Kharif Season: खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांचा सुळसुळाट सुरू असताना वर्धा जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली. आर्वी येथे मंगळवारी (ता. २६) रात्री साडेआठ वाजता टाकलेल्या धाडीत तब्बल २९ लाख ४६ हजार ६०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संजय गोपाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय भरारी पथकामार्फत वर्धा जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाण्यांविरोधात तपासण्या सुरू आहेत. त्याच अनुषंगाने मौजा आर्वी येथे खान पेट्रोल पंपाशेजारी श्री. कोहळे यांच्या घरामागील सिंगल खोलीत बनावट बियाणे पॅकिंग सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने अचानक धाड टाकली..Illegal HTBT Cotton Seeds: अवैध एचटीबीटी कपाशीचे ५६ लाखांचे बियाणे जप्त.कारवाईदरम्यान त्या ठिकाणी सिलिंग मशीन, वेइंग मशीनसह सात प्रकारच्या मशिनरी, विविध ब्रँड नावांची १४ हजार ९९५ रिकामी पॅकेट्स, १२.२० क्विंटल खुले कापूस बियाणे तसेच भरलेली १७४ बियाण्यांची पॅकेट्स आढळून आली. पोलिसांच्या उपस्थितीत हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला..Illegal HTBT Cotton Seeds: सोळा लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त.प्राथमिक तपासात संजय गोपाळे याने हे खुले बियाणे ‘मूग बियाणे’ या नावाने बिल तयार करून पनाम ॲग्रोटेक, राजकोट (गुजरात) येथून मागविल्याचे समोर आले आहे. हे बियाणे विविध ब्रँडच्या पॅकेटमध्ये भरून परिसरातील गावांमध्ये विक्रीसाठी वितरित करण्याचा त्याचा डाव होता. मात्र कृषी विभागाच्या धाडीमुळे शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टळली..जप्त मुद्देमालामध्ये सात प्रकारच्या मशिनरीची किंमत ८१ हजार ७२४ रुपये, १२.२० क्विंटल खुले बियाणे २५ लाख ६८ हजार रुपये, १७४ भरलेली पॅकेट्स १ लाख ७४ हजार रुपये तसेच १४ हजार ९९५ रिकाम्या पॅकेट्सची किंमत १ लाख २२ हजार रुपये इतकी आहे. एकूण २९ लाख ४६ हजार ६०८ रुपयांचा मुद्देमाल पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला. जप्त बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. .या कारवाईत भरारी पथक प्रमुख तथा मोहिम अधिकारी संदीप ढोणे यांनी स्पोर्ट्स वेअर, फॅन्सी गॉगल आणि पंचाचा वापर करून आरोपीला गाफील ठेवत त्याचे लोकेशन ट्रेस केले. बियाणे आणि मशिनरी हस्तगत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सोबत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रमोद पेटकर यांच्यासह पथकातील अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पुलगाव येथेही १७ लाख रुपयांचे अनधिकृत बियाणे जप्त करण्यात आले होते. एका महिन्यात झालेल्या या दुसऱ्या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनधिकृत एचटीबीटी बियाणे पुरवठादारांचे धाबे दणाणले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.