२०२३ वर्ष हे ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून साजरे झाले. त्यात नागली, वरई, सावा, ज्वारी इ. मिलेटसह बाजरी या Pearl Millet चेही खूप गुणगान गायिले गेले. खरं तर असे वर्ष-दिन-आठवडे साजरे करणे म्हणजे मोठे इव्हेंट आयोजित करणे होय. नियोजित निधी खर्च करून एकमेकांची पाठ थोपटून घ्यायची. आज घडीला बाजारात दर्जेदार बाजरीला वर्षभर मागणी असताना उत्पादक शेतकऱ्यांनी बाजरीकडे पाठ का फिरवली आहे, या प्रश्नाची उत्तरे शोधायलाच हवीत..मध्यंतरी पुणे नगर व नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवरील पारनेर, जुन्नर, अकोले, संगमनेर व सिन्नर परिसरात भटकत होतो. स्थानिक शेतकऱ्यांशी गप्पा-गोष्टी सुरू होत्या. मागील दोन-तीन दशकांत बदलणारी कृषी व्यवस्था समजून घ्यावी, हा प्रवासाचा साधा उद्देश होता. त्यात पीक पद्धती, मशागत, खते व औषधांचा वापर, पशुपालन, शेतकऱ्यांच्या नव्या पिढीचे दृष्टिकोन, वर्तवणूक व अर्थकारण, महिलांचा सहभाग तसेच पर्यावरणीय परिणाम समजून घेत होतो. जिरायती शेती, बागायती शेती व नव्याने धरणाचे पाणी पोहोचल्याने जिरायती क्षेत्र बागायती झाल्यामुळे काय बदल होत आहेत, अशी विविधांगी निरिक्षणे या निमित्ताने नोंदवता आली..Bajara Farming: राज्यात बाजरीचे क्षेत्र ७६ हजार हेक्टरने घटले.मागील वीस वर्षांत सर्वच समाज घटक व संबंधित व्यवस्था झपाट्याने बदलत आहे. शेती क्षेत्रातील बदल तर बहुपदरी आहेत. अन्न-सुरक्षेसाठी शेती ही मूळ संकल्पना मागे पडली आहे व केवळ पैसे मिळविण्यासाठी शेती कसणे, हा पूर्णत: नवा व्यावसायिक ट्रेंड सर्वदूर पसरला आहे. शेतीतून रोकड पैसा कमावणे, हे योग्यच आहे. पण नगदी पिकांतून लाख-कोटींची उड्डाणे घेण्याच्या नादात ‘शाश्वत शेती’ ही संकल्पना मागे पडत आहे. अन्नधान्य, गुरांना चारा देणारी, मुख्य म्हणजे जमिनीची सुपीकता टिकवणारी वैविध्यपूर्ण पिके व पीक पद्धती यांचा सर्वच ठिकाणच्या (जिरायती, बागायती व नव बागायती) शेतकऱ्यांना पूर्णत: विसर पडला आहे. माती, पाणी तसेच अन्नातील प्रदूषण या आरोग्य व पर्यावरण संबंधी समस्या वाढतच आहेत..खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील शेती नियोजनात असणारा कुटुंबातील महिलांचा सक्रिय सहभाग केवळ शारिरीक कष्टापुरता उरला आहे, असे जागोजागी दिसते. शेतकरी केवळ नगदी व संकरित पिकांच्या लागवडीकडे लक्ष देत आहेत. हा गोंधळलेला शेतकरी बाजार भावातील चढ-उतार, अस्थिर सरकारी धोरण, शासकीय योजनांचा मारा, शेती-सल्लागार, बियाणे-खते विक्रेते व ‘सोशल मीडिया विद्यापीठ’ यांच्या फेऱ्यात पूर्णत: अडकला आहे. मानसिकदृष्ट्या खचला आहे. स्वत:ला निर्णय घेता येत नाही. आपल्या मुलाने शेती करूच नये, असे शेतकरी आई-बापाला वाटते. जे कोणी जिद्दीने गावात राहून शेती करतात, त्यांचे लग्न जमायला अडचणी येतात व प्रसंगी अविवाहित राहावे लागते..Bajara Farming : बाजरी पीक जोमात, क्षेत्र राहिले स्थिर .पारंपरिक पिकांकडे दुर्लक्षशेतकऱ्यांनी स्वप्रयत्नाने पिढ्यान् पिढ्याचे अनुभव व शहाणपणातून सूक्ष्म वातावरणात टिकून राहणारी पीक व्यवस्था विकसित (नव्हे उत्क्रांत..!) केली आहे. पारंपरिक शेती पद्धत ही कालबाह्य, कुचकामी आहे, असे पाश्चात्त्य विचारांच्या भारतीय कृषी-शिक्षण-तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. परिणामी, स्थानिक वातावरण, माती, पाणी या घटकांचा विचार करून जी शेती केली जायची ती पूर्णत: थांबली व शेतकरी चक्रव्यूहात अडकला. या साऱ्या प्रवासात शेतकऱ्यांशी बाजरी पिकाबाबतीत मोठी चर्चा व्हायची. महिला व पुरुषांना बाजरी विषयी विशेष आत्मीयता व स्वारस्य आजही टिकून आहे, याची प्रचिती येत होती. पण वास्तव विपरीत होते. बागायती शेतीत बाजरी पिकाची जागा मका, नेपियर गवत, कांदा इ. पिकांनी घेतल्याचे दिसले. बाळेश्वर या सह्याद्रीच्या उपरांगात पठार व डोंगरावरील शेतात बाजरी पिकायची, तेथे आता खरिपातील कांदा, बटाटे व टोमॅटो ही नगदी पिके घेतली जातात..Bajara Sowing : बाजरीचा पेरा घटला.मागील तीन-चार वर्षांत सातत्यपूर्ण पावसामुळे पाणी पातळी टिकून आहे, अशा सिन्नर तालुक्यातील दोडी, दापूर, नांदूर, वावी, मरळ इ. गाव-परिसरात बाजरी तर हद्दपार झाली आहे. त्याजागी सोयाबीन, मका या पिकांचे राज्य आले आहे. आता आम्ही बाजरीची बोळवण केली आहे, असे फुशारकीने सांगणारे शेतकरी पण भेटले. दुसऱ्या बाजूला जुन्नर, अकोले, सिन्नर मधील काही धोरणी शेतकरी उन्हाळी हंगामात बाजरीचे पिक घेताना दिसताहेत, हे आशादायी चित्र म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबरच्या ‘अॅग्रोवन’ दैनिकातील एका बातमीने लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्यातील बाजरीचे क्षेत्र कसे झपाट्याने कमी होत आहे, याची धक्कादायक आकडेवारी या बातमीमध्ये दिलेली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ७६ हजार ५२५ हेक्टर बाजरी क्षेत्र कमी झाले आहे. या वर्षी राज्यात सरासरीच्या केवळ ६७ टक्के क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली. गेल्या वर्षी ती ८१ टक्के इतकी होती. मागील सात वर्षांत राज्यात बाजरीचे क्षेत्र खूप वेगाने कमी होत आहे. २०१८-१९ मध्ये राज्यात ६,०९,६०० हेक्टर क्षेत्रावर बाजरी घेतली जायची. ती २०२५ मध्ये ३,२४,५७२ हेक्टर वर आली आहे. बाजरीचे एकूण क्षेत्र निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहे..सर्वोपयोगी बाजरीमूळ आफ्रिका खंडातील असणारे बाजरी हे पीक दोन-अडीच हजार वर्षापासून भारतात घेतले जाते. राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत बाजरी पिकते. आपल्या राज्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, पुणे, सोलापूर, सांगली या निवडक जिल्ह्यांत बाजरी पीक घेतले जाते. कष्टकरी शेतकरी समाजात बाजरीची भाकरी हे मुख्य अन्न आहे. व्यालेल्या गायी-म्हशींना ताकद येण्यासाठी व दुध वाढीसाठी बाजरीचे मेळवण देतात. तसेच पाळीव प्राण्यांना चारा म्हणून बाजरीची वैरण उपयुक्त असते. तसा मनुष्य व पाळीव प्राण्यांच्या रोजच्या आहारात बाजरी हा अविभाज्य घटक. फुलोऱ्यातील बाजरी मधमाश्यांना अतिप्रिय, तर कोवळी कणसे रानपाखरांना (शाकाहारी व मांसाहारी पक्षी) विशेष आवडणारी. जमिनीला फेरपालट मिळावी व सुपीकता टिकून राहावी म्हणून बाजरीचे पीक हलक्या व भारी जमिनीत अवश्य घेतले जात असे. कमी कालावधीचे बाजरी हे पीक घेण्याकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल होता..Bajara Irrigation Management : भरघोस उत्पादनासाठी बाजरीसाठी पाण्याच नियोजन.नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत जिरायती शेतीत ‘इरवड’ नावाची मिश्र-पिक पद्धत काही प्रमाणात आजही टिकून आहे. एकाच जमिनीत मुख्य बाजरीचे पीक व जोडीला मठ, मुग, उडीद, भुईमूग, कारळे, ज्वारी अशी खरीपातील अठरा पेक्षा अधिक पिके अन्न-सुरक्षा सांभाळण्यासाठी घेतली जात असत. कृषी-जैवविविधता जपण्याची ती एक उत्तम पारंपारिक व्यवस्था होती. इरवड पद्धतीत घेतली जाणारे सर्व वाण गावरान (शेतकऱ्यांची वाणे) असत. ‘देवठाण’ नावाची गावठी बाजरी ‘इरवड’ पद्धतीत वापरायचे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरात ‘उसवड’ नावाची गावरान बाजरी प्रसिद्ध होती. लांब कणीस व भरगच्च भरपूर पाने असणारे ताट हे या देवठाण व उसवड बाजरीची खासियत होती. संगमनेरच्या लोकपंचायत संस्थेने गावरान बियाणे संवर्धन कार्याचा एक भाग म्हणून देवठाण बाजरीची शुद्धता जपत संवर्धन करण्याचे मोठे काम केले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील लोक-पर्याय या सामाजिक संस्थेने उसवड बाजरी जतन संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत..ग्रामीण भागात बाजरी पिकाला एक वेगळे सांस्कृतिक महत्त्व पण आहे. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करते वेळी ग्रामदेवतांचे दर्शन करताना बाजरीची कणसे वाहिली जात असत. तसेच नवरात्रीचे घट बसवल्यावर देवघरातील लाकडी मंडपीला बाजरीची निम्बूर (कणसे) अडकवीत असत. जागरण-गोंधळ व इतर विधिविधानात देवांसाठी बाजरीच्या ताटाचा तीन खांबी मंडप करण्याचा प्रघात होता. निसर्गपूजक मानवी-संस्कृती (Human Bio-culture) आणि वर्तवणूक आधारित अर्थकारण (Behavioural Economics) या अंगाने बाजरी पिकाचा मागोवा घेतला तर या पिकाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. एकूणच बाजरी शिवाय शेतकऱ्याचे पान हलत नव्हते, हे खरे..Summer Bajara Sowing : भरघोस उन्हाळी बाजरी उत्पादनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक.बाजरीकडे पाठ का?तीसेक वर्षांपूर्वी अत्यंत महत्त्वाचे असणारे बाजरी पिक कमी होण्यामागे गुंतागुंत असणारी अनेक कारणे आहेत.- विभक्त कुटुंब झाल्याने जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी नगदी पिक घेण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसतात.- विशेषत: भारी व खोल जमिनीत बैलांची मशागत थांबली व पूर्णत: ट्रॅक्टरद्वारे खोल मशागत व लोखंडी पाभरीने पेरणी सुरू झाल्याने बाजरीची उगवण समाधानकारक होत नाही. त्यामुळे नदीकाठच्या काळ्या जमिनीत बाजरी घेणे पूर्णपणे थांबले आहे..- गावरान बाजरीचे धान्य, चारा चविष्ट व टिकावू असायचा. या उलट संकरित बाजरीचे उत्पादन अधिक असले तरी तिचे धान्य व चारा चविष्ट नाही व टिकावू पण नाही.- देवठाण व उसवड सारख्या बाजरी वाणांचे पुनरुज्जीवनाचे प्रयत्न अनेक वर्षे सुरु आहेत. पण बाजरी पिकातील जनुकीय शुद्धता जपताना अनेक व्यावहारिक व तांत्रिक अडचणी येतात. पिकाचे परागीभवन होत असताना गावठी बाजरीत परिसरातील इतर संकरित बाजरीची जनुके येण्याचा अधिक संभव असतो. त्यामुळे देशी बाजरीचे मूळ गुणधर्म बदलत राहतात..Bajara Benefits : थंडीच्या दिवसात बाजरी खाण्याचे फायदे .- सर्वसामान्य ग्राहकांना व त्यातही नव्या पिढीला बाजरी खाणे, हे सन्मानजनक वाटत नाही. गहू खाणे हे प्रतिष्ठेचे झाल्याने बाजरी केवळ ग्रामीण भागात खातात.- रेशनवर म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत तांदूळ, गहू हे अत्यल्प किमतीत मिळतात, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम बाजरीसारख्या पिकावर होत आहे.यावर उपाय काय?बाजरी व तत्सम देशी पिकांना जीवदान देण्याची जबाबदारी कोण्या एका घटकावर (Stake holders) ढकलून चालणार नाही. त्यात सर्वच घटकांना जबाबदारी घ्यावी लागेल व कृतिशील बनावे लागेल..शेतकरीपारंपरिक पिकांना हद्दपार करून नवनवीन पिके घेत राहण्याचा जो ट्रेंड सेट होत असतो, त्याला भुलून न जाता सारासार विचार करून आपल्या मातीत रुजलेल्या पीक पद्धतीत सावधपणे बदल करावा. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषिविषयक पारंपरिक ज्ञान, कौशल्य, शहाणपण व सांस्कृतिक वारसा यांचा विचार करून पर्यावरणीय व आर्थिकदृष्ट्या शाश्वत कृषी व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा. स्थानिक वातावरणात टिकाव धरणाऱ्या पिकांचे शेतकरी गट / कंपनी स्थापन करून धान्य व मूल्यवर्धित उत्पादनांना बाजारपेठ मिळवावी..Bajara Benefits : थंडीच्या दिवसात बाजरी खाण्याचे फायदे .अभ्यासक व शास्रज्ञभारतीय कृषी व्यवस्था, शिक्षण-ज्ञान परंपरा केंद्रस्थानी ठेवून शेतकरी समुदायासाठी मातीत रुजणारे विज्ञान व तंत्रज्ञान विकसित करावे. त्याचा उपयोग देशी व प्रादेशिक पीक वाणांचे थेट शेतात स्व:स्थळी संवर्धन (In-situ conservation) प्रक्रियेसाठी होईल.लोक प्रतिनिधी व शासकीय अधिकारीशेती व्यवस्था सुरक्षित राहावी व शेतकऱ्यांचे भले कशात आहे, हे ओळखून राज्यकर्त्यांनी धोरण आखावे. देशभर पारंपरिक पीक व्यवस्थेत होणारे बदल व त्याचे भलेबुरे परिणाम यांचे वेळोवेळी आवलोकन (Assessment) करून सुयोग्य निर्णय प्रक्रिया राबवावी..कृषी विभाग, विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र इ.पारंपरिक स्थानिक पिके व त्यांच्या जतन संवर्धनासाठी शेतकरीकेंद्री संशोधन करावे व कृषी ज्ञान, शिक्षण यांच्याशी संबंधित विस्तार प्रक्रिया प्रभावीपणे राबवावी. शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण संवाद ठेऊन विश्वास संपादन करावा व त्याच्या मनातील गोंधळ दूर करण्याची जबाबदारी घ्यावी..Bajara Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच.स्वयंसेवी क्षेत्र व कार्यकर्तेशेती व्यवस्थेत होत असलेले बदल व त्यांचे परिणाम याविषयी स्वयंसेवी क्षेत्राने अवगत राहावे. शेतकरी समुदायाला शेतीत होत असलेल्या बदलाच्या परिणामांचे गांभीर्य समजून द्यावे. कार्यकर्त्यांनी पारंपरिक शेती व आधुनिक शेती याविषयी शेतकऱ्यांना शिक्षित करावे. ‘लोकपंचायत’ प्रकाशित ‘सह्याद्रीतील शेती व कृषी संस्कृती’ हे पुस्तक शाश्वत कृषी पर्यावरण संस्कृती यांविषयी लोक-शिक्षण देणारा दस्तऐवज आहे.प्रसारमाध्यमे, लेखक, साहित्यिक, पत्रकारकृषी व्यवस्था व पीक पद्धतीतील बदल, त्याचे परिणाम याविषयी प्रसारमाध्यमांनी संवेदनशीलपणे वार्तांकन करावे. अत्यंत जबाबदारीने सत्य जगापुढे मांडावे. तरुण कृषी पत्रकार धनंजय सानप यांनी लिहिलेले ‘ज्वारीचे कहाणी’ हे पुस्तक दिशादर्शक आहे. त्याच धर्तीवर बाजरी व तत्सम पीक-वाणांविषयी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व अन्नसुरक्षेच्या अंगाने गोष्टीरूपी पुस्तके व माहितीपट मालिका निश्चितच उपयुक्त ठरतील..२०२३ वर्ष हे ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून साजरे झाले. त्यात नागली, वरई, सावा, ज्वारी इ. मिलेटसह बाजरी या Pearl Millet चेही खूप गुणगान गायिले गेले. खरं तर असे वर्ष-दिन-आठवडे साजरे करणे म्हणजे मोठे इव्हेंट आयोजित करणे होय. नियोजित निधी खर्च करून एकमेकांची पाठ थोपटून घ्यायची. पण मुख्य घटक उत्पादक शेतकरी व मिलेट पीक-वाण यांचे काय भले होते? या कार्यक्रमांची फलश्रुती शून्यच. आज घडीला बाजारात दर्जेदार बाजरीला वर्षभर मागणी असताना उत्पादक शेतकऱ्यांनी बाजरीकडे पाठ का फिरवली आहे, या प्रश्नाची उत्तरे शोधायलाच हवीत. बेजाबदारपणे आपण अशी बाजरीची बोळवण करत आहोत, हे आपल्याला परवडणारे नाही, हे ध्यानी घ्यावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.