Groundwater Recharge : पावसाचे पाणी जास्तीत जास्त मुरविण्यासाठी ‘जलतारा’ किंवा शोषखड्डे उपयुक्त आहे. तही वाशीमसारख्या उथळ व उलट्या बशीसारखी भौगोलिक रचना असलेल्या भागामध्ये भूजलामध्ये वाढ करण्यासाठी ती अधिकच उपयुक्त ठरू शकते, हे या संकल्पनेचे जनक डाॅ. पुरुषोत्तम वायाळ यांनी स्पष्ट केले. त्यांच्या तंत्रावर विश्वास ठेऊन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी देवी यांनी तो प्रकल्प अग्रक्रमाने राबविण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च प्राधान्य देत सर्व सरकारी यंत्रणा कामाला लावली. उपजिल्हाधिकाऱ्यांसह प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांवर गावांचे पालकत्व आणि त्याअंतर्गत जबाबदाऱ्या वाटून दिल्या. .पूर्ण आराखडा तयार केला. त्यावरून कृषी विभागाने खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. खास ‘मेजरमेंट बुक’ बनवून घेतले गेले. त्यामुळे जलताराची मोजमापे, संख्या व तत्सम माहितीची नोंद ठेवणे सोपे झाले. जिल्हा व तालुका स्तरावरचे सर्व अधिकारी कार्यरत झाले. खुद्द जिल्हाधिकारी सकाळी सहा वाजल्यापासून गावागावांपर्यंत पोहोचत होत्या. त्यांची भेट नियमित होत असल्याने अन्य यंत्रणा आपोआपच वेगवान झाली होती. यात शिक्षक आणि पोलिस खात्याचा सहभाग घेतला गेला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वांत आधी त्यांच्या शेतात व त्यांच्या गावात जलतारा घेण्यास सुचविण्यात आले. काही अधिकाऱ्यांनी तर मोठ्या रकमा देणगीदाखल दिल्या. .Water Conservation Success : बनसावरगाव : पाणीदार अन् जलसाक्षरही.उदा. तलाठी अरुण देशमुख यांनी स्वतःच्या घराची वास्तुशांती साठी ठेवलेले एक लाख रुपये, रेखा पटकुले यांनी ६१ हजार रुपये आणि सरला राजूरकर यांनी ५१ हजार रुपये या कामासाठी देणगी दाखल दिले. स्वतःपासून कामाची सुरुवात केल्याने त्यांच्या शब्दांनाही पुढे गावकऱ्यांपुढे वजन आले. गावकऱ्यांनीही त्याला काही ठिकाणी उस्फुर्त प्रतिसाद दिला. पटकुले मॅडम व राजूरकर ताई यांनी रणरागिणीप्रमाणे दिवसाचे १२ ते १४ तास झोकून देत काम केले. कार्यालयीन कामात खंड न पडू देता चार महिन्याच्या काळात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी देवी यांनी जवळपास सर्व गावांना भेट दिली. गावातील कोणताही कार्यकर्ता, गावकरी या विषयासाठी त्यांना कधीही भेटू किंवा फोन करू शकत होता. त्यामुळे प्रत्येक गावातील अडचणीसोबतच प्रगतीचाही ‘आंखो देखा’ अहवाल त्यांच्यापर्यंत आपोआप पोहोचत होता..विविध अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया...जिल्ह्यातील मनरेगा विभाग प्रमुख अधिकारी श्री. देवरे म्हणतात, की आमचे पुढील दोन, तीन वर्षांत आणखी दहा लाख जलतारा करण्याचे ध्येय आहे. आजवर ‘एकरी एक’ असलेले प्रमाण वाढून एकापेक्षा जास्त जलतारे करण्याची आमची धडपड असेल. सध्याचा पावसाळा संपल्यानंतर आम्ही गावोगावच्या गायरान व तत्सम गाव मालकीच्या जमिनी, शासकीय जमिनींवर जलतारा तयार करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मनरेगा अंतर्गत उपलब्ध मनुष्यबळ, खोदाई यंत्रे, स्वयंस्फूर्तीने श्रमदानावर भर असणार आहे..कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी अरीफ शाह म्हणाले, की जलतारा प्रकल्पातून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होईल. त्यामुळे पारंपरिक पिकांपलीकडे शेती नेता येईल. कृषी विभागाने अमेरिकेबरोबरच जगभरात सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चिया सीड’ची लागवडीसाठी प्रयत्न केले होते. त्यातून गेल्या दोन वर्षांत वाशीम जिल्ह्यात ३६०० हेक्टर लागवड केली गेली. आता आमच्या वाशीम जिल्ह्यातील लागवड कर्नाटक राज्याच्या एकूण चिया सीड लागवडीपेक्षा कितीतरी अधिक आहे. चिया सीडचे एकरी पाच क्विंटल उत्पादन येते. त्याला प्रति किलो बाराशे ते चौदाशे रुपये दर मिळतो. .म्हणजे एकरी सात लाख रुपये उत्पन्न. हे पीक एक रुपया गुंतवून ४०८१ रुपये देते. शासन पातळीवर या पिकाच्या बाजारपेठ उपलब्धतेसाठी खास प्रयत्न केले. त्याच प्रमाणे अक्कल करा, मूषक दाना, अश्वगंधा, कडू चिरायता या चार औषधी पिकांसंबंधी काम सुरू असून, काही प्रमुख औषध कंपन्यांबरोबर शेतकऱ्यांच्या वतीने करार केले गेले आहे. त्यासाठी शंभर एकरांचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देत ५० प्रकारच्या निविष्ठा शेताच्या बांधावरच बनविण्यात आम्ही यश मिळवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होऊ शकेल..Water Conservation : बीव्हरमुळे तलावाचे पुनरुज्जीवन.जलतारा स्पर्धेच्या यशातून प्रेरणा घेत कृषी विभागानेही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट पेरणी स्पर्धा’ जाहीर केली. त्यात पेरणीच्या सुधारीत पद्धती उदा. बी.बी.एफ., अमरपट्टा, वरंबा सरी पद्धत, टोकण पद्धती वापरण्यासाठी कृषी विभागाने मदतीचा हात दिला. याही स्पर्धेत १५ जुलैअखेर पर्यंत ३२ हजार शेतकऱ्यांनी भाग घेतला. त्यातून एक लाख छत्तीस हजार एकरावर आधुनिक स्मार्ट पेरणी केली गेली. त्याचे फायदे लक्षात आल्यावर आपोआप अनेक शेतकरी अशा पद्धतीकडे वळतील. जलतारा चळवळ आता वाशीम जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरणार हे नक्की!.वाशीम जिल्ह्यामध्ये गेल्या २२ वर्षांपासून कोणत्याही संस्थेशिवाय किंवा पदाविना करत असलेले सामाजिक कार्यकर्ते अविनाश मारशेटवार या जलतारा उपक्रमाबाबत म्हणतात, की पाणी उपलब्धतेमुळे शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळू लागले तर शेतकऱ्यांची जीवनशैली सुखदायी होईल. आर्थिक क्षमता वाढल्याने कामांसाठी होणारे स्थलांतर रोखले जाईल. आरोग्य व शिक्षणावर सकारात्मक परिणाम होईल. सामान्य लोकांचे जीवनमान अधिक संपन्न करण्याचेच उद्दिष्ट ठेवत आम्ही मारशेटवार कुटुंबीय सामाजिक कार्यात कार्यरत आहोत. त्यासाठी जलतारा चळवळ भक्कम पाया ठरेल, यात शंका नाही..जागतिक पातळीवर दखल...वाशीम जिल्ह्यात केवळ चार महिन्यात ४० हजार जलतारा किंवा शोषखड्डे तयार करण्यात आले, हाही एक जागतिक विक्रम आहे. स्पर्धेची अंतिम तारीख ३१ मे पर्यंत झालेले जलतारा एकूण ४१,३८६. पुढे स्पर्धा संपल्यानंतरही लोक जलतारा तयार करत होते. त्यामुळे १५ जूनपर्यंत त्रेचाळीस हजारपेक्षा अधिक जलतारा तयार झाले. त्यातही वाशिम (११००१), मालेगाव (५५९७), रिसोड (६५६३), कारंजा (७११८), मंगरूळपीर (६०१६), मानोरा (५०७०) या तालुक्यात उत्तम काम झाले. एकूण सहभाग नोंदवलेली गावे होती ७९८ म्हणजे जिल्ह्यातील १००% गावांनी यात भाग घेतला. पावसाळ्यापूर्वी कामांची पूर्तता करण्यासाठी श्रमदानाचे सत्र रात्रंदिवस अखंड सुरू होते. या कामामुळे संपूर्ण पावसाळ्यात किमान ११०० ते १४०० कोटी लिटर पाणी भूगर्भात पोहोचेल. यामुळे भूजल पातळी वाढून उन्हाळ्यासाठी संरक्षित पाणी उपलब्ध होईल, अशी आशा आहे.....अशा केल्या अचूक नोंदीजलतारांचे दस्तऐवजीकरणासाठी मोबाइल ॲप बनविले गेले. त्यात जलताराचा फोटो, त्याचे जिओ टॅगिंग, शेतकऱ्याचे नाव, गट नंबर, गावाचे नाव खड्ड्याचा आकार अशी सर्व माहिती कशी भरायची, याचे ‘वॉटर हीरो’ना प्रशिक्षण दिले. रोजच्या रोज त्यात अपडेट केल्या जाणाऱ्या माहितीमुळे पारदर्शकता आली. कामाचा वेग कमी असलेल्या ठिकाणी अधिक प्रयत्न करण्यात आले. सर्वाधिक जलतारा करण्याच्या स्पर्धेमध्ये कमी क्षेत्र असलेल्या गावांच्या विचार करून वहितीखाली क्षेत्राच्या २५% शेतात किंवा एका गावात किमान २५० जलतारा खड्डे ही प्रमुख अट होती. स्पर्धेच्या वातावरणामुळे सर्वच गावात जलतारा तयार झाले. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी वाशीम जिल्ह्याबाहेरील राजकीय व अशासकीय अशा ५५ लोकांची टीम तयार केली गेली. त्यामुळे निकालात तटस्थता आणि पारदर्शकता जपली गेली.- सतीश खाडे ९८२३०३०२१८,(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.