सुनील बडूरकरपाणी हे स्वयंभू भौतिक अंतिम सत्य आहे. पाणी हे निखळ निर्विवाद स्वतःच एक विज्ञान आहे. या वैज्ञानिक चिरंतन सत्यासोबत इतर शास्त्र असतील त्यांनी जोडून घ्यायचे असते. ही गोष्ट हा दृष्टांत वारंवार आपण सगळ्यांनी, आपले भवताल, आपला परिसर, आपली गावे, वस्त्या माणसे यांनी घेतला आहे. जे कळते-समजते दिसते त्याला पुन्हा बाजूला करून आपण सर्वजण नेमकं काय करत असतो?.आमचे स्नेही पत्रकार मित्र अनंत अडसूळ स्वतः एक कष्टकरी शेतकरी आहेत, ते सांगत होते की शेतात पिके कुजून नासली आहेत, दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पाच, दहा मिनिटेही शेतात थांबता येत नाही. जेव्हा पाऊस थांबेल त्यानंतर हा शेतातील घातक कचरा बाजूला करून जमीन पुन्हा शेतीच्या कामाला येण्यास नेमके किती महिने लागतील हे सांगता येत नाही. त्यासाठी किती पैसे लागतील इतके पैसे कुठून आणायचे हेही समजत नाही. यासाठी जे मनुष्यबळ लागणार आहे त्याच्या पोटापाण्याचा काय? मशिन, यंत्रे काम करू शकतात का? हो. पण त्यांना चालवायला माणूस लागतो. त्यालाही रोजगार इंधन भाडे द्यावे लागते..प्रत्येक जण गावातली पाण्यात, चिखलात संकटात आहे. स्वतःचे घर, अन्नपाण्याची सोय, मुलांच्या शाळा, दवाखाने, घरातील म्हातारी माणसे सांभाळणे, रस्ते तर नाहीत अनेक ठिकाणी वाहतूक वारंवार बंद पडत आहे. आजारी माणसांना न्यायचे कसे?.Solapur Flood : शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे लवकर पूर्ण करा, कृषिमंत्री भरणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना.कळंब येथील इंजिनियर विजयकुमार राखुंडे सांगत आहेत, की मी शेतात चाळीस वर्षे काम करत आहे. स्वत:ही राबतो, पण इतका पाऊस कधीच पाहिला नाही. २००६ आणि २०१० या वर्षी डिसेंबरपर्यंत पाऊस होता. पण तेव्हा अधूनमधून एक थांबा मिळायचा. पण, तेव्हा एका दिवसात नव्हे, तर एकाच तासात असा दीडशे-दोनशे मिमी पाऊस पडत नव्हता..सीना नदीवरील पूल बराच उंच केलेला, त्यालाही पाणी भिडले, मांजरा नदीवरील जवळपास सगळ्या पुलावर पाणी वाहिले, संपूर्ण राज्यातील नव्वद टक्के पुलांवरून पाणी वाहिले, अद्यापही वाहणार आहे. क्युसेक हे वाहणारे किंवा सोडलेले पाणी मोजण्याचे एकक आहे. म्हणजे प्रति सेकंदाला किती पाणी एका जागेतून वाहिले जाते. जर एका सेकंदाला एक लाखाहून जास्त क्युसेक पाणी वाहत असेल तर शेजारील गावे कशी वाचू शकतील? एखादे मध्यम आकाराचे धरण फुटावे तसे पाणी वाहत आहे..सलग चार महिने न थांबता दररोज पाऊस झाल्याने पाणी थेट त्याच्या मस्तीने वाहायला लागले आहे. जिथे अडथळा असेल त्याला सोबत घेऊन नासधूस करून पाणी मुसंडी मारत आहे. नदीपात्र वारंवार बदलणे हा पराक्रम सर्वच नद्या करू लागल्या आहेत. त्यामुळे कुणाचे शेत कधी त्या कचाट्यात सापडेल माहीत नाही. कोणत्या गावाचा नकाशा कधी बदलेल सांगता येत नाही. या तुफानी पाण्याने अख्खे शेत त्यातील सगळीच माती उखडून नेली आहे. शेतातील माती गाळ होऊन जवळच्या बंधाऱ्यात अडकणे हा भाग जुना झाला. अख्खे शेत खरवडून काढून फेकून देणे हा ताजा संकट अवतार समोर आलेला आहे..CM Devendra Fadnavis Solapur Visit : नुकसान भरपाईसाठी सरकार हात आखडता घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन .पत्रकार स्नेही निशिकांत भालेराव सांगत आहेत, की मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील सध्याच्या अंदाजानुसार जवळपास अठरा ते वीस लाख हेक्टर जमिनीवरील माती वाहून गेली आहे. एक तर शेतात पाणी आहे, पिके कुजली आहेत, आणि जमीन वाहून गेली आहे. या जमिनीला परत कुठून कसे शिवारात आणायचे हा जास्त मोठा जीवघेणा प्रश्न आहे..पाणी व हवामान विषयाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर मागील दहा-वीस वर्षे झाली, काळजीने सांगत आहेत की जगातील हवामान दर क्षणाला बदलले आहे. आणखी बदलणार आहे. त्याचा विचार आणि हालचाल करायला आपण जितका उशीर लावणार आहोत, त्याच प्रमाणात पाणी आपल्या जीवावर उठणार आहे. जगात सर्वत्र महापूर हे नित्याचे हवामान बनते की काय अशी भीती आहे. कारण तसे प्रसंग तसे पाऊस तसे पूर सगळीकडे येत आहेत. .आसाम, केरळसह यंदा राजस्थान, पंजाब येथेही महापूर आले. कदाचित अख्खा भारतच पुराच्या महाकाय वेढ्यात ओढला जाणार आहे. जसा देशभर अवर्षण दुष्काळ पडला होता, अनेक वेळा पडला होता. त्यात लाखो माणसे जनावरे मेली होती, आता त्या उलट अतिवृष्टीच्या तुफानांत शेती जमिनी रस्ते वीज, अन्नधान्य, गावे वस्त्या वाहून जाणार आहेत. यामध्ये मागील किमान पन्नास वर्षे सतत कोरडा दुष्काळ पाण्याचे टँकर्स याचे वैभव मिरवणारा मराठवाडा प्रदेश आता पाण्याने वेढलेला आहे. आधीच कमी लागवडी असलेला हा प्रदेश आता पिकाऊ जमिनी वाहून गेलेला भाग बनला आहे..निसर्गप्रेमी अभ्यासक शेतकरी माधव इंगळे सांगत आहेत, की असाच सतत पाऊस राहिला तर यामधून अनेक नवीन जीवजाती निर्माण होतील. नवीन जिवाणू जन्माला येतील त्यांचा अंदाज आपल्याला येणार नाही आणि त्यांचे एक मोठेच आक्रमण आपल्या सध्याच्या जीवनावर होणार आहेत. नुकतीच डांबरी रस्त्यावर कापसाच्या तंतूसारखी बुरशी आढळून आली. एक लहानशा डुकराच्या आकाराचा एक बेडूक पाहण्यात आला. .घराच्या भिंतीवर इंच जाडीचे शेवाळ तयार होऊन त्याच्या गाठी होऊन अंगणात घरात पडत आहेत. त्यावर असंख्य गोगलगायी चालत जात आहेत. नवीनच किडे-अळ्या गल्लीतून हालचाल करत आहेत. या गोष्टी डोळ्यांना दिसतात तरी न दिसणाऱ्या किती प्रमाणात असतील? या सगळ्यांचा परिणाम माणूस वनस्पती पिके जनावरे पक्षी यांच्यावर होणार आहे..या संकटात आपली शेती पुन्हा पिकाऊ करावी लागेल, या एकात एक गुंतलेल्या वास्तवाला, नैसर्गिक सत्याला विचारात घेऊन मुळापासून सामोरे जावे लागणार आहे. नवीन विज्ञान तंत्रज्ञान घेऊन, माणूस म्हणून पुन्हा एकदा पाणी हेच जीवन, पाणी हाच आपला प्रिय सखा हे तत्त्व स्वीकारून जगायला शिकूया. @ संपर्क : ९९७५०१९१६५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.