अजिंक्य शहाणेDuck Rearing: येरुकला समुदायाचं बदकपालन ही केवळ आर्थिक क्रिया नसून शेती, पाणी, स्थलांतर आणि सामाजिक बदल यांच्याशी घट्ट जोडलेलं जीवनपद्धतीचं मॉडेल आहे. यंत्रावर चालणाऱ्या शेतीमुळे जरी त्यांना अन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळाला असला, तरी पाणीटंचाई, आजार, अपुरा पशुवैद्यकीय आधार, शासकीय उदासीनता आणि वाढती वाहतूक हे त्यांच्या उपजीविकेसाठी मोठं आव्हान आहे..आं ध्र प्रदेशमधील नेल्लोर येथील भातशेतीचा हंगाम संपला होता, पण तरीही भातशेतीत पाणी भरलेले होते. पाऊस यायला अजूनही अवकाश होता. संध्याकाळी ती भातशेती, त्यात भरगच्च भरलेले पाणी आणि त्यावर तरंगणारा पालापाचोळा असे दृश्य लांबून मला दिसत होते पण जवळ गेलो तर चित्र काही वेगळेच होते. तो पालापाचोळा नसून असंख्य बदकं होती. नेल्लोर परिसरातली येरुकला ही अनुसूचित जमात ज्यांना येरुकुला/एरुकला असेही म्हणतात हे आज मुख्यत्वे बदकपालनावर आपली उपजीविका चालवतात. डुक्करपालन आणि इतर लहानसहान व्यवसाय सोडून साधारण शंभर वर्षांपूर्वी ते बदकपालनाकडे वळले आणि तेव्हापासून हा त्यांचा प्रमुख व्यवसाय बनला आहे..येरुकला समुदायाची ओळखयेरुकला हे पारंपरिक भटके समुदाय असून साधारणतः आंध्र आणि तेलंगणा भागात वास्तव्य करतात. नेल्लोर (श्री पोट्टी श्रीरामलू नेल्लोर) आणि शेजारच्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळणारे येरुकला लोक घरी त्यांची स्वतःची येरुकला भाषा बोलतात; मात्र आता बहुतांश लोक तेलुगू शिकलेले आहेत, तर काहींना तमीळही अवगत आहे. पूर्वी त्यांचे पारंपरिक व्यवसाय डुक्करपालन, बुरुडकाम इत्यादी कामे होते..Poultry Farming : बदक, कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातींचे संगोपन.डुक्करपासून बदकपालनाकडेसमुदायातील ज्येष्ठांप्रमाणे, सुमारे ९०–१०० वर्षांपूर्वी तमिळनाडूतील काही लोकांकडून ते बदकपालन शिकले. त्यांच्यात एक प्रचलित कथा आहे की बदक हे बर्मा (सध्याचे म्यानमार) येथून तमिळनाडूमध्ये आणले गेले आणि तिथून हळूहळू येरुकलांपर्यंत पोहोचले आणि आज सगळ्यात जास्त प्रमाणात बदकपालन येरुकला करतात. यादरम्यान हळूहळू डुक्कर पालन मागे पडले आणि बदक ठेवणे हा मुख्य व्यवसाय झाला. आज बहुतांश कुटुंबांकडे किमान २,५०० बदकं असतात; काही दशकांपूर्वी एका कुटुंबाकडे ४००–५०० बदकं असणेही मोठं मानलं जायचं..समुदाय प्रामुख्याने ‘इंडियन रनर’ या जातीची बदके पाळतो, कारण ती स्थानिक हवामानाशी जुळवून घेतात आणि अंडीही भरपूर देतात. काही ठिकाणी व्हाइट पेकिंग, कोलाथा आणि पाटी जातीची बदकेही दिसतात, पण फार कमी प्रमाणात. येरुकुला भाषेत बदकाला बाथलु म्हणतात तर बदक मादीला पेट्टा, नराला पुंजू, अंडीला मुत्ता आणि लहान बदकाला कुंजुलू म्हणतात..खर्च, उत्पन्न आणि अंडी बाजारबदकांची पिले तीन-चार दिवसांची असताना जवळच्या गुड्लूर, कावेली आदी भागातील हॅचरीमधून (अंडी उबवणी केंद्र) आणली जातात. एका पिलाची किंमत साधारण २२ ते ३० रुपये असते. पूर्ण रोख रक्कम आधी दिल्यास दर कमी, तर निम्मे पैसे आधी आणि बाकी नंतर देण्याच्या करारावर दर थोडा जास्त आकारला जातो..लहान पिलांना धान, तांदळाचे तुकडे, पोल्ट्री फीड आणि कोंडा दिला जातो. काही आठवड्यांत ही बदके भातशेतीत चारण्यासाठी तयार होतात आणि तेथूनच बहुतांश खाद्य मिळते. योग्य काळजी घेतली तर एक कळप वर्षाला साधारण तीन लाख रुपयांचे उत्पन्न देऊ शकतो. मृत्युदर पाच–दहा टक्क्यांच्या आसपास राहिला, तर हा व्यवसाय फायदेशीर समजला जातो. बदके साधारण चार–पाच महिन्यांनी अंडी द्यायला सुरुवात करतात. एका मादी बदकाकडून वर्षाला सुमारे २००–२५० अंडी मिळू शकतात. .बदक प्रामुख्याने रात्री एक ते चार या वेळेत अंडी घालतात. साधारणतः अंडी सहा–आठ रुपयांना विकली जातात; आकाराने मोठी आणि हॅचरीसाठी योग्य अंडी १०–१२ रुपयांपर्यंत विकल्या जातात. पावसाळ्यात अंड्यांच्या सालींवर डाग किंवा त्याचा रंग काळसर झाल्यास त्यांना कमी दर मिळतो. पूर्व भारत आणि उत्तरेकडील काही राज्यांत कुक्कुटपालन तुलनेने कमी असल्याने बदकाच्या अंड्यांना चांगली मागणी आहे. जास्तीत जास्त माल तिकडेच विकल्या जातो असे हे लोके सांगतात..Poultry Farming : बदक, कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातींचे संगोपन.प्रजनन, हॅचरी आणि तंत्रज्ञानआता बहुतांश अंडी मोठ्या हॅचरिंमध्ये उबवली जातात. एका हॅचरीची क्षमता साधारण ३० हजार ते १ लाख अंडी उबवण्याची असते. पूर्वी समुदायातील लोकं कंदील किंवा दिव्याच्या उष्णतेने एका वेगळ्या उबदार खोलीत अंडी ठेवून दिवसातून तीन वेळा हाताने उलटवत असत. काही कुटुंबे एक-दोन कोंबड्या ठेवून त्यांच्या खाली बदकांची अंडी उबवून घेत. पण आज बहुतेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इनक्युबेटर वापरले जातात, त्यातून वीज वापरून पिले बाहेर येतात म्हणूनच स्थानिक पातळीवर ही बदके ‘करंट’ म्हणूनही ओळखली जातात. साधारण २७–२८ दिवसांत अंडी फुटून पिले बाहेर येतात..स्थलांतर आणि प्रश्नबहुतांश येरुकला बदकपालकांकडे स्वतःची शेतजमीन नसते. त्यामुळे ते वर्षातील साधारण अकरा महिने कळपासह भ्रमंती करतात आणि फक्त एक महिना गावी थांबतात; त्या काळात मोठी बदके विकून नवा हंगाम सुरू करण्याची तयारी करतात. त्यांचा प्रवास मुख्यतः आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील भातशेतीच्या पट्ट्यात होतो. गावाजवळच्या (दोन–तीन किमी) शेतापर्यंत बदके पायी हाकली जातात. पाच किमीपेक्षा जास्त अंतर आणि विशेषतः रस्ते, महामार्ग ओलांडावे लागले तर बदके खास ट्रकमधून नेली जातात. अशा वाहतुकीचा दर सुमारे प्रति किमी ८० रुपये, तर पाच–दहा किमीच्या छोट्या फेऱ्यांसाठी सुमारे तीन हजार रुपये मोजावे लागतात. प्रवासात गुदमरून होणारी हानी, अपघात आणि थकव्यामुळे मृत्यू ही या व्यवसायाची मोठी जोखीम आहे, विशेषतः महामार्ग मोठे होत असताना समस्या आणखी वाढत आहेत. बहुतांश वर्षी त्यांचे स्थलांतर मार्ग जवळपास सारखे असतात; मात्र पाण्याची टंचाई किंवा स्थानिक परिस्थिती बदलल्यास मार्गातही बदल करावे लागतात..शेतात चराई, पाणी आणि खतबदकांना सर्वांत आवडता आहार म्हणजे कापणी झालेल्या भातशेतांतील पडलेले धान, कीटक, लहान मासे इत्यादी. चराईसाठी शेतात थोडं पाणी सोडून ओले केले तर बदके जास्त आवडीने खातात. भरपूर धान पडले असेल तर अंडी उत्पादन झपाट्याने वाढते; अन्न कमी पडले तर अंडी देणं थांबतं..शेतकरी साधारण आठ–दहा दिवसांसाठीच बदकांना त्यांच्या शेतात राहू देतात. त्यांचे म्हणणे आहे, की जास्त दिवस बदके राहिली तर खत खूप साचून पिकाला उलट हानी होऊ शकते. आंध्र प्रदेशात बदकपालकांना एका एकरासाठी साधारण एक हजार रुपये देऊन शेतात प्रवेश मिळतो; तर तेलंगणात काही भागांत शेतकरी मोफतही परवानगी देतात, कारण बदकं कीड कमी करतात आणि काही प्रमाणात खतही देतात. नेल्लोर परिसरात असलेल्या मत्स्यपालन तलावातील पाणी कमी झाल्यानंतर किंवा हंगाम संपल्यानंतर ते बदकांच्या चराईसाठी वापरल्या जातात. आधुनिक हार्वेस्टरमुळे आधीपेक्षा जास्त धान शेतात सांडतं. हाताने कापणी करतानाच्या काळात एका एकरात साधारण एक हजार बदके चरायची, तर आता त्याच क्षेत्रात तीन हजार बदके चरू शकतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे धान्याचं नुकसान असले तरी बदकपालकांसाठी फायद्याचे आहे..बाजारव्यवस्थाबदके आणि अंडी यांची विक्री प्रामुख्याने मध्यस्थ व्यापाऱ्यांमार्फत होते. तीन ते पाच महिन्यांची पिले थोडी मोठी झाल्यावर नर बदके साधारण २०० रुपये आणि माद्या २५० रुपयांच्या दराने विकली जातात. मोठ्या प्रमाणावर तयार होणारे बदकांचे खत मात्र सध्या विक्रीत येत नाही; ते फेकून दिले जाते. काही जातीच्या बदकांच्या पांढऱ्या पिसांचा वापर शटलकॉक बनविण्यासाठी होतो, पण स्थानिक जातीच्या बदकांची पिसं लहान असल्याने त्यांना फारसा दर मिळत नाही..आजार, पशुवैद्यकीय सेवादर तीन–चार वर्षांनी मोठ्या प्रमाणावर आजाराची साथ येते आणि मोठ्या प्रमाणात बदकं मृत्युमुखी पडतात असे लोकं सांगतात. डोळ्यातून पाणी येणे, मानेत लकवा, पायांत अशक्तपणा येऊन उभं राहता न येणं असे आजार वारंवार दिसतात. हंगामाच्या सुरुवातीला लसीकरण आणि औषधोपचारासाठी २,५०० बदकांच्या कळपावर सुमारे दीड लाख रुपये खर्च होतात. काही सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असले तरी प्रत्यक्ष औषधं, लस इत्यादींसाठी बहुतेक वेळा खासगी औषधी दुकानांवर अवलंबून राहावे लागते.याशिवाय, भटक्या कुत्र्यांचे हल्ले ही मोठी समस्या आहे. एका रात्रीत २०–३० बदके फाडून टाकली जाणे सामान्य मानले जाते. लहान-थोर सगळ्यांनाच पाण्याची टंचाई, आजार, सामाजिक सुरक्षा आणि शासनाच्या अपुऱ्या मदतीचा त्रास सहन करावा लागतो..सामाजिक बदल आणि पुढची पिढीया परिसरातील मुलं आवडीने आणि मोठ्या संख्येने शाळा आणि वसतिगृहांमध्ये जात आहेत. वसतिगृह सरकारी आणि खासगी दोन्ही प्रकारची असल्याने राहायची सोय चांगली होते आणि यामुळे पुढील पिढी पारंपरिक भटक्या जीवनापेक्षा स्थिर, सुशिक्षित आयुष्याकडे वळण्याची चिन्हं दिसत आहेत. या मुलांचे पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच ते इतके कठीण काम आनंदाने करत आहेत. काही ठिकाणी अजूनही नवीन पिढी यात थोड्या प्रमाणात काम करण्यास उत्सुक दिसत आहे. स्त्रियांची भूमिका केवळ घरकामापुरती मर्यादित नसून बदकांची देखभाल, अंडी गोळा करणे, व्यापाऱ्यांशी बोलणी करणे अशा अनेक टप्प्यांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो..धोरण, पर्यावरण आणि पुढचा मार्गयेरुकला समुदायाचे बदकपालन हे केवळ आर्थिक क्रिया नसून शेती, पाणी, स्थलांतर आणि सामाजिक बदल यांच्याशी घट्ट जोडलेलं जीवनपद्धतीचं मॉडेल आहे. यंत्रावर चालणाऱ्या शेतीमुळे जरी त्यांना अन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळाला असला, तरी पाणीटंचाई, आजार, अपुरा पशुवैद्यकीय आधार, शासकीय उदासीनता आणि वाढती वाहतूक हे त्यांच्या उपजीविकेसाठी मोठं आव्हान आहे..या पार्श्वभूमीवर बदकपालन करणाऱ्या भटके समुदायांसाठी खास पशुवैद्यकीय मोहीम, लस-औषधांवर अनुदान, पाणी उपलब्धतेसंदर्भातील योजनांमध्ये प्राधान्य आणि खत विक्री किंवा मूल्यवर्धित उत्पादनांसाठी (उदा. पिसांपासून उत्पादने) मार्गदर्शन यांसारख्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरू शकतात.बदकपालन हे येरुकला समुदायासाठी फक्त व्यवसाय नाही, तर त्यांच्या ओळखीचा, संस्कृतीचा आणि दैनंदिन जगण्याचा केंद्रबिंदू आहे. बदलत्या काळात शिक्षण, व्यवसाय आणि शेतीतले नवे तंत्र यांमुळे त्यांच्या जीवनात नवे वळण येत असले, तरी योग्य धोरणात्मक पाठबळ आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळाली तर ही परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत समर्थपणे टिकू शकते.९४०४०१४९१४(लेखक ‘रेनफेड लाइव्हस्टॉक नेटवर्क अँड सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्ह’ या संस्थेत भटके पशुपालक या विषयावर कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.