पूर्वार्धIndian Agriculture: काही दिवसापूर्वी ॲग्रोवन मध्ये, ‘ट्रम्प शेवग्याचे झाड तोडणार का?’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख वाचून माझ्या एका मित्राने एक लांबलचक पोस्ट लिहून मला पाठवली. त्याचे म्हणणे होते की आताच भारतात शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन होत आहे, आणखी उत्पादन वाढवून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणार नाही का? सध्याची परिस्थिती पाहता त्याची शंका योग्य वाटते कारण अतिरिक्त उत्पादनामुळे शेतीमाल मातीमोल भावाने विकावा लागल्याचे आपण अनुभवले आहे..काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाच्या किमती भारतापेक्षा जास्त असायच्या मात्र सरकार निर्यातबंदी लावून, किमान निर्यात किंमत वाढवून, निर्यात शुल्क लादून व्यापारात हस्तक्षेप करते व आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारी किंमत भारतातील शेतकऱ्यांना मिळू देत नाही. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना उणे अनुदान मिळते, असा आरोप आम्हीच करत होतो. आता बऱ्याच पिकांच्या बाबतीत परिस्थिती बदलली आहे. जागतिक बाजारात भारतापेक्षा कमी दरात माल उपलब्ध आहे..Indian Agriculture: ग्राहकांच्या आवडीनुसार ठरवा पीकपद्धती.व्यापार खुला केला तरी भारताचा शेतकरी त्यात टिकणार नाही, असा युक्तिवाद केला जातो. प्रगत देशातील शेतकऱ्यांची जमीन धारणा जास्त आहे, त्यांना प्रचंड अनुदाने दिली जातात हा ही मुद्दा आहेच. इतर देश पूर्वी पेक्षा आता शेतीमाल स्वस्त कसे विकू शकतात? या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. शेती फायद्याची होण्यासाठी दर हेक्टरी उत्पादन वाढवावे लागेल हे लक्षात आल्यानंतर त्यांनी उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला. संशोधनावर भर दिला, अधिक उत्पादन देणाऱ्या जाती तयार केल्या, उत्पादन खर्च कमी करणारे तंत्रज्ञान विकसित केले व जास्त उत्पादनाच्या आधारे बाजारात स्वस्त शेतीमाल विकू लागले..अमेरिकेत तयार होणारा गहू, सोयाबीन, मका, दुग्धजन्य पदार्थ भारतात विकू द्यावे यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकत आहेत. हे सरळ सरळ डंपिंग आहे. असे केले तर भारतातील शेतकरी भरडला जाईल, या भीतीने भारत ही अट मान्य करायला तयार नाही. ते सध्या योग्य ही आहे. याचा रोष धरून भारतावर ५० टक्के टेरिफ आकारले गेले आहे. या संकटावर मात करायची असेल तर भारताला काही कठोर पावले उचलून आपली शेतीमालाची उत्पादकता वाढवावी लागेल..Indian Agriculture Technology : भारतीय शेतीमध्ये घडतेय क्रांती! इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, एआय आणि तंत्रज्ञान!.उत्पादकतेची तुलनाबाजुच्या तक्त्यात प्रमुख पिकांचे कोणत्या देशात, हेक्टरी किती उत्पादन आहे, याची भारताशी तुलना केली आहे. काही देशांना त्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा होत असेल किंवा ब्राझीलला पाऊस जास्त असल्याचा लाभ होत असला तरी त्यांची उत्पादकता वाढवण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करणे व जीएम तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा मोठा वाटा आहे. भारतालाही सुपीक जमीन, पाणी, मुबलक सूर्यप्रकाशाचा फायदा आहेच..उत्पादकता वाढल्याने फायदा होणार?वरील तक्त्यात उल्लेख केलेल्या देशांप्रमाणे भारतातील शेतकऱ्यांना उत्पादन मिळू लागले तर भाव पडतील का? पडले तरी शेतकऱ्यांच्या पदरात किती पैसे पडतील याचा अंदाज घेऊ या. समजा मी एक हेक्टर सोयाबीन पेरले. त्याचे १० क्विंटल (भारताची सरासरी) उत्पादन मिळाले व आताच्या हमीभावाने ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल दराने विकले तर मला ५३ हजार २८० रुपये मिळतील. प्रत्यक्षात मागील वर्षी सोयाबीनला ३,५०० रुपयेच दर बाजारात मिळाला होता. शासनाने फार खरेदी केलीच नाही..खुल्या बाजारात मला मिळाले ३५,००० रुपये. जर माझ्या शेतात हेक्टरी ३० क्विंटल उत्पादन मिळाले व मी ते हमीभावाने विकले तर मला मिळतील एक लाख ५९ हजार ८४० रुपये! ते सोयाबीन मी खुल्या बाजारात ३,५०० रुपये दराने (साधारण आजच्या जागतिक बाजारातील दर आहेत) विकले तर मिळतील एक लाख पाच हजार रुपये! म्हणजे सध्याच्या उत्पादकतेपेक्षा ७० हजार रुपये जास्त आहेत. आणखी दर कोसळले व २००० रुपयाने विकण्याची वेळ आली तरी ६० हजार रुपये मिळतील जे ३५ हजारापेक्षा जास्तच आहेत..सध्या ट्रम्प त्यांनी ५० टक्के टेरिफ लादल्यामुळे कापसाची विना कर आयात सुरू आहे. कापसाचे भाव पडणार हे नक्की! सरकार किंवा सीसीआय ची सर्व कापूस खरेदी करण्याची क्षमता नाही. मग सध्याच्या उत्पादकतेत आपले काय होणार? समजा, मी एक हेक्टर कापूस लागवड केली. मला सध्याच्या उत्पादकतेनुसार ४.५ क्विंटल कपाशीचे उत्पादन मिळाले. तो कापूस मी सीसीआय ला विकला तर मला प्रतिक्विंटल ८,००० रुपयांप्रमाणे ३६ हजार रुपये मिळतील..खुल्या बाजारात विकण्याची वेळ आली तर ६,५०० रुपयाने विकावा लागेल, जो जागतिक बाजाराच्या आसपास आहे तर मला मिळतील, २९ हजार २५० रुपये. माझे उत्पादन अमेरिकेच्या शेतकऱ्याच्या बरोबरीचे असते तर मला २० क्विंटल कापूस मिळाला असता. खुल्या बाजारात ६,५०० रुपये दराप्रमाणे मला एक लाख ३० हजार रुपये मिळाले असते जे ८,००० रुपये दराने मिळणाऱ्या ३६ हजारांपेक्षा जवळपास चौपटीने जास्त आहेत. असे उत्पादन मिळाले आणि जर ८,००० रुपये प्रतिक्विंटल खुल्या बाजारात दर मिळाले (जे काही वेळा मिळू शकतात) तर हिशोब करा किती पैसे आपल्या घरात येतील.: ९९२३७०७६४६(लेखक स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.