार होतो. त्यानंतर टोपली काढून घेतात. त्या पोटाला घराच्या आडाला किवा दांडीला बांधतात.
 •  हिवाळ्यात, उन्हाळ्यात जेव्हा खाटी भाजी खाण्याची इच्छा असेल तेव्हा त्या सागाच्या पोटाला एक छिद्र पाडून पाला किवा खाटे फुले काढून घेतात. नंतर त्या छिद्राला कपड्याचा बोळा लावून देतात. अशा पद्धतीने साठवण करून ठेवतात.  
 • आदिवासी लोक जमिनींच्या छोट्या भागावर शेती करतात. त्यात अनेक प्रकारची धान्ये व कडधान्ये घेतली जातात. वर्षभरासाठी कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय ती साठवली जातात. वापरासाठीचे धान्य आणि पुढल्या वर्षी पेरण्यासाठी बियाणे वेगवेगळे साठवले जाते. बियाण्याला कधीही खाण्यासाठी हातही लावला जात नाही. 

  धान्य साठवण

 •  वर्षभरासाठी धान्य साठवण्याकरिता ज्वारी, बाजरी, मका, भात, उडीद ही धान्ये सुपाने उफवून (पाखडून), साफ करून, उन्हात सुकवून, कडूलिंबाच्या पानात मिश्र करून ठेवतात.  कणगीला आतल्या बाजूला माती शेण मिश्र करून, त्याने सारवून, सुकवून ठेवतात. त्यानंतर लिंबाची पाने धान्यात मिश्र करून व कणगी पूर्ण धान्याने भरली की कणगीच्या तोंडाजवळ लिंबाची जास्त पाने ठेवतात. यानंतर सागाची तीन-चार पाने ठेवून कणगीचे तोंड सारवून घेतात. 
 • जेव्हा धान्ये खाण्यासाठी उघडवायचे आहे, तेव्हा कणगीची पूजा करून धान्ये काढतात. मग धान्ये दळून आणून खातात. काही कणग्यांना खालच्या बाजूने धान्य काढण्याची सोय असते. जेणेकरून नवीन धान्य वरून भरले जाईल व खालून जुने धान्य आधी वापरले जाईल. या कणग्यांत कधी किडा मुंगी लागल्याचे तसेच उंदराने कुरतडल्याचे दिसत नाही. अनेक वर्षे ही कणगी वापरतात. 
 • बियाणे साठवण्याची पद्धत 

 •  कडधान्याच्या बियांचा काही भाग आधीच बियाणासाठी बाजूला ठेवातात. बियाणे हिवाळ्यात, उन्हाळ्यात चांगले सुकवून कणगीत घट्ट झाकून ठेवतात. 
 • पावसाची सुरवात झाली की बियाणे कणगीमधून काढून, साफ करून पेरणी करतात. 
 •  मका, ज्वारीसारख्या धान्याची संपूर्ण कणसेच माळ्यावर पारंपरिक पद्धतीने टांगून ठेवतात. ती साधारणपणे चुलीच्या वरच्या भागात असतात. चुलीचा मंद धूर आणि उष्णतेमुळे कणसे ओलसर रहात नाहीत, त्यांना बुरशी- कीड लागत नाही. उंदीरही ही कणसे खात नाहीत.
 • कडाया किंवा भुत्याचा डिंक 

 • कडाया किंवा भुत्या ( Sterculina urens)  हे जंगलात सापडणारे पांढऱ्या खोडाचे वैशिष्ट्यपूर्ण झाड. लोक सांगतात की, ५० वर्षांपूर्वी दुष्काळाच्या काळात या झाडाचा डिंक विकून आपला ते उदरनिर्वाह करत होते.
 •  डिंक देऊन त्याबदल्यात खाण्याच्या वस्तू घेत होते. डिंक काढण्याची पद्धत म्हणजे झाडाला आदल्या दिवशी दोन तीन ठिकाणी कुऱ्हाडीने घाव घालायचे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर जाऊन डिंक गोळा करायचा. यासाठी लोक कधीकधी दोन दिवस जंगलातच मुक्काम करायचे. अस्वल आणि वाघाच्या भीतीमुळे ते झाडावर रहायचे. 
 •    झाडाच्या सालीपासून दोरही तयार करत असत. परंतु, जसजसा बाजाराचा दबाव वाढला तसतसे जास्त डिंक गोळा करण्यासाठी कुऱ्हाडीने मोठे आणि जास्त प्रमाणात घाव घातले जाऊ लागले. जिथे घाव घातले जायचे तिथे पावसाळ्याच्या दिवसात पाणी मुरून तो भाग कुजायचा आणि झाड मोडून पडायचे. या चुकीच्या पद्धतीने डिंक काढण्यामुळे आणि दोर बनवण्यासाठी साल काढून घेतल्यामुळे झाडे मोठ्या प्रमाणात तुटली, मोडली गेली. याबरोबरच अतिक्रमणासाठी झालेल्या जंगलतोडीमुळे हे झाड आता दुर्मिळ झाले आहे.
 •  अलीकडच्या काळात काही लोकांनी कडायाची झाडे पुन्हा लावण्यास सुरवात केली आहे. ही झाडे लावण्याची विशिष्ट पद्धत आहे. याची लागवड करण्यासाठी बिया २४ तास पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी लागवड केली जाते. नर्सरीत याची रोपे तयार करून मगच जंगलात लावली जातात. या झाडाची मुळे कंदासारखी गोड लागतात. म्हणून गावातील लहान मुले रोपे उपटून मुळे खावून जातात. तसेच जंगलातील डुक्कर, अस्वल हे प्राणीसुद्धा या झाडाची मुळे मोठ्या चवीने खातात अशी माहिती विरपूरचे वैद्य सोता शिवाजी पवार यांनी दिली. 
 • मासेमारीची पद्धत

 •   नदी, नाले, छोटे झरे यांतील मासे- मासोळ्या ह्या आदिवासी आहारातील प्रथिनांचा व अन्न सुरक्षेचा महत्त्वाचा घटक आहे. 
 •   मासे मारण्यासाठी नदीत गेल्यावर नदीतील पाणी (प्रवाह) एका बाजूला काढण्यासाठी नदीत लहान मोठे दगड एका बाजूला रचतात. सागाची पाने दगडाला लावतात. पानाच्या वर माती-रेती टाकतात.
 •  हिंगुवऱ्याची साल दगडावर बारीक बारीक कुटून पाण्यात टाकतात. या सालीतील द्रव्यांमुळे माशांना गुंगी येते. थोड्या वेळानंतर डबक्यातील मासे पाण्याच्या वर निघण्याचा प्रयत्न करतात. काही मासे मरून पडल्यासारखे पाण्यात तरंगतात. माशांना ‘मान लागली आहे’ असे समजले जाते. ते मासे पकडतात व खाण्यासाठी शिजवायला नेतात.  
 • - विक्रम कान्हेरे, ८२७५१२३६२२, (लेखक जनार्थ आदिवासी विकास संस्था, शहादा येथे कार्यरत आहेत.)  

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com