पुस्तकाचे नाव : शाश्वत नैसर्गिक शेतीलेखक : कृषिभूषण राजेंद्र भट प्रकाशक : सकाळ मीडिया प्रा.लि. ५९५, बुधवार पेठ, पुणेपृष्ठे : १२५ मूल्य : २४० रुपये संपर्क : ९८८१५९८८१५.शेती ही सेंद्रिय कर्ब, जैवभार, सूक्ष्म जीव, वनस्पती, पाणी, कीटक, पशू- पक्षी, जनावरे आणि मानवी श्रमांवर आधारित आहे. एका बाजूला शेतीचा विविध अंगाची विकास होत असताना जमीन सुपीकता आणि शेतीमधील पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शेतीमाल उत्पादन आणि मानवी आरोग्यावर परिणाम दिसतो आहे. हे लक्षात घेऊन बेंडशिळ (जि. ठाणे) येथील कृषिभूषण पुरस्कार विजेते शेतकरी राजेंद्र भट यांनी स्वतःच्या शेती पद्धतीतील अनुभव आणि विविध परिसंस्थांचा अभ्यास करून शाश्वत नैसर्गिक शेती हे पुस्तक लिहिले आहे..Book Review: पशुसमृद्धीचे संशोधकीय गंठण.पुस्तकाच्या पहिल्या टप्प्यात भट यांनी निसर्गाची मूलतत्त्वे आणि मूलभूत नियम सांगितले आहेत. आपली शेती ही निसर्गचक्रावर चालणारी आहे. विकेंद्रीकरण, विघटनक्षमता हे सगळे चक्र लक्षात घेऊन शेतीच्या जीवनचक्राची मांडणी पाच विभाग केली आहे. पहिल्या टप्यात सेंद्रिय शेती सोबत आकाश, वायू, जल, अग्नी, धारा तसेच सेंद्रिय कर्ब, जमिनीतील सूक्ष्मजीवांचा पीक उत्पादनाशी संबंध आणि जमीन सुपीकतेसोबतची सांगड सांगितली आहे..पुस्तकाच्या माध्यमातून निसर्गाची मूलभूत तत्त्वे म्हणजेच चक्रियता, निसर्गातील घटकांचे सहजीवन, निसर्गातील बहुविविधता कळते, नैसर्गिक शेती पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळते. निसर्गातील परिसंस्था सेंद्रिय शेती पद्धतीला कशा पद्धतीने उपयुक्त ठरतात हे समजण्यासाठी जमीन सुपीकता, शेती पर्यावरणाचा संबंध लक्षात घेणे आवश्यक आहे. यासाठी जमीन आरोग्य, जैवविविधता, मृदा आणि जलसंधारण आणि परिसंस्थेची समृद्धी याबाबत भट यांनी मार्गदर्शन केले आहे..केवळ एकपीक पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा आंतरपिके, दीर्घजीवी पिके, मिश्रपिके, साखळी आंतरपिके आणि विविध उंचीवरील पिकांची रचना आणि त्यांचा फायदा कशा पद्धतीने होते, याबाबत शास्त्रीय माहिती पुस्तकातून मिळते. जमीन आणि सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन हा पुस्तकातील महत्त्वाचा भाग आहे. जमिनीच्या सुपीकतेवरच शाश्वत पीक उत्पादन आणि त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते..Book Review: कृषी क्षेत्रातील नॅनोतंत्रज्ञानाची ओळख.त्यादृष्टीने सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या पद्धतीबाबत माहिती मिळते. जमिनीनंतर महत्त्वाचा भाग म्हणजे बियाणे, अन्नद्रव्ये आणि खत व्यवस्थापन. यासाठी हिरवळीची पिके, लेंडीखत, प्रेसमड, नाडेप, बायोडायनॅमिक खत, गोबर गॅस स्लरी, कंपोस्ट खत, गांडूळ खत, जिवाणू खत तसेच जैविक पद्धतीने कीड, रोग नियंत्रण आदीबाबत सविस्तर विवेचन केले आहे. नैसर्गिक शेतीच्या परिसंस्थेमध्ये पशू, मधमाशी, रेशीम शेती आणि मत्स्यपालन देखील महत्त्वाचे आहे. या पूरक उद्योगांचाही शेती विकास आणि उत्पन्नवाढीसाठी फायदा कसा होते, हे लक्षात येते..पुस्तकाच्या शेवटच्या टप्यात बहुस्तरीय बहुपीक पद्धतीबाबत माहिती दिलेली आहे. यामध्ये पीक रचनेचे महत्त्वाचे टप्पे, वेलवर्गीय भाज्या, पालेभाज्या, कडधान्य पिकांच्या लागवडीच्या पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळते. या पद्धतीने लागवड करताना वाफ्यांची रचना, हंगामानुसार पीक नियोजन, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनाबाबत माहिती दिलेली आहे..याचबरोबरीने मध्यम, दीर्घ मुदतीची बहुस्तरीय बहुपीक पद्धती, फळझाडांची लागवड, सहजीवन पद्धतीने पीक लागवड कशी करावी हे समजाऊन घेता येते. पुस्तकामध्ये गरजेनुसार रेखाचित्रे असल्यामुळे तांत्रिकता समजते. राजेंद्र भट यांनी स्वतःच्या शेती पद्धतीमधून आलेल्या अनुभवांचे सार या पुस्तकातून मांडले आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि पर्यावरण अभ्यासकांना हे पुस्तक दिशादर्शक ठरणारे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.